पुस्तकावर बोलू काही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मिस्त्री

एकीकडे ग्रंथालये ओस पडत आहेत. वाचनाची आवड कमी होत आहे. मराठी पुस्तकांना मागणी कमी होत आहे. अशावेळी अमेरिकेहून महाराष्ट्रात एक मराठी तरुण परत येतो, दुसरा कुठलाही भरपूर पैसा मिळवून देणारा व्यवसाय करण्याऐवजी स्वतःची आवड जोपासणारा ‘वाचनालय’ हा प्रकार निवडतो, बंद पडणारी वाचनालये चालवितो, नवी-जुनी पुस्तके योग्य किमतीत विकतो… या पुस्तकवेडय़ा प्रसाद कुलकर्णी यांच्याविषयी…

पुस्तकांचे खूप गठ्ठे सांडले होते. साफसफाई करताना घरच्यांना त्रास होतो म्हणून एक दिवस पुस्तकांचे गठ्ठे बांधले आणि गिरगावातील एडवर्ड थिएटरजवळील ‘ओल्ड ऍण्ड न्यू बुक्स’ या पुस्तकांच्या दुकानात विकून आलो. पुस्तकांच्या दुकानात मानकामे नावाचे गृहस्थ बसत. त्यांनी पाच हजार रुपये त्या काळी रोख दिले. घरी आलो. माझा पडलेला चेहरा पाहून आईने काय झालं विचारलं. तिला सर्व सांगितलं. ती म्हणाली, ‘‘मला पुस्तकांची काहीच अडचण होत नाही. तू पुस्तकं परत घेऊन ये.’’ तो काळ पुस्तके वाचण्याचा होता. रात्रभर न झोपता ते पुस्तकांचं दुकान उघडायच्या आत दुकानाबाहेर जाऊन उभा राहिलो. मानकामेना पैसे परत दिले. त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, तुमच्यासारखे पुस्तकवेडे पुस्तके परत न्यायला येतात. म्हणून तुमचा पुस्तकांचा गठ्ठा मी गिऱहाईकं आलेली असताना त्यांना न विकाता तसाच जपून ठेवला होता. म्हणून ती पुस्तके परत मिळाली.’’

पुस्तकांच्या खरेदीच्या निमित्ताने असाच एक मित्र भेटला. प्रसाद कुलकर्णी नावाचा, पुण्याचा. तोही माझ्यासारखाच पुस्तकवेडा. मी फक्त पुस्तके विकत घेतो, वाचतो. पण माझा मित्र प्रसाद कुलकर्णी दुसऱयांसाठी पुस्तके विकत घेतो. www.halfpricebooks.in वर ही पुस्तके मिळतात. नवीन पुस्तके दुकानात, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिलवर विकत मिळतात. पण दुर्मिळ पुस्तकांची नव्याने छपाई होत नाही. त्यामुळे वाचकांना हवे असेल तर मिळणे दुरापस्त. म्हणून प्रसादने लायब्ररी उघडली. अंदाजे दोन ते तीन लाख पुस्तके त्याच्या वाचनालयात आहेत. पुस्तके वाचायलाही घरी नेता येतात आणि जुनी दुर्मिळ पुस्तके योग्य, अल्प किमतीत विकतही घेता येतात.

जुनी पुस्तके रद्दीच्या भावातच विकली जातात, पण असा एक ग्राहकवर्ग आहे, त्याच्यापर्यंत ती पुस्तके पोहोचविण्याचं काम मित्र प्रसाद कुलकर्णी करतो. अमेरिकेत बरीच वर्षे कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर आपल्या देशात, महाराष्ट्रात जाऊन काही तर वेगळे करावे असे प्रसादला वाटले. लहानपणी आईवडिलांचा प्रचंड गंथसंग्रह होता. त्यातून त्याला वाचनाची आवड लागली. म्हणून अमेरिकेतून परतल्यावर इतर कोणताही भरपूर पैसे देणारा व्यवसाय न करता प्रसादने त्याची आवड जोपासणारा ‘वाचनालय’ हा प्रकार निवडला. बंद पडणारी वाचनालये तो चालवायला घेतो. मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली, संस्कृत पुस्तके तो विकतो. प्रसाद म्हणतो, अमेरिकेतील सरकारी वाचनालयेही कॉर्पोरेट कार्यालयांसारखी असतात. वाचनालयाला एवढे महत्त्व तिथे दिले जाते. धार्मिक पुस्तकांना महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांतून प्रचंड मागणी असते. बेलसरे यांच्या ‘दासबोध’ला प्रचंड मागणी असते. भगवद्गीता दीडशे प्रतिही विकल्या जातात. सुरुवातीला बावीसशे सभासद होते. त्यांना घरपोच पुस्तके दिली जात. प्रसाद सांगतो, लॉकडाऊनमध्ये त्याने दुर्मिळ अशी पंधरा ते सतरा हजार पुस्तके विकली. एक लायब्ररी बंद झाली. त्या वाचनालयात जुन्या लेखकांची म्हणजे. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज, इंदिरा संत, जयवंत दळवी, वि. स. खांडेकर यांची पुस्तके होती. ती पुस्तके काही तासांतच विकली गेली. काही जण ग्रामीण भागांतून पुस्तकांच्या कायम ऑर्डर देत असतात. ती पुस्तके ते कदाचित ग्रामीण भागात विकत असावेत. चुकून पायरेटेड कॉपी आली आणि ती विकली गेली तर प्रसाद त्या ग्राहकाचे पैसे परत करतो. जुन्या पुस्तकांना प्रचंड वलय आहे. अमेरिकेत एकेका लायब्ररीत पाच-पाच लाख पुस्तके असतात. प्रसाद कुलकर्णींकडे अगदी गुजरातमधील मोरबीसारख्या शहरातूनही पुस्तकांची मागणी येते. रोज सरासरी दोन हजार लोक त्यांच्या वेबसाईटला भेट देतात. त्यांच्याकडे चौदा लोक जुनी पुस्तके नीटनेटकी करण्याचं काम करतात. पुस्तकांना प्लॅस्टिक कव्हर्स घालण्याचं काम काही अंध मुली करतात. वाचनाची आवड स्वतः जोपासताना इतरांनाही वाचावयास लावणे ही मोठी कला आहे. प्रसाद कुलकर्णी ते सफाईने करीत आहे. मस्तक शिस्तबद्ध करण्याची ताकद पुस्तकात आहे. वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा बहर यावा म्हणून असे प्रसाद कुलकर्णी यांच्यासारखे रसिक पुढे आले तर आपला देश नक्कीच शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत बनेल.

[email protected]