लेख – ठसा – प्रमिलाताई म्हैसकर

1343

>> जे .डी . पराडकर

आयुर्वेदिक औषधांचा परिणाम थोडा उशिराने झाला तरी त्यांचा अपाय होत नसल्याने कोकणात या औषधांचा आजही मोठ्या विश्वासाने घरोघरी वापर केला जातो. कोकणच्या ग्रामीण भागात वनौषधींची माहिती असणारी जाणकार मंडळी आजही घराघरातून आहेत. आजीबाईचा हा औषधी बटवा म्हणजे कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो. श्रावण, भाद्रपद महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाटणच्या दुर्गम भागातून अनेक वैदू आयुर्वेदिक औषधे घेऊन कोकणात दरवर्षी विक्रीसाठी येतात. यामुळे आयुर्वेद आणि कोकण यांचे फार पुरातन नाते यातून अधोरेखित होते . कावीळ या भयंकर आणि जिवघेण्या आजारावर गावठी औषध फार गुणकारी समजले जाते.

तेऱ्ये बुरंबी येथील प्रमिलाताई श्रीकांत म्हैसकर या वयाच्या 80व्या वर्षीदेखील काविळीवर मोफत औषध देऊन रुग्णांना बरे करीत आहेत. या मोफत औषधोपचाराचा आजवर हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये बुरंबी हे प्रमिलाताईंचे गाव. या गावाला प्रमिलाताईंनी आपल्या मोफत रुग्णसेवेतून एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे पती येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. फावल्या वेळात काहीतरी काम हवे म्हणून त्यांनी माहीत असलेल्या वनौषधींपासून काविळीवर औषध द्यायला सुरुवात केली. रुग्णांना बरे वाटू लागल्याने प्रमिलाताईंच्या औषधाची ख्याती केवळ संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिह्यापुरती मर्यादित न राहता ती मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहचली. उपचारासाठी येणारा रुग्ण गरीब असो अथवा श्रीमंत कोणाकडूनही औषधाचे मोल घ्यायचे नाही, असा निग्रहच प्रमिलाताईंनी अगदी सुरुवातीलाच केला. असंख्य रुग्ण काविळीच्या आजारातून बरे झाल्यानंतर प्रमिलाताईंना आवर्जून भेटायला येतात आणि पैसे घेण्याचा आग्रह करतात. मात्र प्रमिलाताईंनी आजवर एकाही रुग्णाकडून एक रुपयाही स्वीकारलेला नाही. काविळीवर औषध द्यायचे म्हणजे ती वनस्पती अथवा मुळं सहज उपलब्ध होण्यासाठी प्रमिलाताईंनी याची आपल्याच घरपरडय़ात लागवड केली आहे. या वनस्पतींची त्या 80व्या वर्षीही स्वतः जोपासना करतात.

आजही त्या देवपूजेसाठी लागणारी फुले चाफ्याच्या झाडावर स्वतः चढून काढतात. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या प्रमिलाताई कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून ओळखल्या जातात. रुग्णांना काविळीवर दिले जाणारे औषध पाट्यावर वाटावे लागते, हा सर्व खटाटोप त्या स्वतः आनंदाने करतात. गेली 50 वर्षे प्रमिलाताई काविळीवर मोफत औषध देत आहेत. मोफत औषध सेवेबरोबरच परिस्थितीने अत्यंत गरीब असणारी मुले, मुली यांना स्वतःच्या घरी आसरा देऊन त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचे व्रतही त्यांनी जोपासले आहे. या मुलांना दहावी-बारावीपर्यंत शिकवून त्यांना दिशा देण्याचे काम प्रमिलाताई त्यांचे मुलगे दिलीप, दीपक, प्रसाद आणि सुनादेखील तेवढय़ाच प्रेमाने आणि कर्तव्यभावनेने करीत आहेत. त्यांच्या या अविरत रुग्णसेवेबद्दल आणि सामाजिक बांधिलकेबद्दल अनेक सामाजिक संस्था आणि मान्यवर मंडळींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रमिलाताईंकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यातीलच कावीळग्रस्त रुग्ण येतात असे नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतील रुग्ण येत असतात. या सर्वांची प्रमिलाताई हसतमुखाने औषध देऊन सेवा करतात. कोकणात पिण्यासाठी पाटाचे अथवा झऱ्याचे पाणी वापरले जाते. बऱ्याचदा हे पाणी शुद्ध न केल्याने या अशुद्ध पाण्यापासून काविळीसारखा भयंकर आजार होतो. या आजारावर आयुर्वेदिक औषधांचा हमखास असर होत असल्याने बहुतांशी रुग्ण तेऱये बुरंबी येथील प्रमिलाताई म्हैसकर यांच्याकडे मोफत औषध घेण्यासाठी जातात.

आपली प्रतिक्रिया द्या