प्रमिला दातार

> शिल्पा सुर्वे

ऑर्केस्ट्रा म्हटलं की, जुनी पिढी नॉस्टॅल्जिक होते. स्टेजवर एकसमान पोशाख घातलेली मंडळी, हातात ढोलकी- कीबोर्ड, कुणी सेक्सोफोन घेऊन उभा, कुणाच्या गळ्यात गिटार, जोडीला बॉंगो, काँगो. पडदा वर जाताच म्युझिक पीस दणक्यात सादर होऊन निवेदकाचे मधाळ शब्द आणि पुढचे तीन तास सुरेल गीतांची बरसात. त्याला टाळ्या, वन्समोअरची साथ, आठवणी-किस्से, मिमिक्री, असा उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम. एक वेगळीच धुंदी घेऊन प्रेक्षक बाहेर पडायचे. सारंच भारावून टाकणारे असायचे.

साधारणतः 70 आणि 80 च्या दशकात ऑर्केस्ट्रा हा मंत्रमुग्ध करणारा आविष्कार रसिकांनी अनुभवला. ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला ‘हाऊसफुल’ बोर्ड झळकवले जायचे. वर्तमानपत्रांत रकानेच्या रकाने जाहिराती असायच्या. छोटे समारंभ, गणेशोत्सव-नवरात्रीपासून लग्नसमारंभात ऑर्केस्ट्रा शो व्हायचे. अनेक कलावंतांची खाण त्यातून पुढे आली. त्या काळात मोजके, पण दर्जेदार ऑर्केस्ट्रा ग्रुप पाय रोवून उभे होते. अशोककुमार सराफांचा मेलडी मेकर्स, महेशकुमारचा ‘महेशकुमार अँड हिज ऑर्केस्ट्रा’, बाबलाभाई ऑर्केस्ट्रा, कलाकार, झंकार असे ग्रुप गाजत होते. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रमिला दातार आणि त्यांचा ‘सुनहरी यादे’ ऑर्केस्ट्रा. एका महिलेने ऑर्केस्ट्राच्या विश्वात एन्ट्री करून यश मिळवले. प्रमिला दातार या पहिल्या महिला ऑर्गनायझर ठरल्या. ‘सुनहरी यादे’ची संकल्पना, निर्मिती, गायन-निवेदन सबकुछ प्रमिला दातार. वन वुमन शो! प्रमिला दातार यांनी 14 एप्रिल 1975 रोजी ‘सुनहरी यादें’चा पहिला शो पुण्यात केला. सुरुवातीला त्यांना अनुभव असा काहीच नव्हता. रोज नित्यनवा अनुभव. अल्पावधीत हा शो हिट झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘सुनहरी यादें’चे सरासरी महिन्याला वीस कार्यक्रम व्हायचे. त्यांनी 1975 ते 2001 पर्यंत सुमारे चार हजार शो केले. 2001 नंतर प्रमिलाताईंनी शो करणे थांबवले. त्यानंतर आता 22 वर्षांनी ते 4001 वा कार्यक्रम करणार आहेत. ‘सुनहरी यादें’ची खासीयत म्हणजे मराठी-हिंदी गीते, भावगीतं, लावणीचा ठेका! प्रमिलाताईंच्या आवाजातील ‘पाडाला पिकला आंबा’ गाणं तर प्रेक्षक डोक्यावर घ्यायचे. हमखास वन्समोअर ठरलेला. याची आठवण सांगताना प्रमिलाताई म्हणाल्या, एकदा प्रेक्षकांनी माईंकडे म्हणजे सुलोचनाबाईंकडे मागणी केली की, प्रमिला दातारांची ‘पाडाला पिकला आंबा’ लावणी म्हणा. माई भडकल्या, म्हणाल्या, प्रमिलाची नाही, माझी लावणी आहे! अशा अनेक आठवणींचा खजिना प्रमिला दातार यांच्याकडे आहे. त्यांच्या भैरवीचे सूर मनात साठवून प्रेक्षक बाहेर पडायचे. प्रमिला दातार यांनी गायक तलत मेहमूद, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे यांच्यासोबत देश-विदेशात अनेक शो केले. प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र आणि वसंत देसाई हे गुरू त्यांना लाभले. सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ कार्यक्रमात त्यांनी अनेक गाणी गायली. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘हाऊस ऑफ बॅम्बू’ ही प्रमिलाताईंची गाजलेली गाणी. वसंत देसाई यांच्या ‘एक सूर एक ताल’ उपक्रमात त्यांचा सहभाग होता. त्याअंतर्गत शाळाशाळांमध्ये जाऊन बालभारतीची गाणी शिकवायचे. ‘बायांनो नवरे सांभाळा’ यातील गाण्याकरिता त्यांना सूरसिंगार संसद या संस्थेचा मियां तानसेन पुरस्कार मिळाला होता. त्यांनी 26 वर्षे हा सुरेल आविष्कार सादर करून रसिकांना तृप्त केले आणि एका उंचीवर असताना त्या थांबल्या.

तसं पाहिलं तर नव्वदीनंतर ऑर्केस्ट्राची क्रेझ कमी झाली. खासगी चॅनेल्सचे पेव फुटल्याने प्रेक्षकांना घरच्या घरी मनोरंजन मिळू लागले. त्यातच शो करणे व्यावसायिकदृष्टय़ा अडचणीचे ठरू लागल्याने ऑर्केस्ट्राचे कलावंतही अन्य माध्यमांकडे वळले. असे असले तरी ऑर्केस्ट्रा संपलेला नाही. आजही अशा कार्यक्रमांना गर्दी होते. जोपर्यंत दर्दी संगीतप्रेमी आहेत, तोपर्यंत ऑर्केस्ट्राची धून छेडली जाणारच. शो थांबले तरी प्रमिलाताईंचे गाणे सुरू होते. नवमाध्यमांशी जुळवून घेत त्यांनी गेल्या दोन वर्षांत हार्मोनियमवर गायलेली 470 गाणी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोचवली. त्यांच्या चाहत्यांनी, कुटुंबातील सदस्यांनी केवळ आठवण म्हणून पुन्हा रंगमंचावर ‘सुनहरी यादे’ ऑर्केस्ट्राचा एक शो करण्याचे प्रमिलाताईंना सुचवले. सगळ्यांच्या इच्छेखातर त्या वयाच्या 81व्या वर्षी ‘सुनहरी यादे’ जागवायला सज्ज झाल्या आहेत. गुढीपाडव्याला म्हणजे 22 मार्चला शिवाजी मंदिरात हा प्रयोग होणार आहे. कन्या वंदना आणि शर्मिला यांच्या मदतीने त्यांनी हा शो आयोजित केलाय. ऑर्केस्ट्राच्या सुवर्णकाळातील ‘सुनहरी यादें’ नावाचं मानाचं पान पुन्हा एकदा फडफडणार आहे.