ठसा – प्रकाश केऱ्हाळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अंजली केऱ्हाळकर

दिगंत  भेदून जाणारी खूप वेगळी व्यक्तिमत्वे असतात. असामान्य कार्यातून समाजऋणाचा एक धागा जोडणारे ते असतात. याच धाग्याचा ओवलेला मणी म्हणजे भुसावळ येथील श्री. प्रकाश केऱ्हाळकर! यांची ओळख म्हणजे समाजाचा आरसा… उत्तुंग, धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता! लहानपणापासूनच वडिलांच्या संघप्रेमाने भारलेलं हे व्यक्तिमत्त्व, संघाचं बाळकडू घेऊन प्रकाशमान झालं.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करत असताना National Organisation of Bank Workers संघटनेमार्फत बँक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या. तसेच कै. दत्तोपंत ठेंगडी व उदयराव पटवर्धन यांच्या संपर्कात आल्यावर प्रकाशराव भारतीय मजदूर संघटनेमार्फत झपाटल्यासारखं काम करत राहिले. दरम्यान आयुध निर्माण, राज्य विद्युत महामंडळ रेल्वे युनियन, भारतीय डाक विभाग, नगरपालिका, विन्ध्य पेपरमील यासाठीही कामगारांच्या हाकेला धावून जात त्यांच्यासाठी जिवाचं रान केलं. एवढय़ावरच न थांबता त्यांना महिलांसाठीही मोलाचं अन् महत्त्वाचं कार्य केलं ते म्हणजे दारूबंदी! यामुळे अनेक मोडणारे संसार प्रकाशरावांनी सावरून दिले. भारतीय मजदूर संघटनेचा वृक्ष मोठा करण्यात प्रकाशरावांचा वाटा फार मोठा आहे.

भुसावळ येथे ब्राह्मण संघाचे सचिव पदसुद्धा त्यांनी तितक्याच जबाबदारीने भूषवले. तिथेही अनेक सुधारणा करून, विस्तार, नूतनीकरण करून मदतीचा हात देऊन कार्यभार विकसित केला. त्यांचा मनमोकळा स्वभाव, धडाडीचं बोलणं, सच्चेपणाची कास धरून ते नेहमी अव्याहत काम करीत राहिले. या संपूर्ण व्यापक चळवळीत कुटुंब व्यवस्था, नातेवाईक, मित्रमंडळ यांनाही तितक्याच आपुलकीने हसत साध देत राहिले. कुणालाही नाराज न करता मनमिळावू स्वभावामुळे ते सगळय़ांच्या मनात ठसा उमटवून होते, सगळय़ांचा आधारस्तंभ बनले. त्यांच्या कार्यक्षेत्राचा परीघ फार मोठा आहे. तरीही स्वतःकडे तटस्थपणे बघण्याची त्यांची वृत्ती होती. आत्मतत्व जगवून एका व्यापक दृष्टिकोनाने बघण्याचा आदर्श घालून भावा-बहिणींचा एक ‘युद्धिष्ठीर’ 22 एप्रिलला काळाच्या पडद्याआड गेला.