
>> प्रा. गजानन शेपाळ
संभाजीनगर या शहराला जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा-वेरूळच्या लेणी स्थापत्यामुळे कलाकारीची वैशिष्टय़पूर्ण पार्श्वभूमी लाभलेली आहे. याच कलाभूमीमध्ये 1971 साली कला-क्रांतीचा पाया रचला. त्यावेळच्या सजग आणि कलाहृदय असणाऱया संबंधितांनी शासनस्तरावर आणि मुंबईच्या तत्कालीन सुप्रसिद्ध असणाऱया सर जे.जे. स्कूल समूहाच्या स्वरूपात कला महाविद्यालयाची स्थापना केली. 1971 ते 2020-21 हे पन्नास वर्षे! सुवर्ण महोत्सवी वर्ष या शासकीय कला महाविद्यालयाने अर्थात शाकमने गाठले आहे.
संभाजीनगर शासकीय कला महाविद्यालय म्हणजेच ‘शाकम’ ज्या परिसरात आहे ती जागा ऐतिहासिक आहे. 1692 साली औरंगजेबाने झेब-उन्-निसा या त्याच्या मुलीसाठी तिच्याच नावाने पॅलेस बांधला. जेथून साऱया शहराचे दर्शन व्हायचे इतक्या उंचीवर हा पॅलेस बांधला. किला-ए-अर्क हा सुमारे 3 लाख चौरस फूट परिसर होता त्यावेळी. आज या पॅलेसला 328 वर्षं झालीत. जो पॅलेस 1971 साली ‘शासकीय कला महाविद्यालय’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
कलाध्यापन करणाऱया कलाध्यापकांची प्रदीर्घ शृंखला ही तुटत चालली आहे.. एक ज्येष्ठ कलाध्यापक आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेल्या सरांना ‘सुवर्ण महोत्सवी’ ‘शाकम’बद्दल विचारले असता ते फार उद्विग्नपणे म्हणाले की, ‘सेवानिवृत्त कलाध्यापकांच्या जागा रिक्त होत जातात. कला शिक्षणासाठी मात्र 1971 सालापासून विद्यार्थी इंटेक तेवढाच भरला जातो. मग शिक्षक कमी आणि विद्यार्थीसंख्या तेवढीच. अशावेळी विद्यार्थ्यांना कलाध्यापन करण्यास पुरेसे कलाध्यापक नसतील तर अशा दारुण अवस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करायचा का, असा मला प्रश्न पडतो.’ सरांच्या या विधानाने मला तळमळ ध्यानात आली.
विद्यार्थीदशेत शाकम परिसरात वावरताना अनेक स्मृतींना उजाळा मिळाला. उपयोजित कला, ड्रॉईंग ऍण्ड पेंटिंग, टेक्स्टाईल ऍण्ड वेपिंग आणि एटीडी या चार विभागांत जरी सारे कलाध्यापक होते तरी त्यांचा वावर सर्व विभागांमध्ये असायचा. मग त्यात विद्यार्थीप्रिय प्रा. शशिकांत पेंडसे सर ज्यांना शिस्तही आवडायची आणि कामदेखील. लेटरिंग-टायपोग्राफीसह अगदी विद्यार्थ्यांबरोबर लॅण्डस्केपलादेखील सर असायचे. प्रा. अविनाश परमार यांनी बारकाव्यांसह समृद्ध केलेला फोटोग्राफी विभाग म्हणजे विद्यार्थ्यांचा पिकनिक स्पॉटच असायचा. दिसायला जरी करारी वाटणारे अविनाश सर शिस्तीचे वाटत होते तर त्यांचा तो स्वभाव विद्यार्थ्यांना आवडायचा. त्यांचेच धाकटे बंधू प्रा. प्रवीण परमार सर हेही विद्यार्थ्यांचे कंठमणीच. आजही त्यांचा विद्यार्थी व जनसंपर्क दांडगाच आहे. प्रा. नीलकंठ कुंभार सरांना तर सर्वच विभागातील विद्यार्थी मान द्यायचे. त्यांना मानसशास्त्राची गती होती. कलाध्यापनात मानसशास्त्राचा चपखळपणे विनियोग करून कुंभार सरांनी विद्यार्थ्यांवर विशेषतः विशेष छाप टाकलेली असायची.
