प्रासंगिक – उच्च रक्तदाबाचे धोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम

उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब वाढतो. या दबावाच्या वाढीमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह राखण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते. उच्च रक्तदाबामध्ये हृदयावर रक्त पंप करण्याकरिता ताण वाढतो. त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात आणि हृदयविकार, स्ट्रोक आणि काही वेळा मृत्यूचा धोकासुद्धा वाढतो. उच्च रक्तदाब मूक मारेकरी म्हणून काम करीत असतो. ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन’ दरवर्षी 17 मे रोजी जगभरात जनजागृतीसाठी साजरा केला जातो. या वर्षी ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन 2022’ची थीम आहे ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, नियंत्रित करा, दीर्घायुष्य जगा’.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि इतर रोगांचा धोका वाढतो. आफ्रिकन देशांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक आहे (27 टक्के), तर यूएसमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात कमी आहे (18 टक्के). जगभरातील 30-79 वर्षे वयोगटातील अंदाजे 1.28 अब्ज प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, त्यापैकी बहुसंख्य (दोन तृतीयांश) कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे 46 टक्के प्रौढांना या स्थितीबद्दल माहिती नसते. उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्याहून कमी प्रौढांचे (42 टक्के) निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीमध्ये (21 टक्के) हे नियंत्रणात असते. उच्च रक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

‘लॅन्सेट’ अभ्यासानुसार 2016 मध्ये हिंदुस्थानातील एकूण मृत्यूंपैकी 28.1टक्के मृत्यू हृदयरोग आणि स्ट्रोकचे होते. उच्च रक्तदाब हा मृत्यू आणि अपंगत्वाचा चौथा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. हिंदुस्थानातील सुमारे 200 दशलक्ष प्रौढांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. हिंदुस्थानात उच्च रक्तदाब निदानाचा दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. देशातील 60 टक्के ते 70 टक्के पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या वास्तविक स्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत. 200 देशांमध्ये उच्च रक्तदाब निदान दरामध्ये हिंदुस्थान महिलांसाठी 193 वा आणि पुरुषांसाठी 170 व्या क्रमांकावर आहे. अशा कमी निदानामुळे उच्च रक्तदाबाचा रोग जीवघेणा ठरतोय, ज्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार हिंदुस्थानात उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांची (30-79 वर्षे) टक्केवारी 1990 मध्ये 25.52 टक्क्यांवरून पुरुषांमध्ये 30.59 टक्के आणि 26.53 टक्के महिलांमध्ये 29.54 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

हिंदुस्थानात उच्च रक्तदाबाचे लवकर निदान आणि चांगले उपचार केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचे ओझे कमी होईल. असा अंदाज आहे की, हिंदुस्थानातील सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये 2 मिमी-व्यापी घट झाल्यामुळे कोरोनरी धमनी रोगामुळे होणारे 1,51,000 मृत्यू आणि स्ट्रोकमुळे 1,53,000 मृत्यू टाळता येतील. उच्च रक्तदाब कमी केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे नुकसान तसेच इतर आरोग्य समस्यांपासून संरक्षण होते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जसे कीः उच्च रक्तदाबावर डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे. मिठाचे सेवन कमी करणे (दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी), फळे आणि ताज्या हिरव्या, अंकुरलेल्या भाज्या खाणे, तळलेले- पापड, लोणचे, चाट- मसाला यांसारखे पदार्थ टाळणे. नियमित व्यायाम, चालणे-फिरणे, सायकल चालवणे, साधे-सोपे शारीरिक व्यायाम करणे, जसे एरोबिक, पोहणे, संतुलित वजन राखणे. सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहणे, पौष्टिक आहार घेणे आणि संपृक्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे. आता तर आधुनिक जीवनशैलीपासूनही अंतर राखणे गरजेचे झाले आहे. जिभेचा थोडय़ाशा चवीकरिता संपूर्ण शरीर बिघडवणं आणि महागडय़ा आजारांना बळी पडणं हे कुठलं शहाणपणाचं आहे. या विषयाचा सखोल विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

[email protected]