शिल्पसमृद्ध रानी की वाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

तहानलेल्याला पाणी देणे हे सर्वोच्च पुण्यप्रद कार्य समजले गेलेले आहे आणि तोच धागा पकडून पिण्याच्या पाण्यासाठी केलेले विविध प्रयत्न आपल्याला प्राचीन काळापासून दिसून येतात. मग त्यात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला ‘सुदर्शन तलाव’ असेल किंवा बौद्ध लेणींच्या निर्मितीवेळी खोदलेली पाण्याची पोढी आणि त्यासाठी दिलेले दान असेल. साताऱयाजवळ लिंब इथे शेतीसाठी खोदलेली 15 मोटांची विहीर असेल अथवा वाटसरूला पाणी मिळावे म्हणून महामार्गावर केलेली पाणपोईंची व्यवस्था असेल. या विहिरी तत्कालीन राजांनी तर कधी समाजातील दानशूर व्यक्तींनी खोदून घेतलेल्या असतात. पुढील काळात नुसत्याच विहिरी न खोदता त्या शिल्पसमृद्ध केल्या जाऊ लागल्या. अशा विहिरी हे स्थापत्याचे एक वैशिष्टय़पूर्ण अंगच बनून गेले.

पाण्याच्या कमतरतेमुळे गुजरात आणि राजस्थान या प्रदेशात फार पूर्वीपासून जमिनीत खोलवर खणून विहिरी बांधण्याची पद्धत अवलंबली जात होती. खोलवर असलेल्या जलसाठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱया बांधायच्या अशी पद्धत या ठिकाणी आढळते. अशा विहिरी खणताना मग त्यात कलाकार आपले कसब दाखवू लागले. त्यांना राजाश्रय मिळत गेला, विपुल पैसा उपलब्ध होऊ लागला आणि मग अशा काही अद्वितीय कलाकृती जन्माला आल्या की, संपूर्ण जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. पाटण इथली ‘रानी की वाव’ हे त्याचेच सर्वांगसुंदर उदाहरण होय. गुजरातेत विहिरीला ‘वाव’ किंवा ‘वावडी’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये ‘वापी’ हा शब्द विहिरीसाठी वापरला जातो. ‘वाव’ हे त्याचे रूप असावे. पाटणची ‘रानी की वाव’ म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. छोटी मोठी मिळून इथे जवळ जवळ तीन हजार शिल्पे कोरलेली आहेत. ‘शिल्पसमृद्धी’, ‘शिल्पश्रीमंती’ हे शब्द अपुरे पडावेत एवढे शिल्पांचे प्रचंड भांडार इथे आहे. हे सर्व पाहून खरेच डोळे थकतात इथे.

इसवी सनाच्या 11 व्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. ऐश्वर्यसंपन्न अशा या घराण्याची राजधानी होती अनहिलपूर किंवा अनहिलपताका म्हणजेच आजचे मेहसाणा जिह्यातील पाटण हे गाव. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती हिने आपल्या राजधानीच्या गावी या शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली. राणीने बांधलेली विहीर म्हणून याचे नाव ‘रानी की वाव’ असे पडले. अंदाजे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल अशी ही विहीर इ.स. 1050 मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. मेरुंगसुरी यांनी इ.स.1304 मध्ये लिहिलेल्या ‘प्रबंध चिंतामणी’ या ग्रंथात राणीने बांधलेल्या विहिरीचा उल्लेख सापडतो. ही संपूर्ण विहीर मातीमध्ये दबली गेली होती. त्याचे काहीही अवशेष दिसत नव्हते. कालौघात मातीची धूप झाली आणि या विहिरीच्या वरच्या थरातील काही शिल्पे दिसू लागली, पण या वास्तूचे नशीब उजाडले 1983 साली. भारतीय पुरातत्त्व खात्याचे लक्ष इकडे गेले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांतून हे शिल्पलेणे आज लोकांसमोर आले आहे. वरून खाली जाताना निमुळती होत जाणारी ही विहीर सात मजल्यांची आहे. यात विस्तीर्ण पायऱया आणि बहुमजली चौक यांचा समावेश होतो. पश्चिमेकडून प्रवेशमार्ग असलेल्या या विहिरीच्या दोन्ही बाजूच्या म्हणजे दक्षिण व उत्तर भिंतींवर असंख्य मूर्ती आणि शिल्पे कोरलेली आहेत. या दक्षिण व उत्तर भिंतींना जोडणारे पूल बांधले गेले आणि त्यांच्यावर ओवऱया दिसतात. जसजसे आपण खाली जातो, तसतसे मधेमधे पूल आणि त्यावर ओवऱया आहेत. ओवऱयांचे खांबसुद्धा बारीक कलाकुसरयुक्त असून यक्ष, कीर्तिमुखे यांची रेलचेल या खांबांवर दिसते.

शेषशायी विष्णू, विष्णूचे दशावतार, त्याचबरोबर वीस हातांचा विविध आयुधे धारण केलेला शिव, सोळा हातांची महिषासुरमर्दिनी, आलसिका, दर्पणा, कर्पूरमंजरी, पुत्रवल्लभा या सुरसुंदरी, गणपती, चार हातांचा हनुमान, अष्टवसू अशा असंख्य मूर्ती या विहिरीवर कोरलेल्या आहेत. गुजरातचे वैभव असलेल्या या विहिरीला 2014 साली जागतिक वारसा स्थळाचा मान प्राप्त झाला. ‘रानी की वाव’ हे एक उदाहरण झाले. अशाच अनेक विहिरी गुजरात आणि राजस्थानात पाहायला मिळतात. कदाचित त्यावर केलेले शिल्पकाम कमी-जास्त असेल, परंतु पायऱया असलेली विहीर आणि त्यामुळे केलेली पाण्याची सोय महत्त्वाची ठरते. ‘पाणी हे जीवन आहे’ या वाक्याचा अर्थ ज्या ठिकाणी मैलोन्मैल पाणी नजरेसदेखील पडत नाही अशा ठिकाणी नेमका समजतो. या शिल्पसमृद्ध पायऱया असलेल्या विहिरी पाहून नुसती पिण्याच्या पाण्याची सोयच नव्हे, तर त्याचसोबत एक देखणे शिल्पजडित स्थापत्य घडवणे ही आपल्या पूर्वजांची सौंदर्यदृष्टी आपल्याला खरोखर चकित करून जाते.

[email protected]