
मराठेशाहीतील एक चतुर व मुत्सद्दी सरदार म्हणून नारोशंकर राजेबहाद्दर प्रसिद्ध होते. मालेगाव शहराचे व भुईकोटाचे संस्थापक म्हणून ते ओळखले जातात. मराठा साम्राज्याच्या विस्तारात आणि प्रशासनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मूळ पुणे, सासवड येथील नारोशंकर यांना मल्हारराव होळकर यांच्या शिफारशीने पेशव्यांकडून इंदूरचे सुभेदार पद दिले गेले. 1761 सालच्या पानिपत युद्धातही त्यांचा समावेश होता. नारोशंकर राजेबहाद्दर यांची समाधी नाशिक येथील पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या तीरावर रामकुंडाजवळ आहे. त्यांनी इ.स. 1747 मध्ये गोदावरी नदीच्या काठी बांधलेले नारोशंकर मंदिर (पूर्वीचे रामेश्वर मंदिर) हे अत्यंत प्रसिद्ध आहे. हे मंदिर उत्कृष्ट शिल्पकला आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या ’नारोशंकर घंटा’ साठी ओळखले जाते. ही घंटा त्यांनी पोर्तुगीजांकडून विजयाच्या रूपात आणली होती.























































