
>>नागोराव सा. येवतीकर<<
रांग कशी असते आणि ती कशी असावी हे मुंग्यांकडून शिकावे. मुंग्या रांग सोडून इकडे तिकडे गेल्या तरी परत रांगेत येऊन मिसळतात. आपला संदेश किंवा अन्न शेवटच्या मुंगीपर्यंत याच माध्यमातून पोहोचवत असतात. रांगेचा अनुभव अजून एका ठिकाणी दरवर्षी दिसून येते ते स्थान म्हणजे वारकऱ्यांची दिंडी. डोळे दिपून जातील अशा वारकऱ्यांच्या रांगांच रांगा दृष्टीस पडतात. मात्र इतर बाबतीत सगळा आनंदीआनंदच दिसतो. एस. टी. स्थानकापासून तर अन्य गर्दीच्या ठिकाणांपर्यंत रांगांची शिस्त कोणीच पाळत नाही. शाळेत शिकवलेली ही शिस्त प्रत्यक्ष जीवनात जाते कुठे, हा खरा प्रश्न आहे.
प्रत्येक पालक आपल्या मुलांना शाळेत कशासाठी पाठवतो, या प्रश्नाचे उत्तर आहे शिक्षण घेण्यासाठी. शिक्षण घेतलेल्या किंवा साक्षर असलेल्या पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही का? देता येते. तरीदेखील ते आपल्या मुलांना शाळेत पाठवितात. कारण सामूहिक जीवनात जे शिकायला मिळते त्यातून ज्ञान जास्त समृद्ध होत असते. एकट्यादुकट्याला काही शिकविणे किंवा सांगणे खूप कठीण जाते. त्यापेक्षा सामूहिकपणे दहा-पंधरा जणांना तीच गोष्ट सांगणे सोपे जाते. घर हे मुलांचे पहिले शिकवणी केंद्र असून तेथे त्याला बऱ्याच गोष्टी शिकून आत्मसात कराव्या लागतात. त्यानंतर त्या गोष्टीला परिपक्व करण्यासाठी शाळेचा आधार घ्यावा लागतो. शाळा म्हणजे मुलांवर वाचन, लेखन याचबरोबर चांगले वर्तन करण्याचे संस्कार करणारे केंद्र होय. शाळेच्या परिपाठापासून ते शाळा सुटेपर्यंत मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असेच काही शिक्षण प्रत्येक शाळेतून दिले जाते यात वाद नाही. मोलाचे काही मार्गदर्शनदेखील केले जाते. शिस्त म्हणजे काय असते याची शिकवण येथे मिळते. रांगेत उभे राहणे, रांगेत वर्गात जाणे आणि रांगेत प्रत्येक गोष्ट मिळविण्याची शिकवण शाळेतून दिली जाते. रांगेच्या बाहेर असणाऱ्या किंवा रांगेचे नियम तोडणाऱ्या मुलांना कधी कधी शिक्षेचा सामनादेखील करावा लागतो. प्रत्येक मुलांच्या अंगात रांगेच्या बाबतीत एवढी शिस्त बाणलेली असताना ही मुले जेव्हा नागरिक म्हणून समाजात वावरत असतात तेव्हा शाळेतील सर्व नियम का विसरून जातात हे एक न उलगडणारे कोडे आहे. तसे तर रांगेचा फायदा सर्वांना होतो, मात्र बहुतांश ठिकाणी ही रांगच दिसून येत नाही. त्यामुळे एवढा गोंधळ उडतो की, त्यात वयोवृद्ध आणि लहान मुलांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. रेल्वे स्थानकावर तिकीट घेताना रांग दिसून येते, मात्र रेल्वेत चढताना कुठली आली रांग? याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे आपले काम फत्ते करतात. येथे का आपण आपल्या शिकवणीचा वापर करीत नाही? कोणत्याही धार्मिक स्थळावर दर्शनासाठी गेल्यावर तेथे रांगा लावलेल्या असतात. ज्यामुळे कोणालाही त्रास न होता काम पूर्ण होते, मात्र येथे देखील काही लालची लोकांचा वावर असतो. 50-100 रुपये घेऊन काही लोकं भाविकांना लुटतात आणि चोरट्या मार्गाने दर्शन देऊ करतात. असे का घडत आहे? यावर विचार होणे अपेक्षित आहे. बसस्थानकामध्ये कसल्याही प्रकारचे व्यवस्थापन नसल्यामुळे प्रवाशांना येथे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. वास्तविक येथे कोणत्या गावाची किंवा शहराची बस कोणत्या ठिकाणी लागावी याचे फलक दर्शन लावले जाते. मात्र प्रवासी तेथे न थांबता बस गाळय़ाला लागण्याच्या अगोदरच त्याच्या आजूबाजूने धावतात. बसमध्ये जागा धरण्यासाठी हातात असलेली वस्तू जसे की रुमाल, दस्ती, छोटी पिशवी किंवा छत्री सीटवर टाकून जागा राखीव करतात. बसमध्ये चढताना पूर्णतः चढाओढ होत राहते. त्यात अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसमध्ये एक पद्धत पाहायला मिळाली. जे की आपल्या बस स्थानकावर वापरता आले तर खूप त्रास कमी होऊ शकतो. बस येण्यापूर्वी सर्व प्रवासी स्थानकात रांगेत बसून राहतात आणि रांगेत वर चढतात जसे जागा मिळेल तसे बसून घेतात. हीच पद्धत बस स्थानकात वापरता येऊ शकते. प्रत्येक गाळय़ात प्रवासी बसण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असते. बस येण्यापूर्वी क्रमाक्रमाने प्रवासी बसविले जावे. त्या त्या गावाची बस आल्यावर प्रवासी रांगेत बसमध्ये प्रवेशित झाल्यास एक चांगले व्यवस्थापन दिसून येईल.
