
>> सतीश गोगटे
संपूर्ण जगात जवळपास 2300 पाणथळ जागांचे रामसर संघटनेद्वारे संरक्षण करण्यात आले आहे. मात्र हिंदुस्थानसारख्या आकाराने मोठय़ा असलेल्या भूप्रदेशात यापैकी फक्त 42 पाणथळ जागांचे, रामसर जागांचे आजमितीस संरक्षण करण्यात आले आहे. यावरून आपले निसर्गप्रेम आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने असलेले कार्य किती पोकळ आहे हे सिद्ध होते.
2 फेब्रुवारी 1971 रोजी इराण देशाच्या रामसर या शहरात एक आंतरराष्ट्रीय ठराव संमत झाला, त्यास ‘रामसर ठराव’ असे संबोधले जाते. हा ठराव जगातील असलेल्या पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी तयार केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मदतीने व वेळप्रसंगी आंतरराष्ट्रीय रामसर संघटनेच्या सहाय्याने पाणथळ जागेचा उचित वापर करावा हा उद्देश आहे.
पाणथळ जागेवर सर्वात जास्त प्रकारचे जीव अवलंबून राहतात. कुठल्याही जीवाला अन्न, पाणी, निवारा यांची गरज असते आणि पाणथळ जागा ही गरज सर्वात जास्त पूर्ण करू शकते. म्हणूनच मानवासकट जास्तीत जास्त जीव येथे आकृष्ट होतात. पाणथळ जागेचा आपण जर उभा छेद (Cross section) अभ्यासला तर यातील बऱयाच गोष्टींचे आकलन होते. यासंदर्भात ही आकृती बघावी. पाणी, मृदा, तापमान आणि आर्द्रता हे घटक व सूर्यप्रकाश यांच्यामुळे जीवसृष्टीची वाढ होते आणि प्रथम वाढणारा घटक म्हणजे वनस्पती. म्हणून या चित्रात वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पतींची वाढ होते ते बघू शकतो. पाणथळ जागेच्या खोलगट पाण्याच्या जागेपासून ते किनाऱयाकडे जाऊ लागल्यास आपण सात प्रकारच्या वनस्पतींची विभागणी करू शकतो. जिथे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचू शकतो तेथून वनस्पतींची वाढ सुरू होते.
सर्वप्रथम हरित प्लवके म्हणजेच Phytoplankton ही सूक्ष्म वनस्पती पाण्याच्या तळाशी आढळते. या प्रकारात विविध प्रकारचे शैवाल आढळून येतात. छोटे जलकीटक,जलचर प्राणी, मासे यांचा पण येथे वावर असतो. सूक्ष्म वनस्पतीपासून या प्राण्यांना खाद्य मिळते, तर या प्राण्यांच्या उत्सर्जनावाटे सूक्ष्म वनस्पतींना खाद्य मिळते. अशी परोपकारी जैविकता येथे आढळते. आकर्षक रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो पक्षीसुद्धा येथे पाण्यात उभे राहून आपली ‘ए’ आकाराची मान पाण्यात बुडवून शैवाल खाताना दिसतात. शैवाल हे फ्लेमिंगो पक्ष्याचे प्रमुख अन्न आहे. त्यानंतर पाण्यात बुडालेली वनस्पती म्हणजे Emergent आढळते. या वनस्पतींचे खोड पण पाण्यात बुडालेले असते. थोडय़ा प्रमाणात पाने पाण्याच्या वर असतात. सर्व प्रकारच्या लिली वनस्पती, जलचर कीटक, टॅडपोल, बेडुक्यांचा येथे वावर असतो.
यानंतर जलतरंगी (floating plants) म्हणजेच पाण्यावर तरंगणाऱया वनस्पतींचा समावेश होतो. बेडकांचे हे प्रमुख अधिवासाचे ठिकाण आहे. बेडूक हा उभयचर प्राणी असल्याने पाण्याखाली आणि पाण्यातून वर पण याचा वावर असतो. जल पिंपली ही वनस्पती येथे जास्त आढळून येते. त्याचप्रमाणे बेडूक किंवा जलचर हे ज्या पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे असे बगळे, बलाक, चमचा यांसारखे पक्षी पाण्यात उभे राहून येथे शिकार करताना दिसतात. पाण्यातून डोकावणारी वनस्पती म्हणज aquatic submerged, अर्धी पाण्यात आणि अर्धी वर असतात. कोलशिंदा, पॉंडविड यांसारख्या जलवनस्पतींची येथे वाढ होताना दिसते. बेडूक, मासे आणि इतर जलचर यांचा येथे वावर असतो. तसेच सर्व प्रकारचे बगळे, खंडय़ा पक्षी आपली शिकार येथे साधताना दिसतात.
