लेख – सहकारी बँकांकडे बघण्याचा सापत्न दृष्टिकोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय पेंडसे

सर्वसाधारणपणे एखादी सहकारी बँक दुसऱया सक्षम सहकारी बँकेत विलीन करत असताना जवळ जवळ कोणत्याही सोयी-सवलती दिल्या जात नाहीत. त्या तुलनेत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेवर सोयी-सवलतींची खैरात केलेली दिसते. खासगी बँकांना विशेष वागणूक दिली जाते हे या विलिनीकरणाच्या प्रस्तावावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. सहकारी बँकांकडे, त्यांच्या ठेवीदारांकडे, भागधारकांकडे बघण्याचा रिझर्व्ह बँकेचा सापत्न दृष्टिकोन जेव्हा बदलेल तेव्हाच सहकारी बँकिंगकडे गांभीर्याने बघितले जाईल.

रिझर्व्ह बँकेचा मुख्य उद्देश ठेवीदारांचे संरक्षण करणे हा राहिला आहे. आतापर्यंत अनेकदा हे पालुपद रिझर्व्ह बँकेकडून वारंवार ऐकले आहे, परंतु पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँकेच्या विलीनीकरणाच्या योजनेत या मुद्दय़ाचा विसर पडलेला दिसून येतो. सहकारी बँकांच्या बाबतीत असं कसं घडतं हा संशोधनाचाच विषय आहे.

ठेवीदारांची व्याख्या व्यक्ती, कंपनी, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, मंडळ या सर्वांसाठी समान असते अशी सर्वसाधारण धारणा आहे, नव्हे ती तशीच आहे, परंतु रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या विलीनीकरण योजनेत मात्र ठेवीदार या संकल्पनेलाच हरताळ फासला आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक या खासगी बँकेत पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँकेचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने सादर केला आहे. ठेव विमा महामंडळाकडून मिळणारी ठेव विम्याची रु. 5 लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना तातडीने मिळणार आहे. त्यावरील ठेवींची रक्कम ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने दहा वर्षांनंतर मिळणार आहे. दोन वर्षांनंतर रु. 50 हजार, तीन वर्षांनंतर रु. एक लाख, चार वर्षांनंतर रु. तीन लाख तर पाच वर्षांनंतर रु. 5.50 लाख व त्यावरील ठेवींची रक्कम 10 वर्षांनंतर मागणी केल्यास मिळणार आहे, परंतु ही रक्कम फक्त रिटेल ठेवीदारांनाच म्हणजे व्यक्तिगत ठेवीदारांनाच मिळेल असा उल्लेख या प्रस्तावात आहे. 31 मार्च 2021 नंतर पाच वर्षांपर्यंत ठेवीदारांच्या शिल्लक ठेवींवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. पाच वर्षांनंतर शिल्लक ठेवींवर केवळ 2.75 टक्के दराने व्याज दिले जाईल असेही या प्रस्तावात म्हटले आहे. हा ठेवीदारांवर अन्याय नव्हे का ? किरकोळ ठेवीदारांची संपूर्ण ठेव परत मिळणार असली तरी त्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी पाहता हा प्रस्ताव स्वीकारार्ह वाटत नाही.

ठेवींची संपूर्ण रक्कम परत मिळण्यासाठी लागणारा हा प्रदीर्घ कालावधी ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय करणारा आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची पुंजी आवश्यकता असताना, गरजेच्या वेळी उपलब्ध होण्याचा मार्गही यामुळे बंद झाला आहे. निदान अचानक उद्भवलेले आजारपण, अपघात, विवाह समारंभ, मृत्यू अशा प्रसंगी तरी तातडीने ठेवी परत करण्याचा समावेश प्रस्तावात करणे प्रशस्त ठरले असते.

किरकोळ ठेवीदारांबरोबरच अनेक संस्थात्मक ठेवीदारांनी या बँकेत मोठय़ा प्रमाणात व मोठय़ा रकमेच्या ठेवी ठेवल्या होत्या. यामध्ये सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, शिक्षण संस्था, अनेक गुरुद्वारे तसेच धार्मिक संस्था, पंपन्यांचा समावेश आहे. या संस्थात्मक – काॅर्पोरेट ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत न देण्यासदृश प्रस्ताव तयार केला गेला आहे.

