लेख – ठसा – प्रा. चंद्रकांत पाटील

2638

>> प्रशांत गौतम

मराठीहिंदीतील ज्येष्ठ कवी, समीक्षक, अनुवादक, संपादक प्रा. चंद्रकांत पाटील यांना यंदाचा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान नुकताच जाहीर झाला आहे. या सन्मान पुरस्काराचे वितरण आज भोपाळ येथे होत आहे. मराठी/हिंदी भाषेत सृजनशील लेखन, सक्रियता आणि दोन भाषांना जोडण्याचे योगदान दिल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून हिंदी साहित्य समृद्ध केल्याबद्दल इतर भाषिक साहित्यिकाला असा पुरस्कार दिला जातो. खरे तर पाटलांचे कार्यक्षेत्र वनस्पतिशास्त्राच्या अध्यापनाचे. मराठवाडा विद्यापीठातून 1965 साली एम.एस्स़ी प्राप्त केली आणि पुढे 1984 च्या सुमारास जीवरसायनशास्त्रात पीएच़ ड़ा ही संपादन केली. 1965 ते 2004 या काळात सरस्वती भुवन महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. काही वर्षे या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य, अकॅडमिक कौन्सिल, एच.एस.सी. बोर्डाच्या वनस्पतिशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आणि पुढील काही वर्षे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या हिंदी बी.ए., एम.ए. अभ्यासक्रम मंडळाचे सदस्यपदही भूषवले. हे सर्व करीत असतानाच हिंदी-मराठीतील कविता लेखन, समीक्षा, अनुवाद आणि संपादनाचे कार्यही जोमात सुरू ठेवले.

पाटील मूळ अंबाजोगाईचे. संभाजीनगरात त्यांचे विविध आघाड्यांवर कार्य विस्तारले. आता पुणेकर झाले असले तरी त्यांचे त्यांच्या मित्रपरिवाराशी, मराठवाडा साहित्य परिषदेशी प्रदीर्घ काळापासून असलेले ऋणानुबंध कायम आहेत. पाटील यांच्यातील लेखक आणि कार्यकर्ता हे महत्त्वाचे गुणविशेष सोबतच विस्तारले. लघुनियतकालिकाची चळवळ असो,  वाचा या लघुनियतकालिकाचे संपादन असो किंवा या प्रकाशन संस्थेची उभारणी असो, त्यासाठी केलेल्या चळवळीत ते सक्रिय असत. विद्यार्थीदशेत मराठवाडा विकास आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना दहा दिवसांची तुरुंगवासाची शिक्षाही मिळाली. पाटील यांच्या हिंदी/मराठीतील लक्षणीय योगदानाच्या कार्यास या सर्व साहित्य, साहित्यबाहय़ कार्याची जोड लाभली. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा बहुआयामी होत गेला. मराठीत 1967 पासून, तर हिंदीत 1973 पासून त्यांचा कार्यप्रवास सुरू झाला व विविध टप्प्यांवर विस्तारला. साहित्यप्रेम हा केंद्रबिंदू कायम ठेवतच परीघ मात्र सतत विस्तारत ठेवला. रायभान जाधव, भा. ल. भोळे, कमलाकर सोनटक्के, ना. धों. महानोर, भालचंद्र नेमाडे, ढसाळ, ढाले, नरहर कुरुंदकर, तु. शं. कुलकर्णी ही सर्व तत्कालीन समकालीन मित्रमंडळी पाटलांच्या संभाजीपेठेतील घरी जमत. गप्पांचे फड रंगत. चर्चा झडत आणि वादविवादही होत असत. कवितांच्या सादरीकरणाने घर दणाणून जात असे. या दिलखुलास मैत्रभाव जपण्यातून याच घरातून अनेक वाङ्मयीन उपक्रम, विविध वाङ्मयीन चळवळी सुरू झाल्या.

पाटील यांचे दोन्ही भाषांतील लेखनकार्य लक्षणीय आहे. त्याचा कार्यविस्तारही व्यापक आहे. त्याविषयी त्या वेळी प्रसिद्धही झाले आहे. म्हणून ती पुनरावृत्ती टाळून अनुवाद कार्य अधोरेखित करणे महत्त्वाचे वाटत़े ते द्विभाषिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकाच वेळी दोन भाषांत लेखन करणाऱ्या लेखकांची मराठी साहित्याला परंपरा आहे. दि. पु. चित्रे, अरुण कोल्हटकर, विंदा करंदीकर यांनी मराठी/इंग्रजीतून लेखन केले त्याचप्रमाणे पाटील यांनी मराठी, हिंदीत समीक्षा लेखन केल़े मराठीतील कवितांचा हिंदीत व हिंदीतील कवितांचा मराठीत अनुवाद अतिशय प्रभुत्वाने सिद्ध केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे कवितेसोबतच कादंबरी, वैचारिक गद्य लेखन, कथा, नाटक, चरित्र आलेख या साहित्य प्रकारांचाही अनुवाद केला आहे. समकालीन हिंदी कविता हे यासंदर्भातील महत्त्वाचे पुस्तक होय अनुवादाच्या 9 पुस्तकांमधून चंद्रकांत देवताले, श्रीकांत वर्मा, अशोक वाजपेयी, विष्णू खरे, के. सच्चितानंद या महत्त्वाच्या हिंदी कवींसह संगिनी (हिंदी स्त्री कविता), जागतिक भाषांचे अनुवाद, दलित कविता, नामदेव ढसाळांची कविता अनुवादाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचल़ी हजारेक कवितांचा अनुवाद, दीर्घकाव्याचा अनुवाद हा महत्त्वाचा टप्पा पार करताना पाटील यांनी सृजनशीलता व भाषाज्ञान जपले, विस्तारले. या कार्याला जोड म्हणून भाषेतील अनुवाद कार्य संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा, बहुभाषिक कविसंमेलन, चर्चासत्र इत्यादींच्या आयोजनात पाटील सतत सक्रिय असत. या सर्व कार्याचा साहित्य अकादमीसह   मराठी, हिंदीतील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. त्यात मध्य प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मानाची भर पडली आहे. मराठवाडी, मराठी पाटलांचे हे बहुभाषिक कार्य महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या