
>> रविप्रकाश कुलकर्णी
ग्रंथ प्रदर्शनात नुसता फेरफटका मारला तरी मन प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शन म्हटलं की माझे पाय तिकडे आपोआप वळतात. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्यातर्फे या वर्षात ग्रंथ प्रदर्शन करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे येथील प्रदर्शने त्याची साक्ष आहेत. त्याच्या आठवणी, अनुभव ताजे असतानाच पुणे बाल पुस्तक जत्रा 2025 (22 मे ते 25 मे) आहे हे कळताच माझं जाणं अटळच… त्याचं मुख्य कारण आजपर्यंत पुस्तक जत्रा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. पण फक्त बाल पुस्तक जत्रा प्रथमच घडली!
पण हे घडलं कसं?
पुणे महानगरपालिकेला 75 वर्षे झाल्यानिमित्ताने विविध कार्यक्रम करण्याचे ठरले. त्यामध्ये बाल वाचकांसाठी पुस्तक जत्रा भरवावी अशी कल्पना सुनील महाजन यांनी त्यांच्या ‘संवाद’ या संस्थेतर्फे मांडली. ही कल्पना आयुक्त, पुणे महानगरपालिका राजेंद्र भोसले यांनाही आवडली. आता पुणे पुस्तक महोत्सव म्हणजे राजेश पांडे एवढी त्यांची ख्याती झालेली आहे. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि मग नॅशनल बुक ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रथमच बाल पुस्तक जत्रा भरू शकली.
या ग्रंथ प्रदर्शनासोबतच लहान मुलांना आवडणारे जादूचे प्रयोग ते चक्क बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शिवराज्याभिषेक ः जाणता राजा’ या महानाटय़ापर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याला अवकाळी पाऊस येऊनसुद्धा मुलांनी आणि अर्थात त्यांच्या पालकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला. या ग्रंथ प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलांसाठी खेळायला जागा ठेवली होती. त्यात गोटय़ा, विटी दांडू, लगोरी, छापा पाणी, टिपरी, चक्री (यालाच हल्ली टायर रेस म्हणतात म्हणे!) हे खेळ ठेवले होते आणि पालकदेखील मुलांसह खेळत होते. याप्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांच्या मुलीचे – रेवा पांडेचे ‘पारंपरिक खेळ’ हे मराठी-इंग्रजी असे द्वैभाषिक पुस्तक प्रकाशित झाले हे विशेषच.
एरवी ग्रंथ प्रदर्शनात मोठे लोक पुस्तक खरेदी करत असतानाच यांची मुलं आम्हाला पण पुस्तक द्या असा हेका करत असतात. आणि त्याकडे मोठे लोक दुर्लक्ष करत राहतात. इथे तर जिथे तिथे, सगळ्या स्टॉल्सवर लहान मुलांची पुस्तके होती. त्यामुळे मुलं ती चाळताना, पाहताना रंगून जात होती. पालक मात्र ‘चला चला’ असं सांगत होते. पण या गर्दीतच एक जोडपं चक्क बाबागाडीतच आपल्या छकुल्याला ठेवून फेरफटका मारत होते…
आता प्रदर्शनातील काही हकिगती सांगतो…
ग्राममंगलतर्फे रमेश पानसे एकूणच आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये सोपे पण परिणामकारक बदल कसे करता येतील याचे त्यांचे चिंतन चालू असते. त्यासंबंधात त्यांची पुस्तकेदेखील आहेत. पण ती चटकन उपलब्ध होत नाहीत. मात्र ही पुस्तके चक्क डायमंड बुक्स यांच्या स्टॉलवर उपलब्ध होती! ‘विचारफुले’ या पुस्तकात त्यांनी एक वचन उद्घृत केले आहे. ताराबाई मोडक यांच्या लेखनात एके ठिकाणी त्यांनी असे विधान केले आहे की, ‘अक्षरांची भूक लागेल त्यावेळी मुले अक्षरे हौसेने शिकतात व पुनः पुन्हा हात फिरवून गिरवतात.’
त्यातूनच वाचनाची गोडी लागते. त्याचेच प्रत्यंतर या पुस्तक जत्रेत दिसणाऱया मुलांत दिसत होते.
पुण्यातील नामवंत प्रकाशकांची हजेरी असणे हे गृहीतच होतं. पण त्या तुलनेत पारस पब्लिकेशन हे फारसं माहीत नसलेल्या प्रकाशकाच्या स्टॉलवर बोर्ड होता-
‘पुस्तक घेण्यासाठी रडणारी मुलं हे आपल्या चांगल्या संस्काराचं प्रतीक मानावं.’ त्याखाली नाव होतं गिरीपर्ण. हे कोण असतील?
रूपाली अवचरे या लेखिका आहेत आणि प्रकाशकही आहेत. त्यांच्या स्टॉलवर एकाच नावाची दोन पुस्तकं होती. एका मुलाच्या आईने दोन्ही पुस्तके वेगवेगळी आहेत हे ओळन् ओळ तपासून घेतलं आणि मगच खरेदी केली.
असाच अनुभव दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘मुंबईत पुस्तक खरेदी करताना वाचक किंमत बघत नाहीत. इथे मात्र तसं दिसत नाही. आणि कमिशनबाबत घासाघीस करणारे भेटतात…’
या ग्रंथ प्रदर्शनात डॉक्टर अमित करकरे यांचं ‘अक्कल खाते’ हे पुस्तक मिळालं. त्याचा विशेष म्हणजे ते हस्ताक्षरातलं आहे! हस्ताक्षराचा ‘शरद 76’ हा मराठी फॉन्ट करून ते छापलेलं आहे. मधुश्री प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या चार आवृत्ती झालेल्या आहेत हे विशेष.
ज्येष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले आपलं आजारपण विसरून पुस्तकाच्या स्टॉलवर उत्साहाने बालवाचकांना पुस्तकांची माहिती देताना दिसल्या.
एक वेगळा अनुभव…
वरदा प्रकाशनच्या स्टॉलवर सचिन तेंडुलकरवरचे पुस्तक एका मुलाने घेतले. तेव्हा कोणीतरी म्हटले, या पुस्तकाचे लेखक सुद्धा इथे आहेत. त्या मुलाने त्या लेखकाची लगेच पुस्तकावर स्वाक्षरी घेतली. आणि संदेश मागितला. लेखकाने लिहिले, ‘असाच वाचत राहिलास तर पुढे मोठा होशील…’
हा लेखक म्हणजे केदार केळकर. एकूण आता अशा प्रकारच्या बाल ग्रंथ जत्रा अनेक ठिकाणी भरवायला हव्या.


























































