लेख – ही ईश्वराची दया!

502

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक झंझावाती व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे दै. ‘मराठा’मधील अग्रलेख वाचण्यास वाचक उत्सुक असत. 13 ऑगस्ट 1968 रोजी त्यांच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण झाली.. तो त्यांचा शेवटचा वाढदिवस. 13 जून 1969 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या सत्तराव्या वाढदिवशी दैनिक ‘मराठा’त त्यांनी लिहिलेल्या ‘ही ईश्कराची दया’ या अग्रलेखातील काही अंश. आचार्य अत्रे यांच्या आजच्या 122 व्या जयंतीनिमित्ताने…

आज वयाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. आम्ही सत्तर वर्षे जगू शकलो, याचे कारण आम्ही आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या लायकीप्रमाणे आणि आपल्या परिस्थितीप्रमाणे कमीत कमी पन्नास वर्षे तरी सतत आपले कर्तव्य – आपले कर्म करीत आलो, हे तर खरेच – पण त्याहीपेक्षा ईश्वराची आमच्यावर कृपा होती, म्हणूनच आम्ही एवढे केले आणि इतके जगलो (किंवा आणखी पुढे जगू). ईश्वरी दयेला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो. या ठिकाणी ईश्वर आहे की नाही आणि ईश्वरावर तुमचा विश्वास आहे की नाही हा वाद हास्यास्पद आहे. कारण तो वाद निर्माण करणारे लोक अडाणी असतात. त्यांनी काही वाचलेले नसते किंवा कसलाही विचार केलेला नसतो. हे जे विश्व डोळ्यांना दिसते आहे. बुद्धीला समजते आहे नि कल्पनेला भासते आहे त्या सर्व विश्वावर ईश्वराची सत्ता आहे. त्याचप्रमाणे या प्रत्येक वस्तू वा हालचाल ही ईश्वराने भरलेली आहे. सारांश, सारे ईश्वरमय आहे हे ध्यानी आल्यावाचून या विश्वाचे कोडे उलगडायचे नाही. कोणी विचारील, की कोठे आहे ती ईशशक्ती? दाखवा. तुम्हाला प्रकट झालेल्या ईशशक्तीचा प्रत्यक्ष पुरावाच पाहिजे असेल तर मानवी शरीराकडे पाहा. चर्म, अस्थी, रक्त, श्लेष्मा इत्यादी निर्जीव गोष्टी मिळून हे शरीर झाले आहे. पण शरीराचे हे कातडे बोलते, पाहते, ऐकते, खाते, ही हाडे चालतात-पळतात हे कसे काय होते? शरीरात काय किल्ली देऊन एखादे यंत्र बसविले आहे का एखादा जादूगार आत दडून बसला आहे? आमच्या लहानपणी शाळेत आम्ही एक कविता शिकलो होतो :

डोळय़ांनी बघतो, ध्वनी परिसतो कानीं, पदी चालतो;
जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचा मुखे बोलतो;
हातांनी बहुसाळ काम करतो, विश्रांतिही घ्यावया,
घेतो झोप सुखे, फिरून उठतो ही ईश्वराची दया!

मानवी जीवनात ‘ईश्वराची दया’ नावाची एक चीज आहे, हे गृहीत धरल्यावाचून आम्हांला तरी आमच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ उमगत नाही. तसे काही आम्ही फार जुन्या काळात जन्माला आलो नाही. टिळक-सावरकर त्या वेळी कारागृहात गेले होते. त्यांच्या राजकारणाचे निनाद दाही दिशांतून उमटत होते. हरिभाऊ आपटय़ांच्या ऐतिहासिक अन् सामाजिक कादंबऱयांनी मराठी वाचकांना अक्षरशः वेडे केले होते. शिवरामपंत परांजप्यांच्या ‘काळा’तल्या अग्रलेखांनी अन् खाडिलकर-केळकरांच्या नाटकांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी भारून गेली होती. श्रीपाद कृष्णांच्या विनोदाने, गडकरी-ठोमरे यांच्या प्रतिभाशाली काव्यांनी मराठी साहित्यात नवीन चैतन्य निर्माण केले होते. गणपतराव जोशी, बालगंधर्व, केशवराव भोसले, गणपतराव बोडस यांच्या गायनाने नि अभिनयाने मराठी रंगभूमीला वैभवाच्या कळसावर नेऊन बसविले होते. टिळक अन् गोखले यांच्या नावांशी निगडित झाल्यामुळे भारतीय राजकारणाच्या प्रेरणेचे केंद्र म्हणून पुण्याकडे सारे भारतवर्ष आदराने पाहत होते. त्या काळी पुण्यात नुसते राहणे हीच मुळी भाग्याची गोष्ट होती. त्या वेळी आम्ही उडिपीला असतो तर कदाचित उत्तम आचारी झालो असतो. तासगावला असतो तर सर्कसमधील खेळाडू झालो असतो. पंढरपूरला असतो तर कदाचित यात्रेकरूंना लुटणाऱया बडवे मंडळींत सामील झालो असतो. नाही कोणी म्हणावे? कोणत्या काळी आपण कोठे जन्माला यावे नि आपले कोठे वास्तव्य घडावे यालाही खरोखर भाग्य लागते. हिलाच आम्ही परमेश्वराची दया म्हणतो. सारांश, आमचे सारे आयुष्य म्हणजे ईश्वरी दयेमुळे घडून आलेल्या एकापेक्षा एक विलक्षण चमत्कारांची एक लांबलच्चक मालिका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या