लेख – …तरच अपघातग्रस्तांना न्याय मिळेल

523

>> डॉ. बसवेश्वर चेणगे

वाहतुकीच्या नियमात सरकार सुधारणा करत असले तरी या नियमांची योग्य अंमलबजावणी केली जावी, बेदरकार वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्यांना कठोर शासन झाले पाहिजे तसेच अपघातांची झळ बसलेल्यांना न्याय, भरपाई मिळालीच पाहिजे याचे उत्तरदायित्व सरकारने घ्यायला हवे. तसे घडताना दिसत नाही. पोलीस यंत्रणेच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रणापेक्षा, बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यापेक्षा दंड वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाताना दिसत आहे. वाहतूक नियमातील सुधारणा केवळ दंडाला महत्त्व देणारी ठरू नये. अपघाताची झळ बसलेल्यांनाही दिलासा मिळणे गरजेचे आहे.

सार्वजनिक रस्त्यांवरून सुरक्षितपणे जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मग तो पादचारी असो, वाहनचालक असो अथवा कुठलाही जिवंत प्राणी. वाहन चालवत असताना प्रत्येकाच्या सुरक्षिततेला वाहन चालकाने प्रथम प्राधान्य द्यायला हवे. रस्ते वाहतुकीचे नियम लागू आहेत. त्यांची वेळोवेळी कार्यवाही पोलीस, परिवहन विभागांच्या माध्यमातून होत असली तरी अनेकदा वाहनचालकांची मुजोरी सर्वसामान्य पादचारी, शिस्तीने वाहन चालवणाऱ्यांसाठी काळ ठरते. बेदरकार वाहन चालवणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे, विनापरवाना वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपवणे यासारखे प्रकार अनेकांच्या जिवावर बेतत असतात. अनेकांच्या वाट्याला जन्मभराचे अपंगत्व त्यामुळे येत असते. म्हणून अशा प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जुन्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचे पाऊल महत्त्वाचे असले तरी हाच अंतिम उपाय म्हणता येणार नाही. त्यामुळे या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

सातारा येथील उद्योगपती फरोख कूपर यांच्या पत्नी महारुख कूपर बेदरकार वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघातग्रस्त होऊन गेल्या दहा वर्षांपासून वेदना सोसत आहेत, तर जो व्यक्ती अपघाताला कारणीभूत होता तो मोकाट फिरतो आहे. वाहतुकीच्या नियमात सरकार सुधारणा करत असले तरी या नियमांची योग्य अंमलबजावणी केली जावी, बेदरकार वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्यांना कठोर शासन झाले पाहिजे तसेच अपघातांची झळ बसलेल्यांना दिलासा, न्याय, भरपाई मिळालीच पाहिजे याचे उत्तरदायित्व सरकारने घ्यायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. पोलीस यंत्रणेच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रणापेक्षा, बेशिस्त वाहतुकीला, वाहन चालकांना शिस्त लावण्यापेक्षा दंड वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाताना दिसत आहे. त्यासाठी सर्वांनाच वेठीला धरले जात आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होऊन बसली आहे. वाहतूक नियमातील सुधारणा केवळ दंडाला महत्त्व देणारी ठरू नये. त्यातून अपघाताची झळ बसलेल्यांनाही दिलासा मिळणे गरजेचे आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदस्त दंड व शिक्षेची तरतूद करण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पुरातन, जुन्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केल्याबद्दल कूपर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. स्वत:ची चूक नसताना अपघातात बळी पडणाऱ्यांना या दुरुस्तीमुळे निश्चितपणे न्याय मिळेल व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटकाव बसेल याबद्दल कूपर यांना खात्री वाटते. नवीन उपाययोजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली गेल्यास अपघाताला बळी पडणाऱ्या निरपराध लोकांच्या वेदना, दु:ख काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल व भीषण अपघाताच्या प्रमाणात घट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

त्याचवेळी त्यांनी अशा प्रकारे दु:ख व वेदना भोगत असलेल्या महारूख कूपर यांचे उदाहरण निदर्शनास आणून दिले आहे. 19 ऑक्टोबर 2008 रोजी पुण्यातील महात्मा गांधी मार्गावर वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवित, भरधाव वेगाने  मोटारसायकल चालविणाऱ्या विश्वजित राजेश मिश्रा या वाहन चालकाने एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या महारूख यांना धडक दिली. वास्तविक त्यांची काहीही चूक नव्हती. वाहनचालक मिश्रा त्याच्या मित्राची मोटारसायकल चालवत होता. कॅम्प भागातील स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदविली होती. आज या घटनेस 10 वर्षे झाली तरीही महारुख अद्याप पूर्णपणे पूर्ववत बऱ्या झालेल्या नाहीत. पूर्वीप्रमाणे चालू शकत नाहीत.

