
>> प्रा. डॉ. शशिकांत लोखंडे
लालित्याचा संबंध सौंदर्याशी आहे आणि विज्ञानसंबंध सत्याशी आहे. विज्ञानकविता सौंदर्य आणि सत्य यांचा समन्वय साधून नवे प्रज्ञाभान देते तेव्हा ती आनंदही देते. प्रा. देवबा शिवाजी पाटील (बुलढाणा) यांनी केवळ ‘आकाश/नभ’ हा विषय व आशय घेऊन नभाचे अंतरंग उलगडून दाखविण्यासाठी ‘नभ नवलाई’ हा विज्ञानलक्ष्यी काव्यसंग्रह तयार केला आहे.
शालेय बालवयातच विज्ञान सत्यशोधदृष्टी मिळाली म्हणजे ही मुले अराजक समजुती, अंधश्रद्धा, गैरसमज, अंधभक्ती अशा मनोविघातक गोष्टींपासून विमुक्त होऊन समाज-राष्ट्र प्रगल्भ जाणिवांचे होईल. तेथे सांविधानिक मूल्याचीच मग रुजवात होईल. अशा कवितांद्वारे मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. त्यांचे कुतूहल वाढावे, त्यांचीही जिज्ञासापूर्ती व्हावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन लाभावा या दृष्टीने प्रा. पाटील यांच्या ‘नभ नवलाई’ची साक्ष घेता येईल. या नभगंगेत सूर्यमाला, तारे, नवग्रह, पृथ्वी, चंद्र यांचा करिष्मा ‘मन प्रसन्न’ करते (पृ. 13) त्यात सूर्य, दिवस-रात्र, पौर्णिमा-अमावास्या, चंद्रकला, चंद्रखळे, ग्रहणे, ढग, ढगांचे रंग, वीज-ढग गडगडाट, पाऊस, इंद्रधनु, गारा, ढगफुटी, चांदण्यांचे भ्रमण, सर्व भ्रमी तारे, संध्याकाळ, संधिप्रकाश, पहाट, ऊन यांचे नभातील विज्ञानकार्य व स्वरूप विशद करणारी ही लक्षनीय कविता आहे.
शालेय वयातही मुलांना जे प्रश्न पडतात त्या ‘का? कसे?’ यांची उत्तरे मुलांना या कवितेतून मिळतात. डॉ. फुला बागुल (धुळे) यांची अभ्यासनीय सर्वांगवेधा प्रस्तावना असून डॉ. मोना चिमोटे यांनी मलपृष्ठ मजकूर नेमका देऊन या संग्रहाची भलावण नव्हे पाठराखणच केली आहे. आकाशातील घडामोडीचे विज्ञान सांगताना प्रा. पाटील कशाचेही दैवतीकरण वा अंधश्रद्धा करीत नाहीत. हे विशेष होय. विज्ञानातील सत्याला काव्यात्मचा अंतरमुलामा लाभल्याने प्रत्येक कवितेतील लय, ताल, छंद, शब्दकळा-रुपके, उपमा, प्रतिके अपारदर्शक होऊ दिलेले नाही. येथे कवीची भूमिका विज्ञानबोधची प्रबळ अशीच आहे. आकाशस्थ सर्व घटकांचे खगोलीय कार्य याबाबत कवी तशील देतो. या 23 कवितांमध्ये विज्ञानपर तपशील असणे अपरिहार्य आहे. तसेच खगोलीय घटना-प्रसंगांची कारणमीमांसाही विज्ञान आधारित साधार आहे. विज्ञान पुस्तकातील उत्तरे येथे असणे स्वाभाविक आहे, पण विज्ञानपुस्तकात रुक्ष सत्य आहे, काव्य नाही. पण ‘नभ नवलाई’ मध्ये ‘काव्यात्म सत्य’ आहे. ही काव्यात्मकता, आकलनाच्या पातळीवर सहज-सुलभपणे विज्ञान-सत्याचे कथन करणारी आहे. खगोलीय/नैसर्गिक आपत्ती मागील ज्ञात-अज्ञातकारणे कवी कवितेच्या भाषेत साक्षात करतो उदा. सूर्यग्रहण, ढगफुटी, चंद्रखळे, गारांचा पाऊस इ.इ. दृश्य अनुभूती वस्तुनिष्ठपणे देणारी प्रतिमासृष्टी या कवितांमध्ये आहे. सत्यवस्तुनिष्ठपणे सांगताना कवी कुठेही रंजनमूल्य हरवत नाही. सत्याला लालित्याची जोड देऊन विज्ञानकविता लिहिणे सोपे नाही. काव्यमाध्यमातून विज्ञानाची मूल्ये बाल जगापुढे पटवून देणे ही कवीची कसोटीच आहे. या काव्यात गद्याचा बाज येणे हेही ‘नवलाई’ आहे, पण त्यात ठणठणीत रुक्षपणा नाही… बोधाच्या जाणिवा अशाच स्पष्ट प्रकट व्हायला पाहिजेत म्हणून प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचेही किशोर जगात हे कार्य दखलपात्र आहे. भाषेत न अडकलेली ही अनलंकृत कविता विज्ञानसत्याचा दागिनाच आहे, असे म्हणावे लागेल.
नभ नवलाई
लेखक : प्रा. देवबा शिवाजी पाटील
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पृष्ठ : 40,
मूल्य : रुपये 100/-





























