संस्थात्मक ठेवीदारांची ठेवींची रक्कम निश्चितच मोठी असणार. रक्कम मोठी असल्यामुळे ठेव विम्याच्या मर्यादेपेक्षा म्हणजे रुपये पाच लाखांपेक्षा कितीतरी अधिक रकमेच्या या संस्थात्मक ठेवी आहेत. साहजिकच या ठेवींचा समावेश विमा रकमेत नाही. म्हणून संस्थात्मक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या 80 टक्के रकमेचे प्रेफरन्स शेअर्स (युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे) देण्याचे प्रस्तावित केले आहे. हे प्रेफरन्स शेअर्स परपेच्युअल म्हणजेच निरंतर स्वरूपाचे आहेत. या प्रेफरन्स शेअर्सची मुदत 10 वर्षे असणार असे म्हटले असले तरी ते परत कधी मिळतील याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही आणि या प्रेफरन्स शेअर्सवर 10 वर्षे फक्त एक टक्का व्याज दिले जाणार आहे. 10 वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने अधिक लाभ देता येईल का? याचा विचार केला जाणार आहे, तर उर्वरित 20 टक्के ठेव रकमेचे रु. 1 प्रमाणे इक्विटी वॉरंट दिले जाणार असून युनिटी बँकेच्या प्रारंभिक भागविक्रीच्या (IPO) वेळी त्याचे समभागात रूपांतर करणार आहे.

हा प्रस्ताव म्हणजे संस्थात्मक ठेवीदारांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. या प्रस्तावामुळे प्रामुख्याने अनेक सहकारी बँकांचे, सहकारी पतसंस्थांचे, सहकारी सोसायटय़ांचे, शिक्षण संस्थांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सहकारी बँकांचे, पतसंस्थांचे, सोसायटय़ांचे नुकसान म्हणजे पर्यायाने सामान्य ठेवीदारांचे नुकसान होणार आहे. म्हणूनच या प्रस्तावावर फेरविचार करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवींची रक्कम 10 वर्षांनंतर परत मिळणार ही दिलासा देणारी बाब असली तरी हा कालावधीही खूप मोठा आहे आणि त्यावर मिळणारे 2.75 टक्के व्याज अतिशय क्षुल्लक आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला डिपॉझिट इन्शुरन्स व्रेडिट गॅरेंटी काॅर्पोरेशनकडून ठेव विम्याची मिळणारी रक्कम परत करायला 20 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी मिळणार आहे. असे असूनही ठेवीदारांवर केला जाणारा अन्याय अनाकलनीय आहे. तसेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील भागधारकांनाही त्यांच्या भाग-भांडवलावर पाणी सोडावे लागणार आहे. विलीनीकरण म्हणजे संबंधित संस्थेची सर्व येणी-देणी-मालमत्ता याची जबाबदारी स्वीकारणे होय. विलीनीकरण झाल्यानंतर युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँकेच्या शाखांच्या जागा व्यवसायासाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला मोठा ग्राहक वर्गही मिळणार आहे. कायदेशीर प्रक्रिया करून थकीत कर्जवसुलीचे मार्गही उपलब्ध आहेत. असे असतानाही ठेवीदार तसेच भागधारकांना वाऱयावर सोडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सर्वसाधारणपणे एखादी सहकारी बँक दुसऱया सक्षम सहकारी बँकेत विलीन करत असताना जवळ जवळ कोणत्याही सोयी-सवलती दिल्या जात नाहीत. त्या तुलनेत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेवर सोयी-सवलतींची खैरात केलेली दिसते. खासगी बँकांना विशेष वागणूक दिली जाते हे या विलीनीकरणाच्या प्रस्तावावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. सहकारी बँकांकडे, त्यांच्या ठेवीदारांकडे, भागधारकांकडे बघण्याचा रिझर्व्ह बँकेचा सापत्न दृष्टिकोन जेव्हा बदलेल तेव्हाच सहकारी बँकिंगकडे गांभीर्याने बघितले जाईल, असे नमूद करावेसे वाटते.