लेख – पुलित्झर पुरस्कार आणि वाद

768

जगभरातील इतर पत्रकारांबरोबर तीन हिंदुस्थानी वृत्त छायाचित्रकारांनादेखील पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. कश्मीरमधील परिस्थितीबाबत त्यांनी काढलेली छायाचित्रे पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तथापि हे पुरस्कारही वादाच्या भोवर्‍यात सापडले. पुलित्झर पुरस्कारावरून वाद होऊ शकतात, पण कश्मीरमधील परिस्थिती आणि सीमेवर सातत्याने होणार्‍या चकमकी याबद्दल तर वाद होऊ शकत नाही?

कश्मीरमधील तीन छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले. त्यावरून देशात राजकीय धुळवडही साजरी झाली. काय आहे हा पुरस्कार? हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. वृत्तपत्र, साहित्य, संगीत क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरीबद्दल 21 पुरस्कार याद्वारे दरवर्षी देण्यात येतात. 1917 साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी हा पुरस्कार सुरू केला. न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. 2017 पर्यंत दहा हजार डॉलर्स रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सध्या ही रक्कम पंधरा हजार डॉलर्स करण्यात आली आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही दिले जाते. जोसेफ पुलित्झर यांच्या मृत्युपत्रानुसार, लेखनास प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. हा पुरस्कार कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो. या पुरस्काराला पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हटले जाते. पुलित्झर पुरस्कारप्राप्त हिंदुस्थानी मान्यवर पुढीलप्रमाणे आहेत-

गोविंद बिहरीलालाल हे पुलित्झर पुरस्कार मिळवणारे हिंदुस्थानी मूळ असलेले पाहिले पत्रकार होते. ते बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना 1937 मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला. पुढे हिंदुस्थान सरकारनेही त्यांच्या साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल 1969 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. हिंदुस्थानी वंशाच्या झुंपा लाहिरी यांना ‘इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज’ या पुस्तकासाठी ‘कादंबरी’ गटात हा पुरस्कार 2000 मध्ये मिळाला. त्यांच्या ‘द नेमसेक’ या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला होता. त्या बंगाली वंशाच्या असून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या होत्या.

गीता आनंद या हिंदुस्थानी वंशाच्या पत्रकार महिलेस 2003 मध्ये ‘पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन’ या मालिकेसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर ‘एक्सॉर्डिनरी मेझर्स’ हा चित्रपटही निघाला होता. ‘बोस्टन ग्लोब’ मध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले.

सिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोग तज्ञ असून त्यांनी कर्करोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून ‘ऩहोडस स्कॉलर’ म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना ‘नॉन फिक्शन’ गटात ‘द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकासाठी 2011 मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला. विजय शेषाद्री हे हिंदुस्थानी वंशाचे पत्रकार असून त्यांना त्यांच्या ‘थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी 2014 मध्ये पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयॉर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेली दोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी काव्यजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ‘न्यूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स अतिरेक्यांनी पाडल्यानंतर शेषाद्री यांनी त्या विषयावर लिहिलेल्या ‘डिसऍपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.

पत्रकारितेतील हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असल्याने हिंदुस्थानच्या दृष्टीने गौरवाचेच आहे, पण हा पुरस्कार देण्यामागे देण्यात आलेली कारणे आणि त्यावर आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे या पुरस्कारावरूनही वादावादी झाले.

जगभरातील इतर पत्रकारांबरोबर तीन हिंदुस्थानी वृत्त छायाचित्रकारांनादेखील हा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. कश्मीरमधील परिस्थितीबाबत त्यांनी काढलेली छायाचित्रे पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतरची परिस्थिती, लोकांचे हाल यासीन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद यांनी आपल्या कॅमेर्‍यात कैद केली होती. हे तिन्ही छायाचित्रकार वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस या अमेरिकन न्यूज एजन्सीसाठी काम करत आहेत. या तिघांना फीचर फोटोग्राफी विभागात पुरस्कार जाहीर झाला. आनंद जम्मू येथील रहिवासी असून मुख्तार आणि यासिन हे श्रीनगर येथील रहिवासी आहेत. हे तिन्ही छायाचित्रकार त्यांच्या छायाचित्रातून कश्मीर हा वादग्रस्त प्रदेश असल्याचे दाखवतात. यासीन दार याने पाठवलेल्या फोटोत चक्क ‘हिंदुस्थान नियंत्रित कश्मीर’ असे वादग्रस्त हेडिंग वापरल्याने वाद निर्माण झाला. त्यात आपल्याकडे अशा बाबतीतही राजकारणाचे घोडे दामटले जातेच. भाजपने या पुरस्कार निवडीवरून टीका केली आहे तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पिडीपीच्या मेहेबुबा मुफ्ती यांनी पुलित्झर पुरस्कार मिळाल्याबद्दल कश्मीरमधील तीन फोटोग्राफरचे अभिनंदन केले आहे.

कश्मीरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले 5 जवान शहीद झाले होते. 370 कलम हटवल्यामुळे कश्मीरमधील परिस्थिती रुळावर आली असे जे वाटत होते त्याला या हल्ल्याने छेदच दिला. या पार्श्वभूमीवर कश्मीरमधील 3 वृत्त छायाचित्रकारांना मिळालेल्या पुलित्झर पुरस्काराकडे पाहायलाच हवे. ही गोष्ट खरी आहे की, या हल्ल्याचा बदला 12 लाख रुपयांचे इनाम डोक्यावर असलेल्या हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायकू याला ठार करून घेतला. बुरहान वाणी हा जुलै 2016 मध्ये काश्मीर खोर्‍यात चकमकीत मारला गेल्यापासून रियाझ नायकू हा त्या गटाचा प्रमुख बनला होता.या यशावर आपल्या सैनिकांचे अभिनंदन करावेसे यातील कुणालाही वाटले नाही. अर्थात पुलित्झर पुरस्कारही देशाच्या दृष्टीने गौरवास्पदच आहे हेदेखील खरेच. सीमेवर सतत होणारे आपल्या जवानांचे व अधिकार्‍यांचे हौतात्म्य परवडणारे नाही. पुलित्झर पुरस्कारावरून वाद होऊ शकतात, पण कश्मीरमधील परिस्थिती आणि सीमेवर सातत्याने होणार्‍या चकमकी, त्यात आपल्या सैनिकांचे होणारे बलिदान याबद्दल तर वाद होऊ शकत नाही?

आपली प्रतिक्रिया द्या