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की, एक शाळकरी मुलगी जागा धरण्यास बसच्या मागे धाव घेतली आणि तोल जाऊन मागच्या टायरखाली सापडली, जागीच गतप्राण झाली. बसमध्ये प्रवासी चढताना रांगेत किंवा रांगेत स्थानकात बसून बसमध्ये प्रवेश करते झाले तर असे प्रकार कमी घडतील. आज कोणत्याही बस स्थानकात जर जवळून पाहिले तर तेथे सर्वांची जीवघेणी कसरत दिसून येते. प्रवासी वाहन चालकास वाहन उभेदेखील करू देत नाही की वाहनावर तुटून पडतात. कोणाचा पायपोस कोणामध्ये नसते, यास काही प्रतिबंध करता येत नाही का ? याला शिस्त लावण्याची जबाबदारी कोणाची ? याविषयी कोणाला जाब विचारला जावा?
रांग कशी असते आणि ती कशी असावी हे मुंग्यांकडून शिकावे. मुंग्या रांग सोडून इकडे तिकडे गेल्या तरी परत रांगेत येऊन मिसळतात. आपला संदेश किंवा अन्न शेवटच्या मुंगीपर्यंत याच माध्यमातून पोहोचवत असतात. रांगेचा अनुभव अजून एका ठिकाणी दरवर्षी दिसून येते ते स्थान म्हणजे वारकऱ्यांची दिंडी. डोळे दिपून जातील अशा वारकऱ्यांच्या रांगांच रांगा दृष्टीस पडतात. स्वतःला ते नियमात बसवून घेतात म्हणून त्यांना कोणत्या संरक्षणाची गरज भासत नाही. बऱ्याच ठिकाणी आपणांस रांगा दिसून येतात आणि जेथे रांगा असतात तेथे काही ना काही विकृती आढळून येते. असाच एक प्रसंग नोटाबंदीच्या काळात अनुभवयास मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. त्या कालावधीत अनेक लोकांना या रांगांचा अनुभव आला. बँकेत पैसे भरण्यासाठीदेखील रांगा होत्या तर पैसे उचलण्यासाठीदेखील. एटीएम मशीनवरदेखील मध्यरात्री बाराच्या पुढेदेखील रांगा दिसत होत्या. त्यावेळी याच रांगांमुळे देशात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या बातम्यादेखील वाचण्यात आल्या होत्या. रांगा म्हटले की आपल्या समाजातील काही कुप्रवृत्ती जागी होते आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करते. मग तेव्हा मनात अशी सहज शंका येऊन जाते की, शाळेतून एवढे शिकविले जाते तरी त्याचा फायदा प्रत्यक्षात काहीच होत नाही. आपण लोकशाही हिंदुस्थामध्ये राहतो की श्रीमंतांच्या हुकूमशहाच्या देशात, जेथे पैशाच्या बळावर सर्व नियम धाब्यावर बसविले जातात? शाळा तर सर्वांनीच शिकलेली असते मग शाळेत शिकलेली शिस्त कुठे गेली? असा प्रश्नदेखील मनात येतो. शाळेतल्या कोणत्याच बाबीचा परिणाम प्रत्यक्षात समाजात जीवन जगताना दिसत नसेल तर या शिक्षणाचा फायदा तरी काय? शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे काय? मुलांना पुस्तकी ज्ञान देताना त्यांना मूल्यशिक्षण देण्याचे पार विसरून चाललो आहोत असे वाटते. यावर कुठे तरी विचार मंथन होणे आवश्यक आहे वाटते.






























