पोलिसांनी भा. दं. वि. कलम 279 (भरधाव वेगाने वाहन चालविणे), 337 (दुसऱ्याला इजा करून त्याच्या जिवाला धोका निर्माण करणे किंवा त्याची सुरक्षितता धोक्यात आणणे) आणि 338 (जिवाला धोका निर्माण करणारे किंवा गंभीर इजा करणारी कृती करणे) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 119/17 अन्वये केस न.604353/ 2008 ने तक्रार दाखल केली. मोटारसायकलस्वारास अटक करण्यात आले व नंतर त्याला सोडून देण्यात आले. मोटार वाहन कायद्यान्वये दाखल झालेल्या केसच्या एकाही सुनावणीस वारंवार नोटिसा पाठवूनही तो हजर झाला नाही. त्याने प्रतिसाद द्यावा म्हणून खूप प्रयत्नही केले होते. हजारो किरकोळ रस्ते अपघातास बळी पडणाऱ्यांकडे हे सर्व करण्याइतपत पुरेशी साधनसामग्रीही नसते. या प्रकरणातील सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे भा. दं. वि. अन्वये गुन्हा दाखल केला असतानाही लोकअदालतमध्ये कोणतीही सूचना न देता किंवा अपघातातील व्यक्तीस किंवा तक्रार करणाऱ्यांना कल्पना न देता एकतर्फी निकालात काढण्यात आली. 2012 मध्ये जेव्हा हे समजले तेव्हा कूपर यांना आश्चर्याचा धक्काच बसला. इतकेच नव्हे, तर वरिष्ठ न्यायालयात या निर्णयास आव्हान देण्यासाठी न्यायालयीन निर्णयाची प्रत त्यांना उपलब्ध झाली नाही.

कूपर यांनी या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे केंद्रीय मंर्त्यांना पाठवलेल्या पत्रासोबत जोडली आहेत. दोषी मोटारसायकलस्वाराला शिक्षा होण्यासाठी सरकारने योग्य ती पावले टाकावीत आणि पुन्हा अपघात करण्यासाठी मोकाट सोडू नये यासाठी भा. दं. वि. मध्ये सुधारणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रत्येक जीव मोलाचा…तो जपण्याची काळजी घ्या!

पोटापाण्यासाठी असंख्य सर्वसामान्य लोक रोज रस्त्यावर वाहने घेऊन येत असतात. रोज सकाळी निरोप घेऊन सायंकाळी परत येतो, असं म्हणून गेलेला प्रत्येक व्यक्ती मग तो बाप, आई, पती, पत्नी, पोटचे मूल असेल प्रत्येकाला त्याच्या घरी परतण्याची काळजी लागलेली असते. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. अल्पवयीन मुलेही रस्त्यांवरून वेगाने वाहने चालवताना दिसतात. विशेषत: महाविद्यालये, शाळा, खासगी क्लासेसच्या ठिकाणी असे मुजोर वाहनचालक गल्लोगल्ली वाहने घेऊन भटकताना दिसतात. त्यांच्या वाहनांचा वेग तुफान असतो. गल्लीतल्या रस्त्यांवरुन 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने जर वाहन चालविले तर अडथळा आल्यास वाहन नियंत्रणात कसे आणता येईल? तरीही विवेक हरपलेले आणि ताबा सुटलेले वाहनचालक वाहने चालवताना दिसतात. हा वेग अनेकांच्या जिवाशी खेळू शकतो. रस्त्यावर अशा अविवेकी वाहन चालकांमुळे रोजच मृत्यू घुटमळतोय. एखाद्या घरातली व्यक्ती अशा पद्धतीने अनैसर्गिकरीत्या आणि अल्पावधीत मृत्युमुखी पडल्यानंतर त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. हे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यासारखे नसते. मात्र त्याच्या वेदना या जखमेसारख्या वर्षानुवर्षे वाहत असतात. त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच असंख्य जीव वाचू शकतील.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदस्त दंड व शिक्षेची  तरतूद करण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पुरातन, जुन्या वाहन कायद्यात अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली आहे. सातारा येथील प्रसिद्ध उद्योजक फरोख कूपर यांनी याविषयी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण त्याचवेळी, बेदरकार वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्यांना कठोर शासन करतानाच अपघातांची झळ बसलेल्यांना दिलासा, न्याय, भरपाई मिळालीच पाहिजे याचे उत्तरदायित्व सरकारने घ्यायला हवे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. वाहन कायद्यात बदल झाले, पण संबंधित भा. दं. वि.मध्ये सुधारणा हवी, तरच अपघातग्रस्तांना न्याय मिळेल हा यातील गाभा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या