
>> डॉ. सतीश कदम
विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वांत बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचे नाव अफजलखान! खानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. खानाचा शिक्का पाहिल्यावर त्याच्या आत्मविश्वासाचा अंदाज येऊ शकतो. त्यावरील मजकूर – ‘स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजलखानाची उत्तमता पडताळून पाहावी तर प्रत्येक जपमाळेतून अफजल-अफजल असाच आवाज येईल.’
1656 मध्ये मोगल बादशहा औरंगजेबाने याच अफजलखानाच्या तडाख्यातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली होती. मोगलांना मदत केली म्हणून आपलाच मुख्य सेनापती खान महंमदला विजापूरच्या वेशीत अडवून त्याचे तुकडे करण्याचे काम अफजलखानाने केले होते. त्याचप्रमाणे शिवरायांच्या पुळाचा तो द्वेष्टा असल्याने कनकगिरीच्या युद्धात शिवरायांचे मोठे बंधू संभाजी यांचा त्याने दगाफटक्याने मृत्यू घडवून आणला होता. त्यातच पुढे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम (उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती.
शाही फर्माने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले, परंतु अफजलखानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत आणखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंडय़ाचा हत्ती (ढालगज) फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंकाकुशंका सुरू झाल्या. यावेळी खानाला 64 बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला.
विजापूर-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी 5 कि.मी.वर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफझलखानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे 64 कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्त्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. 1880 साली या खात्याचे प्रमुख हेन्री पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आहे.
‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती. तसेच मी माझ्या अभ्यास दौऱ्यात ‘साठ कबर’ या भागाला भेट देऊन तेथील वास्तूचे अवलोकन केले. विजापुरात गोल घुमट, मुलुखमैदान तोफ, अनेक नामांकित वास्तू पाहताना जी भावना असते ती इथे राहत नाही. एक तर ओसाड माळरानात अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळय़ा पाषाणात या 64 कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या दोन रांगेत 7-7 समाधी आहेत, तर तिसऱया रांगेत 5 व 11 समाधींच्या 4 रांगा आहेत. सध्या काही समाधी उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील 42 समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली हा भाग वेगळा. विजापुरात गेल्यावर फार कमी लोक इथे भेट देत असतात. म्हणूनच कदाचित इंग्रजीत याला ‘ब्लॅक टुरिस्ट स्पॉट’ म्हटले जाते. स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल, परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशा समाधी पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे.
पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिह्यातील अफजलपूरला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते. त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे. आजही आपण विजापुरात गेलो तर तिथं आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास अनुभवायचा असेल तर विजापुरात गेल्यानंतर ‘साठ कबर’ नावाच्या स्थळाला जरूर भेट द्यावी.





























































