मी माझ्या घरची वैभवलक्ष्मी!

148

>> स्वरा सावंत

आजपासून मार्गशीर्षातील वैभवलक्ष्मी व्रत सुरू झाले आहे. बहुसंख्येने हे व्रत केले जाते. यात महिलावर्गाचा सहभाग विशेष असतो. लक्ष्मीव्रत करायचेच. तिचे मनोभावे पूजनही करायचे. पण प्रत्यक्ष देवानेही आपल्याला कर्मयोगाच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. भक्तीला कृतीची जोड मिळते तेव्हाच लक्ष्मीमातेची कृपा होते. स्त्रियांच्या अंगी आर्थिक नियोजन हे अंगभूतच असते. आम्हीही नियोजनाच्या काही कानगोष्टी तुम्हाला सांगत आहोत

 बिलं ऑनलाइन भरा

खर्चाची यादी करताना जी बिले ऑनलाइन किंवा अधिकृत ऍप्सवरून भरता येणं शक्य आहे ती बिले आणि पेमेंटसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडा. यामध्ये केवळ पैशांचीच नव्हे तर वेळेचीही बचत होते.

डिस्काउंटचा मोह नकोच!

मोठमोठय़ा ब्रॅण्डेड दुकानांबाहेर सवलतींचा फलक लागलेला असतो. अशावेळी ‘बघायला काय जातंय…’ असं म्हणत आपण त्या दुकानांमध्ये जातो. हीच असते विक्रेत्यांची ‘स्ट्रटेजी’. कारण ग्राहक एकदा दुकानात आला की विक्रेते असे काही त्याला ती वस्तू घेऊनच बाहेर पाठवतात. म्हणूनच डिस्काऊंटचा मोह टाळा.

अचानक येणारा खर्च

घरी येणारे पाहुणे, आजारपण, गाडीचा खर्च, वाढदिवस, समारंभ अशा अचानक येणाऱ्या खर्चांची मानसिकता नेहमीच ठेवावी. यामुळे खर्च करताना कोणतीही चिंता सतावणार नाही.

बचतीची खबर कोणालाही नको

सेल्फ इन्व्हेस्टमेंट ही संज्ञाच मुळातच स्वतŠसाठी अशी आहे. यामुळे आपण केलेल्या बचतीची खबर या की त्या कानालाही कळू देऊ नका. कारण घरच्या व्यक्तींमध्ये आपली बचत समजली तर ती पुढील खर्चात  किंवा कौटुंबिक आर्थिक नियोजनात गृहीत धरली जाऊ शकते. यामुळे सेल्फ इन्व्हेस्टमेंटची कल्पनाच बारगळू शकते.

काहीही झालं तरी…. ट्रीट युवरसेल्फ

बचत करायचीय, काटकसर करायची आहे… हे लोन, ही बीले, डॉक्टरर्स… अशा अनेक कठीण प्रसंगातून प्रत्येकालाच जावं लागतं. यासाठी बचत करताना आपलं मन मारून कधीही बचत करू नका… म्हणूनच ट्रीट युवरसेल्फचा हा सल्ला. आपण आनंदी राहून बचत केली तर त्याचं वेगळं ओझं वाटणार नाही, याचीही दखल प्रत्येक वैभवलक्ष्मीने घेतलीच पाहिजे.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी

काटकसर किंवा मनी मॅनेजमेंट याची गरज प्रत्येकालाच आहे. यातून नोकरदार महिलाही काही सुटलेल्या नाहीत. ऑफीसला जाणाऱ्या महिलांनी बचतीसाठी कार्यालयीन पतपेढी, मैत्रिणींनी काढलेली भीशी यातून किंवा सरळ बँकेत पीपीएफ खाते काढून बचत करावी. याशिवाय शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पॉलीसीजच्या माध्यमातूनही आपली मिळकत रोलींग करता येऊ शकेल. आपण केलेल्या बचतीला फाटे फुटू नये असे वाटत असेल तर नोकरदार महिलांनी पीपीएफ खाते राष्टीय बँकेत खोलाच. यामध्ये तुमच्याकडे इतर भत्ते, किंवा एरिअर्सची रक्कम वळवू शकता. ती रक्कम तुम्हाला पुढील अडीच वर्षे तरी काढता येत नाही.

बचतीची यादी करा!

प्रत्येक महिन्याला प्रामुख्याने द्यावे लागणारे खर्च हे अगदी घरगुती स्त्रियांच्या जिभेवर असतात. पण त्याचा हिशेब लागावा यासाठी आपण यादी करतो. अशीच यादी बचतीचीही करा. यामुळे उरलेल्या पैशांतच महिन्याचा खर्च भागवण्याची पर्यायाने बचतीची एक चांगली सवय आपल्याला लागते.

आपली प्रतिक्रिया द्या