
>>अॅड. धनंजय माने
ब्रिटिश काळात मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर वकिलीची परीक्षा देऊन वकील होता येत होते. आर्थिक परिस्थितीमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुढे ते वकील झाले. कुशाग्र बुद्धी, अपार कष्ट करण्याची तयारी, अजोड वक्तृत्व या जोरावर ते गोध्रा शहरातील प्रथम क्रमांकाचे वकील झाले. त्यावेळच्या ब्रिटिश न्यायाधीशांनाही त्यांच्या कठोर स्वभावाचा धाक असे. चुकीचे काही असल्यास वल्लभभाई थेट न्यायाधीशांचीही कानउघाडणी करीत असत. काही प्रसंगी तर त्यामुळे ब्रिटिश न्यायाधीशांना माफीदेखील मागावी लागली.
सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबात वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर 1875 रोजी जन्म झाला. शाळेत ते बंडखोर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कामास असलेल्या त्यांच्या चुलत्यांनी त्यांना मुकादम म्हणून नोकरीस लावण्याचा प्रयत्न केला. त्यास त्यांनी विरोध केला. “मला बॅरिस्टर व्हायचे होते’’ असे स्पष्ट शब्दांत चुलत्यांना सुनावले. बॅरिस्टर होण्याचे त्यांचे ध्येय होते. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी वकील होऊन काही वर्षे येथील न्यायालयात प्रॅक्टिस करायची व पैसे जमा झाल्यानंतर परदेशात जाऊन बॅरिस्टर व्हायचे ठरवले. ब्रिटिश काळात मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर वकिलीची परीक्षा देऊन वकील होता येत होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुढे ते वकील झाले. त्यानंतर त्यांनी गुजरातमधील गोध्रा शहरात वकिली व्यवसाय चालू केला. कुशाग्र बुद्धी, अपार कष्ट करण्याची तयारी, अजोड वक्तृत्व या जोरावर ते शहरातील प्रथम क्रमांकाचे वकील झाले. गोध्रा शहरात प्लेगची साथ आल्यामुळे त्यांनी बोरसाड न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली. फौजदारी खटल्यात त्यांचा हातखंडा होता. साक्षीदारांची उलटतपासणी करताना ते साक्षीदारांची भंबेरी उडवत. त्यांनी चालवलेल्या सर्व खटल्यातील आरोपी निर्दोष सुटल्यामुळे ब्रिटिश सरकार चक्रावून गेले होते. एकदा न्यायालयात ते युक्तिवादासाठी उभे राहिले असताना त्यांच्या लक्षात आले की, समोर बसलेल्या ब्रिटिश न्यायाधीशांनी गाऊन घातलेला नाही. त्यांनी युक्तिवाद करण्यास नकार देऊन भर न्यायालयात त्या न्यायाधीशाची कडक शब्दांत कानउघाडणी केली. त्या ब्रिटिश न्यायाधीशांनी वल्लभभाई पटेल यांची माफी मागितली. वल्लभभाई पटेल यांच्या उलटतपासणीमुळे सर्व आरोपी निर्दोष सुटत असल्याने ब्रिटिश न्यायाधीशांनी न्यायालयच दुसऱ्या शहरात नेण्याचे ठरवले, जेणेकरून वल्लभभाई पटेल तिथे येऊ शकणार नाहीत, पण वल्लभभाई पटेल जिथे न्यायालय हलवण्यात आले होते त्या शहरात खटले चालवायला जात असत. त्यामुळे नाइलाजाने पुन्हा ब्रिटिश सरकारने पूर्वीच्याच ठिकाणी न्यायालय स्थापन केले. एक ब्रिटिश न्यायाधीश विचित्र स्वभावाचा होता. त्याने हुकूम काढला होता की, केसची सुनावणी होताना आरोपीने सतत स्वतःचा चेहरा आरशात बघत बसायचे. वल्लभभाई पटेल त्यावर म्हणाले की, “तुम्ही जे करत आहात त्याची तक्रार मी उच्च न्यायालयात करणार आहे’’ असे त्या ब्रिटिश न्यायाधीशाला सुनावले. तो न्यायाधीश घाबरला, त्या ब्रिटिश न्यायाधीशांनी भर न्यायालयात वल्लभभाई पटेल यांची माफी मागितली व “उच्च न्यायालयात तक्रार करू नका’’ अशी विनंती केली. 1908 साली त्यांची पत्नी खूप आजारी होती. तिला उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर एका महत्त्वाच्या अपिलाच्या कामासाठी त्यांना गावाकडे परतावे लागले. अपील सुनावणीदरम्यान पोस्टमनने त्यांच्या हातात एक तार आणून दिली. ती तार त्यांनी वाचली व अपिलाचे काम तसेच पुढे चालू ठेवले व अपिलाचे कामकाज पूर्ण केले. ती तार होती त्यांच्या पत्नीच्या निधनाची ! त्यांचे मन पोलादी होते. ब्रिटिश न्यायाधीशांना भर न्यायालयात माफी मागायला लावणारा असा हा थोर राष्ट्रभक्त होता.






















































