लेख – प्रासंगिक – सद्गुरू पूर्णदासबाबा उसपकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. सीताराम गिरप

सुमारे सवादोनशे वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यातील उभादांडा या गावी नाथसंप्रदायातील एक अत्यंत प्रगल्भ संतवाङ्मयाचा व मराठी भाषाशास्त्राचा सखोल व गाढा व्यासंग असलेले असे आत्मसाक्षात्कारी संतश्रेष्ठ सद्गुरू पूर्णदासबाबा उसपकर. हे उसपकर ऊर्फ राजाध्यक्ष या घराण्यात होऊन गेले.

या महान प्रज्ञाशील, करुणाशील आणि शांत वृत्तीच्या संताची विठ्ठलभक्ती पराकोटीची होती की, साक्षात पांडुरंग दस्तुरखुद्द रुक्मिणीसह आपले वास्तव्य उभ्यादांडय़ास पूर्णदासांच्या घरी करून राहिले. इतकेच नव्हे तर बाबांच्या आजारपणात या विठ्ठल-रुक्मिणीने मानवी दांपत्याच्या रूपाने काही वर्षे त्यांची सेवाशुश्रूषाही केली. या सर्व गोष्टी आपणास थक्क करून सोडणाऱया आहेत.

थोर संतचरित्रकार ह.भ.प. दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या ‘श्री भक्तिसारामृत’ या ग्रंथातील तेहतिसाव्या (33 व्या) अध्यायात हे सर्व वाचून आपण पूर्णदासबाबांच्या चरणी अगदी नतमस्तक होऊन जातो. त्यांची यथोचित महती वर्णन करताना दासगणू महाराजांनी आपणास आवर्जून बजावले आहे.

‘या कोकणीच्या पुंडलिका ।

तुम्ही कदापि विसरू नका ।

ज्याने आपुला केला सखा ।

दीनोद्धारक जगद्गुरू ।। 204 ।।

प्रत्येक सुजाण मनुष्याने हे लक्षात ठेवावयास हवे आणि निदान एकदा तरी या महानसिद्ध पुरुषाचे चरित्र आणि त्यांनी लिहिलेले वाङ्मय अवश्य वाचवयास हवे. तसेच उभादांडा या गावी जाऊन त्यांच्या समाधीचे आणि त्या साक्षात विठ्ठल, राही रखुमाईचे दर्शन घ्यावयास हवे.

त्यांच्या वंशातील उच्च विद्याविभूषित आणि परोपकारी वासुदेव मंगेश राजाध्यक्ष (94) त्यांचे बंधू दिवंगत रंगनाथ आणि गजानन (वय 89) या त्रयबंधूंनी मोठय़ा परिश्रमाने, चिकाटीने आणि आत्मीयतेने काही वर्षांपूर्वी ‘पूर्णसार’ नावाचा सर्वांगसुंदर व सर्वसमावेशक असा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथात प्रामुख्याने पूर्णदासबाबांनी लिहिलेल्या जवळजवळ सर्वच वाङ्मयाचे दर्शन घडते. भाषा सहजसोपी, रसाळ व प्रासादिक आहे. 312 पृष्ठांचा हा ग्रंथ जिज्ञासूंनी जरूर वाचावा म्हणजे प्रपंच व परमार्थ याची सांगड घालून आत्मसाक्षात्कार कसा करून घेता येतो याचे उचित मार्गदर्शन होऊ शकेल.

अशा या सत्पुरुषाची 151 वी पुण्यतिथी 12 जून 2021  (ज्येष्ठ शुद्ध द्वितीया) शनिवार रोजी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून साजरी झाली. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर झाल्याने 150 वी पुण्यतिथी साजरी करता आली नाही याची मनात खंत आहे.