शिकवणे ही पहिली आवड

>> शैलेश माळोदे

रसायन आणि ऊर्जेवीण स्वतःच्या भरीव योगदानासमवेत विज्ञान शिकवणे हा प्रा. जे. बी. जोशींचा छंद आहे.

देशातील ऊर्जा प्रश्न खरं तर विकासाच्या पॅराडाईमचा प्रश्न असून शेतीजन्य साधनांचा विनियोग करूनदेखील काही प्रमाणात नवं प्रवर्तनातून समस्येवर उत्तर प्राप्त करणं शक्य आहे.’’ प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र ऊर्फ जे. बी. जोशी यांनी हे उद्गार माझ्याशी बोलताना काढले.

पद्मभूषण हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अभियांत्रिकीतील कामगिरीबद्दल 2014 साली प्राप्त झालेले प्रा. जोशी आपल्या सुरुवातीच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी आणि ग्रामीण पार्श्वभूमीविषयी अगदी ओथंबून बोलताना म्हणाले, माझा जन्म मसुर या सातारा जिह्यातील एका लहानशा गावात झाला. माझे वडील काका जोशी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात. सर्वांना मदत करणारे, अडीअडचणीला धावून येणारे कुटुंब म्हणून जोशी सर्वत्र ओळखले जात. मी बी.ई. आणि एम.ई. पदवी यूडीसीटीतूनच संपादन केली. त्यानंतर प्रा. शर्मांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनास सुरुवात केली. मला डॉक्टरेट प्राप्त झाली. यूडीसीटीत व्याख्याता म्हणून शिकवू लागलो होतो. तेव्हापासून मी माझी जवळपास संपूर्ण कारकीर्द यूडीसीटीतच व्यतीत केली असून 2009 साली संचालक म्हणून निवृत्त होईपर्यंत जवळपास चार दशकं मी संस्थेत होतो. यूडीसीटीचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर ते अणुऊर्जा विभागाच्या मुंबईतील होमी भाभा राष्ट्रीय संस्थेत होमी भाभा अध्यासनवरील प्राध्यापक होते. सध्या ते मानद प्राध्यापक म्हणून अणुऊर्जा विभाग, मुंबईत कार्यरत आहेत. प्रा. जे. बी. जोशी त्यांच्या मल्टिफेज रिऍक्टर्सविषयक नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विशेषतः डिझाईनिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी देशात आणि विदेशात अनेक व्यापारिक तत्त्वावर यशस्वी ठरलेल्या अनेक रिमॅक्टर्सच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी घरगुती वापरासाठी उपयुक्त असलेल्या अनेक कुकर्स आणि स्टोव्हची औष्णिक कार्यक्षमता 50 ते 60 टक्क्यांपर्यंत सुधारित केलेल्या डिझाईन्सची निर्मिती केली आहे. साधारणपणे नेहमीच्या कुकर्सची कार्यक्षमता केवळ 12 ते 20 टक्क्यांइतकीच असते. हे तंत्रज्ञान त्यांनी व्यापारिक वापरासाठी खुलं केलं आहे. विविध रासायनिक प्रक्रिया आणि उद्योगांकरिता त्यांनी अनेक अभियांत्रिकी उत्तरं तयार करून उपलब्ध करून दिली आहेत. जवळपास साडेचारशे शोधनिबंध त्यांनी विविध शोधनियतकालिकांमधून प्रकाशित केले असून गुगल स्कॉलरवर त्यांना 10,772 सायटेशन्स प्राप्त झाले आहेत.

संशोधनाबरोबरच शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलंय. त्यांनी यूडीसीटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आहे. प्रा. जोशी म्हणतात, ‘सध्या यूआयसीटी जगातील सर्वोत्कृष्ट दहा संस्थांपैकी आहे. रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करता संस्थेसाठी देणग्या, संशोधन कंत्राटं आणि प्रकल्प सल्लागार सेवांची संधी प्राप्त करून देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये मी अग्रेसरत्व संचालक म्हणून मिळवलेलं आहे.’ प्रा. जोशी मेंटर-टीचर म्हणून त्यांनी 80 डॉक्टरेट आणि 59 मास्टर्स आणि 20 पोस्टडॉक्टर विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन केलंय.

शैक्षणिक कार्याशिवाय प्रा. जे. बी. जोशी यांनी विविध पिअर्डरिह्यूड संशोधन नियतकालिकांच्या संपादक वा सल्लागार मंडळावर कार्य केलंय. त्यात केमिकल इंजिनीअरिंग सायन्स जर्नल, केमिकल इंजिनीअरिंग, रिसर्च ऍण्ड डिझाईन जर्नल आदींचा समावेश आहे. प्रा. जोशी यांना समाजासाठी कार्य करायचं होतं. याच दृष्टिकोनातून त्यांनी म. वि. प. च अध्यक्षपद स्वीकारलं. परंतु देशांतर्गत उद्योगासाठी मदत करण्याच्या उद्दिष्टाने संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जे. बी. जोशी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. पाच पेटंटदेखील त्यांच्या नावावर जमा आहेत. नवीन पिढीसाठी प्रा. जे. बी. जोशी हे कायम उपलब्ध असतात. ते म्हणतात, ‘तरुणांना करण्यासाठी कामांची आणि आव्हानांची कमतरता नाही, फक्त पूर्ण क्षमतेनं झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी हवी. त्यासाठी ज्येष्ठांना त्यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यांना पारितोषिकं देऊन कौतुक करायला हवं. मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयं आणि विद्यापीठ स्तरावरील पारितोषिकांच्या माध्यमातून आम्हाला हेच साध्य करायचं आहे.’ असे शिक्षक मार्गदर्शक असल्यास तरुणांनी थांबायलाच नको, थेट कार्यरत व्हायला हवं, नवीन ऊर्जा आणि प्रेरणांसह.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या