आभाळमाया – शनीचे चंद्र!

749

>> वैश्विक ([email protected])

एखाद्या ग्रहाच्या नैसर्गिक उपग्रहाला आपण चंद्र म्हणतो, ते पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाचं नाव चंद्र आहे म्हणून. ग्रहमालेतल्या सर्व बहिर्ग्रहांना असे ‘चंद्र’ आहेत. अंतर्गह म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेले बुध व शुक्र. त्यांना चंद्र नाहीत. पृथ्वीपलीकडच्या कक्षेत असलेल्या आणि पुढचं वसतिस्थान म्हणून मानवाला खुणावत असलेल्या मंगळाला अगदी छोटे दोन ‘चंद्र’ आहेत. त्यांची नावं फोबो आणि डिमो (किंवा फोबॉस-डिमॉस). हे चंद्र सूर्याला ‘ग्रहण’ वगैरे लावण्याइतके मोठे नाहीत. त्यांना थोडे मोठे महापाषाण (अशनी) म्हणता येईल. असाल्फ हॉल याने या मंगळाच्या चंद्रांचा शोध 1877 मध्ये लावला. दोन्हीचा अर्थ ‘भीती आणि भीषण’ असा होतो. आता अशी नावं का दिली ते हॉल यांनाच ठाऊक! यापैकी फोबोचा विस्तार अवघा 22 किलोमीटर तर डिमोचा 12 किलोमीटर एवढाच आहे.

त्यानंतरच्या गुरूला बरेच म्हणजे 79 ‘चंद्र’ आहेत. त्यापैकी चार गॅलिलिओने पहिल्या दुर्बिणीतून 1610 मध्येच पाहिले होते. आजही पाच इंची दुर्बिणीतून ते छान दिसतात. आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो हे ते महत्त्वाचे गुरुचंद्र. याच क्रमाने ते गुरूभोवतीच्या कक्षेत भ्रमण करत असतात. चिनी इतिहास तज्ञांच्या मते त्यांना गुरूचे चार चंद्र इसवी सनपूर्व 364 मध्येच माहीत होते. दुर्बिणीतून ते न्याहाळणारा मात्र गॅलिलिओ पहिलाच माणूस. चार गुरुचंद्रांमध्ये ‘गॅनिमिड’ सर्वात मोठा म्हणजे किती, तर बुध आणि प्लुटोपेक्षाही त्याचा आकार जास्त असून मंगळ ग्रहापेक्षा तो थोडासाच लहान आहे. यावरून गुरूच्या ‘गुरु’पदाची (मोठय़ा आकाराची) कल्पना येऊ शकेल.

आता शनीच्या चंद्रांविषयी. त्याच्या एकूण 82 चंद्रांपैकी ‘टायटन’ हा सर्वात मोठा चंद्र आहे. तोसुद्धा पाच इंची व्यासाच्या आरशाच्या परावर्ती दुर्बिणीतून दिसू शकतो. शनी ग्रह त्याच्या प्रचंड ‘कडय़ा’साठी प्रसिद्ध आहेच. मात्र ‘टायटन’ हा गुरूच्या ‘गॅनिमिड’पेक्षा थोडा लहान आहे. शनीच्या 82 चंद्रांपैकी 13 चंद्रांचा विस्तार 50 किलोमीटर इतका आहे. चोवीस चंद्र शनीभोवती फिरत असतात. त्यात मोठय़ा सात चंद्रांचा समावेश होतो. चार छोटे चंद्र हे शनी आणि त्याच्या मोठय़ा चंद्रांमुळे तयार झालेल्या स्थिर लॅग्रॅन्ज बिंदूवर कायमचे अडकलेले दिसतात. उरलेले 58 शनीच्या कडय़ाबाहेरच्या कक्षेतून फिरत असतात. त्यांची व्याप्ती 4 ते 213 किलोमीटर एवढी आहे. शनीचे काही चंद्र त्याच्या गतीशी सुसंगत तर काही विरुद्ध फिरतात. अशा ‘अनियमित’ चंद्रांपैकी फोबीचा शोध 19व्या शतकाच्या अखेरीस लागला.

गेल्या 9ऑक्टोबरला आलेल्या बातमीनुसार शनीभोवतीच्या चंद्रांमध्ये घाऊक वाढ झाली. म्हणजे एकदम वीस चंद्रांची शनीच्या खात्यात भर पडली. 7 ऑक्टोबरला शास्त्र्ाज्ञांनी याविषयी खातरजमा करूनच हे खगोल वृत्त प्रसृत केले. अर्थात या शोधामुळे ग्रहमालेतील सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह असलेल्या गुरूच्या ‘गॅनिमिड’चं स्थान ढळलं नाही. शनीचे हे नवे वीस चंद्र तसे अगदीच फुटकळ म्हणजे अवघ्या पाच किलोमीटर व्यासाचे आहेत.

एवढय़ावरच शनीच्या नैसर्गिक उपग्रहांची संख्या संपत नाही. असे आणखी छोटे-छोटे किमान शंभर ‘चंद्र’ शनीभोवती फेर धरून असावेत असं खगोल निरीक्षकांना वाटतं. या नव्या वीस चंद्रांमधील 17 चंद्र शनीभोवती उलट कक्षेत फिरतात. उरलेले तीन शनीच्या परिवलन (रोटेशन) दिशेनेच फिरत आहेत. शनीचे हे नवे चंद्रसुद्धा सूर्याभोवती ग्रहमाला तयार झाली त्याच काळातील द्रव्यापासून बनलेले असल्याने ग्रहमालेच्या आरंभकाळातील द्रव्याबाबत या चंद्राभ्यासाने काही माहिती मिळू शकते. हवाई येथे असलेल्या प्रचंड दुर्बिणीतून निरीक्षण करताना शिफर्ड आणि त्याच्या टीमला शनीच्या या चंद्रांचा सुगावा लागला. याच मंडळींनी गेल्या वर्षी गुरूभोवतीच्या कक्षेचं बारकाईने निरीक्षण करून तिथे फिरणारे आणखी 12 ‘चंद्र’ शोधून काढले होते. त्यामुळे गुरूच्या नैसर्गिक उपग्रहांची संख्या 79 पर्यंत पोहोचली होती.

सर्वाधिक चंद्र असणारा ग्रह म्हणून ‘गुरू’ला कोणी मागे टाकेल असं तेव्हा वाटलं नव्हतं, परंतु वैज्ञानिक अभ्यासात अचंबित करणाऱ्या गोष्टी अकल्पितपणे सामोऱ्या येत असतात. या वर्षी शनीच्या ‘चंद्रां’नी ते स्थान प्राप्त करून शनीचा मान वाढवला. अर्थात हे सगळं अलंकारिक भाषेत आपण म्हणायचं. त्या ग्रहांना त्याचे काय होय! गुरू अथवा शनीच्या मोठय़ा उपग्रहांवर माणसाला राहण्यायोग्य (हॅबिटेबल) वातावरण असेल आणि भरपूर पाणी असेल तर भावी काळात आपला सौर-कुटुंबाच्या बाहेरच्या विश्वात डोकावणारी यानं तेथून पाठवणं शक्य होईल. म्हणूनच या संशोधनाकडे पुढचं पाऊल म्हणून बघायला हवं.

आपली प्रतिक्रिया द्या