ठसा : प्राचार्या लीलाताई पाटील

2183

>> प्रशांत गौतम

ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि शिक्षणतज्ञ लीला पाटील यांना अ. भा. मराठी बालकुमार संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. याआधी हा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांना प्राप्त झाला होता. ख्यातनाम लेखक प्रा. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्या भाचेसून आहेत. ही महत्त्वाची ओळख आयुष्यभर कायम ठेवतच त्यांनी बालसाहित्य लेखन आणि शिक्षण क्षेत्र यात आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली. 28 मे 1927 रोजी पुण्यात जन्म झालेल्या लीलाताईंनी मुंबई विद्यापीठातून 1947 मध्ये बी. ए. ऑनर्स पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठातून बी. एड. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. सामाजिक कार्याच्या प्रवासात त्यांना जे. पी. नाईक, प्राचार्य भागवत, डॉ. चित्रा नाईक यांचा प्रेरक सहवास लाभला. 1940 ते 1946 अशी सहा वर्षे त्या सेवादलात सक्रिय राहिल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सहभाग घेतला. 1948 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. सुस्वभावी, शेतकरी, तरुण एकुलत्या एक मुलाच्या आईपणाची भूमिका निभावताना, आनंदात रममाण असताना 1973 मध्ये त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यूचा हा आघात त्यांनी सहन केला, मात्र त्यांचे कार्य खंडित झाले नाही. कोल्हापूर पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा, महिला दक्षता समितीच्या मार्गदर्शिका, शिक्षक मंचच्या उपाध्यक्षा, महाराष्ट्र पालक-शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षा, सृजन आनंद विद्यालय व सृजन आनंद शिक्षण संस्थेच्या प्रवर्तक, मनोरमा विश्वस्त कुंज संघाच्या अध्यक्षा अशा कितीतरी क्षेत्रांत सतत कार्यरत राहून त्यांनी वैविध्यपूर्ण काम केले. काम करताना आलेले अनुभव त्यांनी विविध लेखनाच्या निमित्ताने मांडले. मिळून साऱया जणी, स्त्र्ााr, किर्लोस्कर या प्रमुख नियतकालिकांसह अन्य प्रमुख दैनिकांतून लीलाताईंनी शैक्षणिक, सामाजिक विषयांवर लेखन केले. कोल्हापूर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामार्फत, जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांची तेरा पुस्तके प्रकाशित झाली. सृजन आनंद विद्यालय व सृजन आनंद शिक्षण क्षेत्र या दोन संस्थांच्या त्या प्रवर्तक, मार्गदर्शक व शिक्षक अशा तिन्ही भूमिकांतून शिक्षण क्षेत्र आणि बालसाहित्य या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी त्यांनी कार्यरत राहून वैशिष्टय़पूर्ण कार्य केले. त्यांच्या या लक्षणीय कार्याची नोंद 1997 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्राच्या कन्या’ या गौरव ग्रंथात प्रा. राम जोशी यांनी घेतली. शिक्षक-पालक संघाच्या कार्य प्रवासात त्या या दोन्ही महत्त्वाच्या घटकांशी जोडल्या गेल्या. महिला दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांचे महिलांसाठी कार्य झाले. ‘अभिआस’ या स्वयंप्रवर्तित गटाच्या मार्गदर्शिका व सदस्या म्हणूनही त्यांनी कार्य बजावले. महायोगिनी बहिणाबाई, ओलांडताना, शिक्षण घेता-घेता, बालहक्क, संत रामदास, संत चोखामेळा, परिवर्तनातील शिक्षण, शिक्षणातील ओऍसिस, प्रवास ध्यासाचा, आनंद सृजनाचा, ऐलमा पैलमा शिक्षण देवा, संत मुक्ताबाई, मूल्य शिक्षण विचारधन, लिहिणं मुलांचं, शिकवणं शिक्षकांचं, बहादूर मुला, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, शिक्षणातील लावण्य, अर्थपूर्ण आनंद-शिक्षणासाठी, संत गोरा कुंभार, भागवतधर्मी संत नामदेव, जिजामाता, थोर रयत सेवक कर्मवीर भाऊराव पाटील, परीच्या घरी, मुलांनो थोडं ऐका, अशी विपुल साहित्यसंपदा लीलाताईंच्या नावावर आहे. संत साहित्य, बालसाहित्य आणि शिक्षण क्षेत्र यातील त्यांनी केलेले लेखन आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. लीलाताईंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची नोंद विविध पुरस्कारांनी ठळकपणे घेतली. ‘ओलांडताना’ या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक 1988 मध्ये प्राप्त झाले. सृजन आनंद केंद्रास कोरेगावकर ट्रस्टचा पुरस्कार 1990 मध्ये मिळाला, त्याचप्रमाणे डॉ. गोवर्धनदास पारेख, श्रीमती राजमती पाटील, श्रीमती मंगला पोटे, असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फेही त्यांचा सामाजिक कार्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ना. सी. फडके यांची कन्या व कर्मवीर भाऊराव पाटलांची भाचेसून हे तर वलय त्यांच्या भोवती होतेच, पण त्यापेक्षाही कर्त़ृत्वाने त्यांनी आपल्या कार्याचा प्रवास बहुआयामी केला. ज्याला लोकमान्यता व राजमान्यताही प्राप्त झाली. लेखिका आणि कार्यकर्ती अशा दोन्ही भूमिका त्यांनी शिक्षण क्षेत्र, सामाजिक कार्य आणि बालसाहित्य या क्षेत्रात काम करताना पार पाडल्या आहेत. आज लीलाताईंचे वय 92 वर्षे आहे. पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने त्यांची निवड जीवनगौरव पुरस्कारासाठी केली आहे. संस्थेचे पदाधिकारी हा पुरस्कार आज (16 सप्टेंबर) कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी जाऊन देणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या