लेख – प्रबोधनकार आणि रयत शिक्षण संस्था!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर

बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास प्रबोधनकार आणि भाऊराव पाटील यांनी घेतला व त्यासाठी ते दोघेही झटले. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झटले. बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक यांना रयत शिक्षण संस्था आधारवड वाटतो. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागे प्रबोधनकार ठाकरेही होते. आजच्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार यांच्या आठवणींना हा उजाळा…

कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे प्रणेते-संस्थापक. बहुजन समाजातील तरुणांना शिक्षणाची उत्तम सोय व्हावी म्हणून सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तेव्हापासून भाऊराव पाटलांचे आणि प्रबोधनकार ठाकरें यांचे संबंध होते. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागे प्रबोधनकार ठाकरेही होते. ते आपले गुरू आहेत. त्यांनी एका समारंभात हे गुपित उघड केले ते असे…

1945च्या सप्टेंबर महिन्यात दादर येथे प्रबोधनकार ठाकरे यांचा एकसष्टीचा जाहीर समारंभ पार पडला. त्यावेळी भाऊराव पाटील मुद्दाम साताऱयाहून मुंबईला आले होते. प्रबोधनकारांच्या एकसष्टीच्या समारंभात भाऊराव पाटलांनी हे सांगितले. भाऊराव पाटलांनी आपल्या भाषणात रयत शिक्षण संस्थेची सुरुवात प्रबोधनकारांमुळे झाली आणि ते माझे गुरू आहेत. ते भाषणात म्हणाले की, ‘माझ्या शिक्षणप्रसाराच्या कार्याचा अखिल हिंदुस्थानात आज मोठा बोलबाला होऊन राहिला आहे, पण मी एक गुपित बाहेर फोडतो. रयत शिक्षणाची कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे नि उत्साहाचे पाणी घालून त्याला अंकुर फोडणारे आणि सुरुवातीच्या संकट प्रसंगात धीर देऊन, विरोधाचे पर्वत तुडवण्याचा मार्ग दाखवणारे माझे गुरू प्रबोधनकार ठाकरे. ते माझे गुरू तर खरेच, पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य नी पूजनीय मानतो. का मानू नये मी? एका प्रसंगी निराशेच्या नि संतापाच्या भरात माझ्या हातून खून होणार होता. चित्त्यासारखी उडी घेऊन ठाकऱयांनी माझ्या हातची बंदूक हिसकावून घेतली. माझे डोके ठिकाणावर आणले नसते तर कुठे होता आज भाऊराव आणि त्यांच्या कार्याचा पसारा? ठाकरे मुंबईला राहत असले तरी त्यांची कर्मभूमी सातारा आहे. आज सातारा जिह्याची वाघाची डरकाळी तमाम हिंदुस्थाला हलवीत आहे. साताऱयाच्या या जागृतीचा पाया 25 वर्षांपूर्वी ठाकरेंच्या मुलुखमैदानी व्याख्यानांनी घातला आहे हे मी आज छातीठोकपणे सांगत आहे. आजच्या तरुण पिढीला ठाकरे यांचे लेख पूर्वीइतक्याच तडफेने मार्गदर्शन करतील हे मी खात्रीने सांगतो. (संदर्भ- माझी जीवनगाथा)

1922च्या सातारा शिवजयंती उत्सवात भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांची पहिली ओळख झाली. प्रत्येक दौऱयागणिक ती वृद्धिगंत होत गेली. व्याख्यान संपल्यानंतर भाऊरावांच्या आणि प्रबोधनकारांच्या गप्पा व्हायच्या, चर्चा रंगायच्या त्या मागास, बहुजन समाजाच्या आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बोर्डिंग स्थापण्याच्या योजनेसंबंधी. मागासांच्या शिक्षणाचे वेड सारखे दोघांच्या डोक्यात घोळायचे, परंतु पैशाचे काय? भाऊरावांच्या मनात किर्लोस्करांसारखा दुसरा नांगराचा कारखाना काढण्याचा विचार मनात घोळू लागला. चार-पाच शेटजींना योजना सांगितली. अखेर सातारच्या धनजी शेट कूपरला योजना पटवून दिली. त्यांना पटली आणि 9 ते 10 कामगारांच्या सहकार्याने भाऊरावांनी कूपर इंजिनीअरिंग वर्क्सची स्थापना केली. समाजातील 10 टक्के रक्कम भाऊरावांच्या कार्याला मिळावी असे ठरले. काही दिवसांनी कूपर आणि भाऊरावांचे जमेनासे झाले आणि भाऊरावांनी वेगळा मार्ग धरला. तेव्हा प्रबोधनकार त्यांच्या साथीला होते. भाऊरावांनी कूपरची साथ सोडली, परंतु प्रबोधनकारांना सोडले नाही.

मे 1922 आणि 1923 या दोन वर्षांत भाऊराव पाटील यांनी बऱयाच वेळा मुंबई दौरा केला. या मुंबई दौऱयात प्रबोधनकार आणि भाऊरावांचा चांगला स्नेह जडला तो कायमचा. ऋणानुबंध कायम राहिला. कारण लोकसेवेविषयी दोघांच्याही भावना नि कल्पना एकगोत्री. तशात ‘साहसे श्रीः प्रतिवसति’ हा दोघांचाही आत्मविश्वास. त्यामुळे परस्परांविषयी प्रेम, आदर निर्माण झाला.

बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास प्रबोधनकार आणि भाऊराव पाटील यांनी घेतला व त्यासाठी ते दोघेही झटले. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झटले. बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक यांना रयत शिक्षण संस्था आधारवड वाटतो. रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून हा लेखप्रपंच!