आता जलसाठय़ाच्या किनारीच्या वनस्पती म्हणजेच Fringing plants, यामध्ये बेशरमी, नळीची भाजी, पाणकणीस यांसारखी वनस्पतीची वाढ प्रामुख्याने दिसते. या भागात काही पक्षी मोठय़ा संख्येने घरटी करताना आपणास दिसतात. जांभळी पाणकोंबडी, कमळपक्षी, वारकरी यांसारखे पक्षी घरटे करताना दिसतात. त्याचप्रमाणे छोटे कीटक, गांडूळ, खेकडे या प्राण्यांची रेलचेल पाणकिनारी दिसते. तुतवार, चिलखा, टिवळा, शेकाटय़ा, शराटी यांसारख्या असंख्य पाण्याच्या काठावर राहणाऱया पक्ष्यांची पण येथे रेलचेल आपणास आढळते. यानंतर गवताळ आणि झाडाझुडपांचा प्रदेश चालू होतो.
जैवविविधतेच्या दृष्टीने जितकी पाणथळ जागा उथळ असते तितके छोटय़ा-मोठय़ा जिवांसाठी अधिवासाचे स्थान असते. उथळ पाण्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळाशी पोहोचतो. सूक्ष्म जीव, जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, मोठे प्राणी आणि अगदी मानवसुद्धा अशा पाणथळ जागेवर अवलंबून असतो. जैविक आणि अजैविक घटकातील परस्परसंबंधाला परिसंस्था असे म्हणतात. ही परिसंस्था कशी कार्यरत असते ते आपण बघूया. अजैविक घटकांमध्ये रासायनिक व भौतिक घटकांचा समावेश होतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या वायूंचा प्रवेश वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात होतो. त्यांच्या शरीरवाढीसाठी हे वायू आवश्यक आहेत. या वायूंच्या मुबलकतेमुळे आणि उपलब्ध सूर्यप्रकाशामुळे येथे वनस्पती, सूक्ष्म जीव, प्राणी, पक्षी यांची संख्या वाढीस लागली. यालाच जैविक साखळी म्हणतात.
जलवनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात व इतर जीवांना पुरवतात. अशा वनस्पतींना उत्पादक म्हणतात. प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते, म्हणून त्यांना भक्षक म्हणतात. भक्षणासाठी भक्षक दुसऱयावर अवलंबून असतो. त्यामुळे अन्नसाखळी तयार होते. प्रथम भक्षक वनस्पतींवर अवलंबून असतो तर द्वितीय भक्षक प्रथम भक्षकांचे भक्षण तर तृतीय भक्षक द्वितीय भक्षकांचे भक्षण करतो. कीटक प्रथम भक्षक बेडूक, मासे इ. द्वितीय भक्षक व सर्प, पक्षी हे तृतीय भक्षक असतात.
संपूर्ण जगामध्ये जवळपास 2300 पाणथळ जागांचे रामसर संघटनेद्वारे संरक्षण करण्यात आले आहे. मात्र हिंदुस्थान यात मागेच आहे. जागतिक तापमानवाढीच्या येणाऱया मोठय़ा संकटाला तोंड देण्यासाठी पाणथळ जागा विकसित करून त्यांचे संरक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये नांदूरमधमेश्वर बंधारा तसेच लोणार सरोवर या दोनच जागांना रामसर जागा म्हणून मानांकन मिळाले आहे. त्यातून सकारात्मक दृष्टिकोन असा की, हिंदुस्थानास येत्या काही वर्षांत रामसर जागा स्थापित करण्यासाठी सर्वात अधिक संधी उपलब्ध आहेत. लोकांमध्ये, मुख्यत्वे ग्रामीण लोकांमध्ये, शेतकऱयांमध्ये पाणथळ जागांचे संरक्षण करणे व त्यांच्या नैसर्गिक वापरामुळे आपण जागतिक तापमानवाढीला कसे रोखू शकतो याबद्दल जागरुकता निर्माण करणे हे महत्त्वाचे कार्य ठरेल. किंबहुना सर्व क्षेत्रांतील नेत्यांनी, अधिकाऱयांनी सामाजिक आणि राजकीय बाबी बाजूस ठेवून निसर्ग रक्षणासाठी कार्य करण्याची गरज आहे. हाच संदेश आपण आजच्या जागतिक पाणथळ दिनानिमित्त देऊ शकतो.





























































