मराठी चित्रपटांचा मानबिंदू प्रभात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिजित पेंढारकर

पुण्याला मराठी चित्रपटांचं माहेरघर मानलं जातं. प्रदर्शित होणाऱया मराठी चित्रपटांचं व्यावसायिक यश हे बहुतांश वेळा पुण्यातल्या त्याच्या कमाई आणि प्रतिसादावरून ठरवलं जातं किंवा अवलंबूनही असतं. पुण्याची ही ओळख होण्यात ज्या चित्रपटगृहांचा वाटा आहे त्यात ‘प्रभात टॉकीज’चे नाव प्रमुख आहे.

wपुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या अप्पा बळवंत चौकातून शनिवारवाडय़ाकडे वळलं, की उजव्या बाजूला असणारी चित्रपटांची वेगवेगळी पोस्टर्स लक्ष वेधून घेतात. एका वेळी दोन किंवा तीन मराठी चित्रपटांची पोस्टर्स इथे वेगवेगळ्या भागात दिमाखात झळकत असतात. दिवाळीच्या काळात त्यांना आकर्षक विद्युत रोषणाईसुद्धा केलेली असते. हेच ते पुण्याचं प्रसिद्ध ‘प्रभात टॉकीज’ आणि आताचं ‘किबे लक्ष्मी थिएटर.’

पुण्याला मराठी चित्रपटांचं माहेरघर मानलं जातं. प्रदर्शित होणाऱया मराठी चित्रपटांचं व्यावसायिक यश हे बहुतांश वेळा पुण्यातल्या त्याच्या कमाई आणि प्रतिसादावरून ठरवलं जातं किंवा अवलंबूनही असतं. पुण्याची ही ओळख होण्यात ज्या चित्रपटगृहांचा वाटा आहे त्यात ‘प्रभात टॉकीज’चे नाव प्रमुख आहे. या थिएटरने आता 85व्या वर्षात पदार्पण केले आहे.

‘प्रभात टॉकीज’च्या जन्मापेक्षाही त्याच्या जन्माआधीची या वास्तूची कहाणी रंजक आहे. पेशवाईच्या अखेरीस दुसऱया बाजीरावाच्या कारकिर्दीत पेशव्यांचे सावकार श्रीमंत गद्रे यांनी हा वाडा बांधला. पेशवाईनंतर मल्हार रावबाजी टेंबुर्णीकर माणकेश्वर यांच्याकडे वाडय़ाची मालकी होती. त्यांच्या हयातीनंतर काही कर्जांबाबत कोर्टाने हा वाडा जप्त केला. 1857मध्ये वाडय़ाचा लिलाव झाला आणि तो लिलाव श्री. राघो सदाशिव गुणे यांनी घेतला. पुढे हा वाडा सरदार विनायक गणेश किबे यांच्याकडे कसा आला, त्याचाही वेगळाच किस्सा आहे. श्री. किबे हे गणपतीचे उपासक. 1861मध्ये अष्टविनायकाच्या यात्रेसाठी ते महाराष्ट्रात लवाजम्यासह आले होते; पण यात्रा संपवून परत जाईपर्यंत पावसाळा सुरू झाला. त्यामुळे पुढचे काही महिने त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुढे भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवासाठी स्वतःची जागा हवी म्हणून श्री. किबे यांनी हा वाडा श्री. गुणे यांच्याकडून खरेदी केला. या वाडय़ात गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला आणि वाडय़ाला ‘किबे वाडा’ असं नाव पडून गेलं.

पुढे काही काळ या वाडय़ात ‘ज्ञानप्रकाश’ या आद्य नियतकालिकाचं कार्यालय आणि छापखाने होते. वाडय़ाला आग लागल्यानंतर पुन्हा वाडय़ाचा वाद कोर्टात गेला आणि नंतर तडजोड होऊन वाडा सरदार श्रीमंत रामचंद्र मुकुंदराव किबे यांच्या ताब्यात आला. मध्य प्रदेशासारख्या प्रांतातून पुण्यातल्या वाडय़ाची देखभाल शक्य नाही, म्हणून सरदार किबेंनी वाडा विकायला काढला होता. पण त्यांचे पुण्यातले इस्टेट मॅनेजर श्री. जनार्दन बापूजी ऊर्फ भाऊराव करवडे यांनी वाडय़ात थिएटर बांधून मिळकत चालू ठेवता येईल आणि जागेवर हक्कही राहील, असे सुचवले. करवडे यांच्याच सल्ल्याने या वाडय़ात आधुनिक नाटय़मंदिर बांधायचं ठरलं. स्वतः करवडे यांनी मुंबईतल्या सगळ्या नव्या थिएटर्सचा अभ्यास केला आणि पुण्यातले वास्तुतज्ञ कै. एन.जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाटय़मंदिराची दिमाखदार इमारत उभी राहिली. कै. रामचंद्र किबे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावावरून या नाटय़मंदिराला ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असं नावही दिलं. त्याच सुमारास 1933मध्ये प्रभात फिल्म कंपनीचं कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झालं. ‘प्रभात’ आणि त्यांचे वितरक मे. फेमस पिक्चर्स, मुंबई यांनी मिळून हे थिएटर चालवायला घेतलं आणि त्याचं ‘प्रभात टॉकीज’ असं नामांतर झालं.