टेक्सटाईलचे विभागप्रमुख प्रा. दिनेश आणि मनिषा कुरेकर म्हणजे उपयोजित कलेच विद्यार्थ्यांचे माध्यम मॉडेलच असायचे. प्रा. कुरेकर सर आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विषयांतून कलाकृती निर्माणाचे आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. 1971 पासून शाकमत असलेले प्रा. आप्पासाहेब काटे सरांची ओळख त्यांच्या कामामुळे तर होतीच मात्र शासनाने त्यांना सन्मानित केले ते त्यांच्यातील अनुकरणीय वक्तशीरपणा पाहून. या कलागुरूने संपूर्ण कलाध्यापनाच्या काळात वेळेत शाकमत वर्गात जाणे, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, दांडी न मारणे आणि एकही रजा न घेणे अशी अध्यापक मंडळी क्वचितच. प्रा. व्ही. सी. लोखंडे, प्रा. प्रकाश कावळे, प्रा. उमाकांत साळुंखे, पोलिसी पर्सनॅलिटीचे प्रा. रवींद्र दीक्षित तर ‘हार्ट ऑफ द ऍप्लाईड आर्ट’ असे विशेषण लाभलेले प्रा. अरविंद नागवेकर, प्रा. बितंमवार, डिटेक्टिवसारखे दिसणारे अन् ब्लॉकमेकिंग, क्रीन प्रिंटिंग शिकविणारे प्रा. महाजन, प्रा. नरेंद्र विचारे, आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त प्रा. प्रभाकर कोलते, प्रा. केशव मोरे अशा कलाध्यापकांची त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार खास ओळख निर्माण झालेली होती. प्रा. गो. रा. पवार म्हणजे शिस्त आणि कल्पना याची सुयोग्य मांडणी, पेपरवर व्यक्त करणारी व्यक्ती, जसे आम्ही पहिल्यांदा पाहिले तसेच सेवानिवृत्त होतानाही ते तसेच आहेत. प्रा. गोडघाटे, प्रा. भागवत जमादार यांची ओळखही स्मरणात राहणारी.
जमादार सर म्हणाले की, शाकमला जर वेळीच ए.आय.सी.टी.ईची. मान्यताप्राप्त झाली असती तर मुंबईच्या जे जेबरोबरचे शाकमचे विद्यार्थीही अगोदरच विश्वसंचार करू शकले असते. शा.क.म. येथे कलाध्यापक राहिलेले आणि राज्याचे कलासंचालक झालेले प्रा. म. भा. इंगळे आणि नंतर प्रा. हेमंत नागदिवे यांना विसरणे शक्य नाही. महाराष्ट्रात प्रथम ‘फाइन आर्ट’ विभाग सुरू करण्यातही तत्कालीन कुलगुरू प्रा. नाकोडे यांच्याकडे प्रस्ताव देण्यात शाकमचे विद्यार्थी राहिलेले छायाचित्रकार किशोर निकम आणि नंतर अधिष्ठाता पद भूषविणारे जमादार सर, बढे सर यांच्या प्रयत्नांतून हा विभाग कार्यरत झाला. यावेळी समकालीन कलाध्यापक आणि माजी विद्यार्थी संघटना यांचे योगदान मोठेच राहील.
कलाध्यापकेतर शाकम व्यक्तींमध्ये स्टोअर कीपर किरण व्यवहारे प्रबंधक समूह, पाबळंकर भालेराव, गौ.पि. गौतम, काठार मामा, कॅण्टीनचे दगडूमामा आणि ज्ञानदेव दहीपाल, ही व अशी मंडळी म्हणजे शाकमच्या 50 वर्षांतील ‘माईल स्टोन’च मानावी लागतील. या साऱया निवृत्त कलाध्यापक आणि आजन्म कलागुरूंप्रति सादर भाव व्यक्त होतीच. सरांनी व्यक्त केलेली खंत या सुवर्ण महोत्सवात तिचे निराकरण व्हावे, सेवानिवृत्त कलाध्यापकांचं प्रलंबित प्रश्न, कला विद्यार्थ्यांच्या ‘कलाध्यापक पूर्ण वेळ मिळावेत’ अशा मागण्या पूर्ण झाल्यात तर खऱया अर्थाने ‘सुवर्ण महोत्सवी वर्ष’ साजरे होईल अशी सर्वसाधारण भावना शाकमची आहे. ‘शाकम’ चिरायू होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना!





























































