ठसा – राजू श्रीवास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  प्रशांत गौतम

रसिक  प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणे, हे वाटते तेवढे सोपे काम कधीच नसते. आपली व्यक्तिगत सुख-दुःखे मनातच ठेवून एखादाच कॉमेडीकिंग प्रेक्षकांच्या मनात घर करणारा असतो. लोकप्रिय स्टॅण्डअप कॉमेडियन ‘गजोधर भैया’ तथा राजू श्रीवास्तव हे त्यातीलच एक महत्त्वाचे कलावंत होते. नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात 48 दिवसांपासून उपचार सुरू होते आणि ही झुंज अखेर दोन दिवसांपूर्वी संपली.

हटके स्टाईल आणि आत्मविश्वास या गुणविशेषावर राजू यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अर्थात यश, पैसा संपत्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना संघर्ष हा करावाच लागला. तेव्हा कुठे इंडस्ट्रीत त्यांचा जम बसू लागला. राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशातील कानपूरचे. त्यांचे खरे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव. वडील रमेशचंद्र सरकारी कर्मचारी असले तरी ते कवी प्रकृत्तीचे. त्यामुळे राजू यांना कलेचा वारसा हा वडिलांकडून प्राप्त झाला. लोकांचे मनोरंजन करण्याचे कौशल्यही त्यांनी वडिलांकडून आत्मसात केले. हसविण्याचा, नकला करण्याचा छंद त्यांना बालपणापासूनच होता. हिंदी चित्रपट उद्योगात काही काम मिळते का? आपण अभिनेता होऊ शकतो का, असे स्वप्न घेऊन ते 1982 च्या सुमारास मुंबईत आले खरे; पण उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवली. अशाच एका प्रसंगात रिक्षात एके दिवशी प्रवासी बसला. त्याला राजूची स्टाईल आवडली. त्याने त्यांना स्टेज परफॉर्मन्सची ऑफर दिली. त्याचे 50 रुपये मानधन मिळणार होते. राजू यांनी ती ऑफर स्वीकारली. तेथून सुरू झालेला त्यांचा स्टॅण्डअप कॉमेडीयनचा प्रवास 21 सप्टेंबर रोजी कायमचा थांबला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवास सुरू झाला तो तेजाब या सुपर-डुपर हिंदी चित्रपटातून. त्यानंतर बाजीगर, बॉम्बे टू गोवा, आमदानी अठ्ठनी; खर्चा रुपया, मैने प्यार किया, मै प्रेम की दिवाणी हूँ!, फिरंगी या चित्रपटांतून भूमिका मिळाल्या. राजू श्रीवास्तव यांनी 1994 च्या सुमारास टी टाईम मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला आणि ते या लोकप्रिय शोचे उपविजेते ठरले. द किंग ऑफ कॉमेडी ही पदवी त्यांनी जिंकली; यात त्यांनी गजोधर भैया बनून रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. त्यानंतर ते कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, देख भाई देख, कॉमेडी नाईट विथ कपिल, नच बलिए अशा शोमधून सतत प्रेक्षकांसमोर राहिले. 2009 पर्यंत त्यांनी 2,800 हून अधिक लाईव्ह शो केले. 2009 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत कॉमेडी शोमधील अश्लीलता ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले होते. 2010 मध्ये पाक किंवा दाऊदवर विनोद करू नका, असे धमकावणारे फोन आले होते. इशारेही आले होते. यानिमित्ताने त्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आल्याचा अनुभव घेतला असावा.

राजू श्रीवास्तव एकापेक्षा एक हटके कॉमेडी शो करीत असत. त्यासाठी त्यांनी घेतलेले विनोदाचे विषय सुक्ष्म निरीक्षण, अवलोकनातून येत असत. विवाह सोहळे असोत की, स्मशानभूमी, त्या-त्या ठिकाणी त्यांना विनोद दिसला. राजकारणासोबत वाईट प्रशासनाची त्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली. सिनेतारकांच्या मिमिक्री असो की सर्वसामान्यांचे जीवन असो, ते त्यांनी अनोख्या शैलीतून मांडले. असे कितीतरी हास्यदरबार त्यांनी गाजवले आणि वाजवले सुद्धा. रस्त्यात बसलेल्या गायीचे रूप धारण करून त्यांच्यातील संवादाने रसिकांना पुरेपूर हसवले. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. अगदी कुत्र्याची धावण्याची स्पर्धा त्यांनी आपल्या लेखनाचा भाग बनवला. म्हशीचा दणदणाट असो, दिवाळीचे फटाके असोत, चौकीदाराच्या कृती असोत नाही तर प्राण्यांच्या गमती-जमती असोत. ते त्यांनी वैविध्यपूर्ण सादर केले. ‘तुने मुझको हसना सिखाया’ अशी त्यांची ओळख बनली होती. त्या राजू श्रीवास्तव यांची झालेली अकाली एक्झिट हळहळ वाटावी अशीच आहे. त्यांनी साकारलेला गजोधर भैयाला कधीच विसरता येणार नाही.