पोस्ट कोविड आहाराबाबत काही खास टिप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> कांचन पटवर्धन’

कोविड-19 झाल्यानंतर त्यातून बरे झालाय म्हणजे आता कोविड विरोधातली लढाई संपली असे न म्हणता पोस्ट कोविड रिकव्हरी दरम्यान होणाऱया त्रासामुळे, साईड इफेक्ट्समुळे तसेच इतर आजारांमुळे पुन्हा एकदा लढावे लागणार असल्याने शारीरिक आणि मानसिक तयारी करायलाच हवी. कारण पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी आपल्या शरीराची साथ असणे गरजेचे आहे. आणि त्यामध्ये आहार ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नाकारता येत नाही. कोविडमुक्त झाल्यानंतर सकस, योग्य आणि पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही बऱयाचश्या रुग्णांना तीव्र थकवा जाणवतो. अशावेळी पुरेशी झोप घेणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. पोस्ट कोविड लक्षणांपैकी पोटाचे विकार हे लक्षणही अनेक रुग्णांमध्ये दिसून येते. या समस्येपासून दूर राहण्याकरिता. आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या, मोड आलेले कडधान्य, डाळी यांचा समावेश करणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण मसालेदार न करता पचण्यास हलका आहार घ्या. आपल्या आहारात कोशिंबिरीचा समावेश करा. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. पुरेसे फायबरचे सेवन केल्याने पचनास नक्कीच फायदा होतो. घरातून बाहेर न पडल्याने आणि सूर्यप्रकाश शरीरावर पडत नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे ड जीवनसत्त्वयुक्त आहार तसेच शक्य असल्यास कोवळय़ा उन्हात बसणे आवश्यक आहे. आहारातील अतिरिक्त साखर, कॅफीनयुक्त पेय, तेलकट आणि जंक फुडचे सेवन करणे टाळावे. हळद दूध प्यावे. हळद, दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळून घेऊन हळददूध करावे. ज्यांना हळद दुधामुळे कफ होतो असे वाटत असेल तर त्यांनी कोमट पाण्यात हळद घालून प्यायले तरी चालते.

कोरोनातून बरे झाल्यानंतर येणाऱया अशक्तपणामुळे काहींना पचनाला त्रास होतो. अशावेळी गिलके, दोडके, भोपळा, पडवळ अशा भाज्यांचे सेवन करणे उत्तम राहील. पोटाला त्रास न होणाऱया भाज्यांचा आहारात वापर करायला विसरू नका. तसेच डाळीत मूग डाळ, मसूर डाळीचाही आहारात वापर करावा याचा त्रास होत नाही. आहार परिपूर्ण, ताजा व गरमच घ्यावा, त्यामुळे रिकव्हरी जलद होते. एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चारपाच वेळा विभागून थोडं थोडं खावं. भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा) घ्यावी. आले, तुळस, हळद, पुदिना, लवंगा यासारख्या घशाला आराम देणाऱया पदार्थांचा काढा करताना व स्वयंपाकात वापर करावा. तंबाकू आणि मद्यपान टाळावे. खाण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि शिजवलेले अन्न हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. आजारी असल्यास अन्न शिजविणे टाळावे. जर ते टाळता येत नसेल तर स्वयंपाक करताना नाक व तोंड रुमालाच्या सहाय्याने झाकून घ्यावे. हातांच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. बाहेरचे अन्न (विशेषतः कच्चे अन्न, ताजे रस, रस्त्याच्या कडेला असलेले खाद्य) आणि थंड पदार्थ (आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स) टाळावे. सकाळी उठल्यावर रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम आणि बेदाणे खा. बदाममध्ये प्रथिनांचा (प्रोटिन) मोठा खजिना असून बेदाण्यात लोहाचे (आयर्न) प्रमाण मोठे असते. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दीर्घकाळ अशक्तपणा, स्नायुदुखीचा त्रास जाणवतो आहे. कोविड मुक्तीनंतर धाप लागणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या. शरीराची मोठय़ा प्रमाणात झीज झाल्याने शरीराच्या पोषणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले वय, प्रतिकारशक्ती आणि इतर दुर्धर आजार या बाबींचा विचार करूनच आहार, व्यायाम आणि औषधांचे नियोजन करावे.
(लेखिका कांचन्स हाऊस ऑफ हेल्थ ऍण्ड न्युट्रिशनच्या आहारतज्ञ आहेत)