21 सप्टेंबर 1934 रोजी ‘लव्ह मी टुनाईट‘ या इंग्रजी बोलपटानं ‘प्रभात टॉकीज’चं उद्घाटन झालं. आचार्य अत्रे या खेळाला उपस्थित होते. स्थानिक वृत्तपत्रांत थिएटरच्या उद्घाटनाची मोठी जाहिरात करण्यात आली होती आणि नंतर रंजक वृत्तांतसुद्धा छापून आले.

‘प्रभात टॉकीज’ची सुरुवात झाल्यानंतर विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि बाबूराव पै या चौघांनी तेव्हाची व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती. कालांतराने व्ही. शांताराम 1942मध्ये ‘प्रभात कंपनी’तून बाहेर पडले आणि त्यांनी भागीदारीही सोडली. 1953च्या सुमारास प्रभात फिल्म कंपनीच्या आर्थिक अडचणी वाढल्यामुळे काही काळ थिएटर चालवण्यासाठी वेगळ्या कंपनीला देण्यात आलं होतं. कर्ज फिटल्यावर ते पुन्हा ‘प्रभात फिल्म कंपनी’कडे आलं.

दामले आणि पै यांची पुढची पिढी, अनुक्रमे दादासाहेब दामले आणि शरद पै यांनी नंतर ‘प्रभात’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तम पद्धतीने सांभाळली आणि थिएटरची भरभराट झाली. श्री. गणपतराव कुलकर्णी, श्री. राव, श्री. बाळकृष्ण भिडे ऊर्फ भिडेकाका आणि श्री. पद्माकर वाघ अशा व्यवस्थापक मंडळींनीही चित्रपटगृहाचा लौकिक वाढवण्यात आणि शिस्त राखण्यात मोलाचा हातभार लावला.

1975मध्ये सरकारनं मराठी चित्रपटांसाठी करपरतीची योजना आणल्यानंतर मराठी चित्रपटांची निर्मिती वाढायला लागली आणि दादासाहेब दामले व शरद पै या जोडीनं ‘प्रभात’मध्ये फक्त मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘मराठी चित्रपटांचं माहेरघर’ अशीच ‘प्रभात‘ची ओळख बनली. तेव्हापासून ‘प्रभात‘ने प्रामुख्याने मराठी चित्रपटांनाच आश्रय आणि आधार दिला. अनेक मराठी चित्रपट केवळ ‘प्रभात‘च्या पाठिंब्यामुळेच चालले आणि महोत्सवी यश मिळवू शकले. नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी अडचणीत होती, तेव्हाही अनेक प्रयोगशील चित्रपटांना ‘प्रभात’ने मार्ंनग आणि मॅटिनी शो, राखीव ठेवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा हातभार लावला.

प्रभात फिल्म कंपनीचे वारसदार विवेक दामले नंतरच्या काळात या थिएटरचा कारभार पाहत होते. वास्तूच्या मालकांशी असलेला त्यांचा करार संपल्यानंतर काही काळ चित्रपटगृह बंद राहिले आणि आता ‘किबे लक्ष्मी थिएटर’ या नावाने मूळ मालकच चित्रपटगृहाचा कारभार पाहतात. नाव बदललं असलं तरी ‘प्रभात’ ही जुनी ओळखच रसिकांच्या मनात कायम राहील आणि मराठी चित्रपटांचं ते प्रमुख आश्रयस्थान राहील, यात शंका नाही.

काही विशेष नोंदी
– ‘माहेरची साडी‘चा 127 आठवडे चालण्याचा विक्रम.
– एकूण 50हून अधिक चित्रपटांना सुवर्ण, रौप्यमहोत्सवी यश.
– सुरुवातीला फक्त संध्याकाळ आणि रात्र, असे दोनच खेळ.
– आधीची काही वर्षे रात्रीच्या वेळी चित्रपटाऐवजी नाटकाचे प्रयोगही होत.
– प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच पुण्याची संस्कृती आणि ओळख जपणारे म्हणूनही चित्रपटगृहाची लोकप्रियता.

– [email protected]