
कोरोनाच्या उद्रेकानंतर बंद झालेले शाळेचे दरवाजे टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागात उघडत असताना शहरी भागातसुद्धा 4 ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत आहे. जरी अकरावी-बारावीचे वर्ग अजूनही ऑनलाइन असले तरी लवकरच तेही प्रवाहात येतील, पण सुरुवात तर चांगली व सकारात्मक झालेली आहे याचा सर्वांनाच आनंद आहे.
कोरोनाचे संकट निवळत असल्याची चाहूल लागतात गेल्या दीड वर्षापासून घरात कोंडलेली मुले हळूहळू बाहेर पडू लागली आहेत. दप्तर खांद्याला लावून मित्रमंडळींबरोबर खेळत, बागडत आपल्या शिक्षकांना भेटता येणार याचा आनंद मुलांना झालेला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशावरून सर्व शाळांमधून शिक्षणोत्सव साजरा करत असताना मुलांनी धोरणाचे सुरक्षित नियम पाळून गाणी, नृत्य, भारूड यांचा सुंदर आविष्कार घडवला. ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा’ या प्रार्थनेतून ते आश्वासनच देत आहेत जणू. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांचे हात विधायक कामासाठी शिवशिवत असतात. त्यांना योग्य वयात योग्य संधी द्यायलाच पाहिजे.‘माझी शाळा माझे विद्यार्थी’ या शीर्षकांतर्गत माध्यमांवर माननीय मुख्यमंत्री यांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांना संबोधित केले, त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. शिक्षक मुख्याध्यापकांपेक्षा अशा जबाबदाऱया खांद्यावर घ्यायला मुलांना खूप आवडते व ते जबाबदारी लीलया पेलतातसुद्धा.
निबंध, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, प्रत्यक्ष संवाद अशा प्रेरणादायी उपक्रमातून सर्व शाळांचा दिलासा देणारा श्रीगणेशा आता सुरू झालेला आहे. आता खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे ती म्हणजे पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ कधीच येणार नाही.
दवंडी शिक्षणाची या व्हिडीओमार्फत ठाणे जिल्हा परिषदेने मास्क वापरणे, गणवेश दररोज धुऊन वापरणे, इतरांच्या वस्तूला हात न लावणे, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, मुलांनी एकमेकांत योग्य अंतर ठेवणे, पुस्तके, वह्या अदलाबदल करू नये, शाळेतून घरी गेल्यावर आंघोळ करावी अशा सूचना करून मुलांना कोरोनाबरोबर शिकण्याचे व जगण्याचे शिक्षण आज शाळेतून दिले जाणार आहे. मुलांना लगेच अभ्यास न शिकवता त्यांच्या मानसिकतेचा विचार करून फक्त आनंददायी वातावरण तयार करून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर सर्व आजूबाजूच्या घटकांबरोबर त्यांनी स्वच्छंद विहार करावा, हेच अपेक्षित आहे. शिवाय दररोज अशा वातावरणात त्यांना आपोआप काही तरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल व त्यानंतर सुरळीत शालेय अभ्यासक्रम शिकवता येईल असा क्रम आहे. त्यामुळे नक्कीच शाळेच्या भिंती, फळे, घंटा आणि बाक बोलकी होतील. त्यांच्याशी मुलांचा व शिक्षकांचे पुन्हा अनुसंधान साधले जाईल व नैसर्गिकरीत्या शिक्षणाची गंगोत्री वाहत राहील. त्यातून ज्ञानाचं, प्रबोधनाचं, संस्काराचं, निर्मळ, स्वच्छ ज्ञानरूपी पाणी वाहत राहील व ज्ञानामृत पिऊन आपले सगळेच बालगोपाळ स्वतःचा सर्वांगीण विकास साधून एक चांगला सहृदयी माणूस तयार होऊन बाहेर पडेल यात शंका नाही.
– डॉ. अंजुषा पाटील

























































