
>> मनोज मोघे
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. या रायगडाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. ज्यातून काळाच्या उदरात गडप झालेला इतिहास पुन्हा प्रकाशात येईल.
किल्ले रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी…छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रमाचा एक साक्षीदारच… गडावर तोफा डागून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न मोगलांनी, इंग्रजांनी केला, मात्र हे घाव सोसूनही हा दुर्गराज महाराजांच्या इतिहास सांगण्यासाठी ताठ मानेने उभा आहे. अशा किल्ले रायगडाच्या संवर्धनाचे अत्यंत सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. यातून गडाची डागडुजी तर होईलच पण काळाच्या उदरात गडप झालेला इतिहास पुन्हा प्रकाशात येईल.
रायगड किल्ला पाहण्यासाठी दुर्गप्रेमी, ट्रेकर्स तसेच पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज पाच हजार पर्यटक या किल्ल्याला भेट देत असून शनिवार आणि रविवारी हे प्रमाण 30 हजार पर्यटकांपर्यंत जात आहे. छत्रपती शिवरायांविषयीचा अभिमान आणि इतिहासाविषयीच्या ओढीने हे पर्यटक येत आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक सोहळा, होळी उत्सव साजरा करून दुर्गप्रेमी इसिहासाला पुन्हा उजाळा देत आहेत. अशा वेळी हा गड पहिल्यासारखाच त्याच गतवैभवाने उभा राहणे अशी इच्छा अनेकांच्या मनात आली. रायगड जसाच्या तसा उभा करणे हे शक्य नसले तरी जितके शक्य होईल तितक्या पुराव्यांवरून रायगडाला पुन्हा गतवैभव देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
रायगडाच्या विकासासाठी केंद्रीय पुरातत्व विकास (एएसआय) विभागाच्या परवानगीने कामासही सुरुवात झाली आहे. सुमारे 606 कोटींचा निधी एकटय़ा रायगड किल्ल्याच्या विकासासाठी मंजूर झाला असून यातूनच हे काम पूर्ण केले जात आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड किल्ला परिसर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक बारकावा शास्त्राrय पद्धतीने तपासून हे काम करण्याचे आव्हान स्वीकारले आहे ते मराठमोळा कन्झर्व्हेशन आर्किटेक्ट वरुण भामरे यांनी. गडाच्या पायऱयांचे काम जोमाने सुरू झाले आहे. गडावर येण्यासाठी साधारण 1500 पायऱया चढाव्या लागतात. ऊन-पावसाच्या माऱयाने झिजलेल्या, काही ठिकाणी पडझड झालेल्या या पायऱ्या दुरुस्त करण्याची आवश्यकता होती, पण या पायऱया दुरुस्त करताना त्यांना तोच पुरातन वारसा पुन्हा मिळवून देणेही महत्त्वाचे होते. त्यामुळे कुठेही सिमेंट-वाळूचा वापर न करता चुना-विटांची भुकटी तसेच बेलफळाचे मिश्रण एकजीव करून तसेच दगडांनाच एकमेकांमध्ये सांधून बांधकाम करण्यात येत आहे. या पायऱया पाहिल्यानंतर त्या तंतोतंत शिवकालीन प्रतिमांशी जुळतील याची काळजी घेण्यात आली आहे.
गडावर येताना मुख्य दरवाजाकडे येण्यासाठीचा मार्गच नीट नसल्याने मेणा दरवाजाने येणे भाग पडत होते. त्याऐवजी आता नवीन मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना गडावर मागच्या दाराने समोरून सदरेवर दाखल होऊन महाराजांचे दर्शन घेता येईल. गडाच्या भिंतींवर झाडे उगवून येथील बांधकामाचे नुकसान होते. त्यामुळे या भिंतींमध्ये एक विशिष्ट रसायन भरण्यात येत आहे. यामुळे या भिंतींवर झाडेच काय साधे शेवाळही उगवू शकणार नाही. त्याचप्रमाणे गडावर जाण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे नाणे दरवाजा ऊर्फ नाना किंवा लहाना दरवाजा. हा दरवाजाही पूर्वीप्रमाणेच बांधण्यात येत आहे. अशाच पद्धतीने किल्ल्यावरील अन्य वास्तू ज्यांचे पुरावे आहेत त्यांचेही बांधकाम होणार असून काही वर्षांत हा गड दुर्गप्रेमींना त्याच्या गतवैभवासह पाहायला मिळेल असा आत्मविश्वास छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.
पाण्याचे 84 टाके
शिवरायांच्या काळात बाराही महिने पाण्याचा कधीच तुटवडा पडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. सुमारे 1300 एकर पसरलेल्या या गडावर 84 पाण्याचे लहानमोठे टाके आहेत. या टाक्यांचेही संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी 21 टाक्यांतील गाळ काढून ती पुनरुज्जीवित करण्यात आली आहेत. या टाक्यांमध्ये जुनी नाणी, शिवलिंग तसेच काही पुरातन वस्तूही सापडल्या आहेत. या सर्व वस्तू जतन करण्यात येत आहेत.
गाइडना प्रशिक्षण
गडावर असणारा प्रत्येक गाइड हा त्याच्या पद्धतीने आणि त्याने ऐकलेली माहिती पर्यटकांना सांगत असतो. यामुळे खरा इतिहास बाजूलाच राहतो. त्यामुळे सर्व गाइडना प्रशिक्षण देण्याचा एक कार्यक्रम आखला जाणार आहे. त्याचप्रमाणे गडावरील प्रत्येक वास्तूजवळ गेल्यानंतर त्या त्या ठिकाणचा इतिहास पर्यटकांना ऑडिओच्या माध्यमातून कानांवर पडेल अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
रोप वे अपुरा पडू लागला आहे
गडावर जाण्यासाठी सध्या असलेला रोप वे हा अपुरा पडत आहे. या रोप वेमध्ये सातत्याने होणारे बिघाड तसेच आकारले जाणारे शुल्क यामुळे रोप वेने जाणे सुखकर असले तरी ते तितकेसे व्यवहार्य ठरत नाही. पर्यटकांनाच काय इथले गाइड तसेच ग्रामस्थांनाही रोप वेने येणे परवडत नाही. गडाच्या नवीन रोप वेसाठी 50 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे रोप वेचे शुल्क कमी व्हावे आणि त्याचप्रमाणे नवीन रोप वेचे कामही लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानग्यांमध्ये गडाचे संवर्धन अनेक वर्षे रखडले होते. आडमुठय़ा धोरणामुळे गडाचे काम रखडले आणि काही बुरूज ढासळलेही. दुसरीकडे पुरातत्व विभागाच्या परवानगीनेच गडावरील हत्तीखान्याच्या दगडी बांधकामावर पत्र्याचे छप्पर चढविण्यात आले. हे काम इतिहासाला धरून नसताना कसे केले गेले हाही एक प्रश्नच आहे, पण देर आये दुरुस्त आये असे म्हणत पुरातत्व विभागाने इतक्या वर्षांनी दिलेल्या परवानगीने गडाचे गतवैभव काही प्रमाणात जरी परत मिळवता आले तर हेही नसे थोडके!






























































