लेख : मायमराठीचा विसर नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
marathi-school

>>धनश्री देसाई (तोडेवाले)

आज मराठी राजभाषा दिन. आमची मराठी समृद्ध, सुसंस्कृत आणि प्रेमळ आहे हे सर्व विदित आहे. तरीही वाटते आपण कुठेतरी कमी पडतोय. इंग्रजी प्रेमसुद्धा ओसंडून वाहतेय. अलीकडे मराठी मालिकांत काम करणारे लोकं सर्रास इंग्रजी बोलतात किंवा मराठी बोलतांना इंग्रजी शब्द उच्चारणे प्रवृत्तीच झाली आहे. सिनेमे काय मालिका काय नावंसुद्धा इंग्लिश… माझी एक मैत्रीण आंध्र प्रदेशात वास्तव्यास आहे. तिला त्या शहरात राहण्यासाठी तामीळ शिकावी लागतेय. कारण तिथली संस्कृती आहे ती. पण घरी मराठी बोलायचं म्हणजे बोलायचंच. कारण बाहेर इंग्रजीशिवाय पान हलणार नाही आणि सोसायटीमध्ये तामीळशिवाय पर्याय नाही.

मराठी माणसाची विशेषतः ही आहे की तो जिथे जाते तेथील रंगात मिसळतो. मात्र याचा अर्थ त्याने स्वतःची मराठी भाषासुद्धा विसरावी असे नाही. बृहन्महाराष्ट्रात आजही लोकं मराठी मालिका, सिनेमे, नाटकं यांनाच प्राधान्य देतात. तिथे बाहेर हिंदी व इंग्रजी बोलावे लागणे हा परिस्थितीचा भाग आहे, पण घरी तर मराठीच बोलतात. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. तीसुद्धा आलीच पाहिजे. त्याचाही मान असावाच हृदयात, पण शेवटी मायबोलीचाही तोच मान आहे. तिला आधी मान द्यावा. याच माय मराठीने आपल्याला पोसले, वाचा फोडण्यास शब्द दिलेत, या जगात खंबीर उभे राहण्यास बळ दिले आहे. हे विसरू नका. आजकाल पद्धत झाली आहे की मराठी तरुण-तरुणी हिंदी बोलतात आणि त्यालाच ‘स्टेटस’ समजतात. मराठी सिनेमासृष्टीला आधी किंमत नव्हती. याला कारण आम्हीच होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मराठीला अच्छे दिन आले, पण आता आपलेच मराठी लोक हिंदी/इंग्रजी बोलताना दिसतात. त्यावेळी वाटते की किती कष्टांनं मराठी राजभाषा होण्याच्या परिस्थितीत आली आहे. मग आपण मराठीची शान नको का पुन्हा जपायला. आपल्या अशाच वागण्याने मराठीचं झाडं कोमेजायला नको. उलट आपण आपल्या घरी मराठी साहित्य, मराठीतच चर्चा करून मराठीला  टिकवण्याचा संकल्प घ्यावा. पिढ्यान्पिढ्या जपलेले मायमराठीचे रोपटे पुन्हा ताजेतवाने करूया. आपल्या घरात मराठीच बोलण्याकडे, कुठल्याही व्यासपीठावर आपली ओळख मराठी म्हणून करण्याकडे वळूया! फक्त मराठी दिनापुरते माय मराठीचे गोडवे नको तर रोजच्या आयुष्यात आपल्या भाषेला मान मिळावा यासाठी मराठीत बोलणं महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे किमान महाराष्ट्रात तर मराठीच बोलायला हवे. इतर प्रांत आहेच त्यांच्या भाषेला मोठं करायला. मग आपण मराठी माणसानं मागे का राहायचे?