
>> शैलेश माळोदे
प्रा. आर. सुकुमार. वन्यजीव शास्त्रज्ञ. ते केवळ शास्त्रज्ञ नाहीत तर वन्यजीवांचे… अरण्याचे सच्चे दोस्त आहेत.
जुलै महिना हा युरोपच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वांत तापदायकरीत्या अत्यंत उष्ण महिना होता. मात्र त्याच वेळी नाशिकला बऱयापैकी पाऊस बरसत होता. निसर्गाच्या या दोन रूपांच्या अभ्यासातूनच एकूण परिस्थितिकी शास्त्राची ओळख होत जाते. इकॉलॉजिस्ट म्हणून आजकाल आपण सर्रास वापरत असलेला शब्द आपल्याला एखाद्या वैज्ञानिकाची निदान तोंडओळख करून देतोच. तिथून झालेली सुरुवात त्यानंतर आपल्याला घेऊन जाते त्याच्या अंतस्थ कार्यप्रवणतेकडे. तसेच काहीसं झालं प्रा. रामन सुकुमार अर्थात आर. सुकुमार यांच्याबाबत.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजमध्ये व्हिजिटर म्हणून मला काम करण्याची संधी लाभली. जानेवारी 2005 पासून त्या वेळी सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडीज (सीईएस)मध्ये प्रा. माधव गाडगीळ निवृत्तीनंतर मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्रा. आर. सुकुमार त्यांचे पीएच.डी. विद्यार्थी त्या वेळी त्या केंद्राचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी बऱयाचदा चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्याशी सतत, परंतु बऱयाच वेळा दीर्घ कालावधीनंतर संपर्क होत राहिला. हवामान बदल या विषयातील तज्ञतेबरोबरच आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा विषय त्यांच्या अभ्यासाचा होता तो म्हणजे ‘हत्ती.’ त्यालाच आपण दीर्घ वैज्ञानिक विषयाचं नाव देत म्हणूया ‘वन्य जीवशास्त्र’ (वाईल्ड लाईफ इकॉलॉजी) तसे अबोल वाटणारे आर. सुकुमार मिश्कील स्वभावाचे असल्याचं जाणवलं त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच.
प्रा. सुकुमार यांनी त्यांच्या करिअरचा पेटारा उघडला आणि मग त्यामधून भराभर माहिती माझ्या कर्णेंद्रियांवर आदळू लागली. ते म्हणाले, ‘वनांची विशेषतः उष्णदेशीय वनांची इकॉलॉजी हा माझ्या चिंतनाचा महत्त्वाचा विषय आहे. माझा जन्म 1955 चा. 1977 साली मी बी.एस्सी. आणि 1979 साली एम.एस्सी. पदवी मद्रास विद्यापीठातून प्राप्त केली. मला हत्तींविषयी खूप आकर्षण होतं. त्याच वेळी मला संशोधनासाठी आय.आय.एस्सी.त जावं असं वाटे. प्रा. माधव गाडगीळ त्या वेळी इकॉलॉजी विषयी संशोधन करीत होते. त्यांनी मला पीएच.डी.साठी मार्गदर्शन करण्याचं मान्य केलं. त्या वेळी हत्तींविषयी आपल्या मनात बरेच गैरसमज होते. हत्तीला समजून घेण्याची संधी म्हणून मी माझ्या पीएच.डी. प्रबंधाकडे बघतो. 1985 साली मला ती प्राप्त झाली. मी प्रिन्स्टन विद्यापीठात फुलब्राईट शिष्यवृत्तीधारक होतो. ही गोष्ट 1991 ची. आयआयएस्सीत मी अध्यापन आणि संशोधनाचं काम करतो.
इकॉलॉजी आणि संवर्धन जीवशास्त्रात प्रावीण्य मिळवलेल्या आर. सुकुमार यांचा संशोधन आणि संवर्धनातील अनुभव दांडगा आहे. ते म्हणतात, ‘मी माझ्या नॅचरल हिस्ट्रीविषयक कार्याला मद्रासमध्येच सुरुवात केली. त्याद्वारे मी उरलेल्या जंगलाचं अध्ययन करून गिंडी राष्ट्रीय उद्यानास मान्यता मिळवून देण्याच्या कामी छोटंसं योगदान दिलं. 1975-79 या कालातील या योगदानानंतर मी 1980 ते 85 या काळात आशियाई हत्तीची इकॉलॉजी आणि दक्षिण हिंदुस्थानातील मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्षावर काम करून पीएच.डी.साठी संशोधन केलं. बिलिरंगन हिल्समधील हत्तींची नैसर्गिक इकॉलॉजी आणि त्यासंदर्भातील मानव-हत्ती संघर्ष या विषयीचं माझं काम रानटी हत्तींच्या (आशियाई) संदर्भातील एक महत्त्वाचं वैज्ञानिक कार्य ठरलं. हे अत्यंत मुलभूत स्वरूपाचं होतं. अशा प्रकारचे मोठे सस्तन प्राणी आणि मानव यांच्यातील संशोधन परिसंस्थात्मक दृष्टीनं महत्त्वाचं होतं. पीएच.डी.नंतर प्रा. सुकुमार हे हत्तींविषयी आणि दक्षिण हिंदुस्थानातील इकॉलॉजीविषयक एक तज्ञ मानले जाऊ लागले. 1988 पासून मी मदुमलाई अभयारण्यातील हत्तींसारख्या मोठय़ा सस्तन प्राण्यांचे निरीक्षण मॉनिटरिंग करण्याबरोबरच उष्णदेशीय वनातील वनस्पतींचं व्यवस्थापनदेखील अभ्यासत आहे. हस्तिदंतांची चोरटी शिकार थांबविण्यासाठी वैज्ञानिक माहितीधार मी पुरवत आहे.
पदवीधर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संस्थेत व्याख्यानं देण्याबरोबरच परदेशातील अनेक विद्यापीठं आणि परिषदांमधून त्यांनी अध्यापन आणि शोधनिबंधाच्या सादरीकरणाचं कार्य केलंय. 2008 पासून मी वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्षाचा अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या बहुसंख्यात्मक आणि सर्वंकष संशोधन प्रयत्नाचं समन्वयक करण्याचं काम मी इंडो-नॉर्वेजियन प्रयत्नांतर्गत ठरत आहे.
प्रा. सुकुमार विविध समित्यांवर अध्यक्ष, सदस्य म्हणूनदेखील केंद्र शासन, राज्य शासन आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीजसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी 100 हून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले असून यातून हत्तींचं जीवशास्त्र, उष्णदेशीय (ट्रॉपिकल) वन परिसंख्याशास्त्र्ा, हवामान बदल आणि निसर्ग संवर्धन विषय हाताळले आहेत. त्यांची हत्तींवरची चार पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. यातून हत्तींविषयीची अद्ययावत आणि सर्वंकष माहिती मिळते. सध्या ते कोलंबिया विद्यापीठाचे ऍडजंक्ट फॅकल्टी म्हणून 2001 पासून ते कार्यरत असून ते तरुण संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात. असा हा हत्तीमित्र तज्ञ प्रा. आर. सुकुमार.


























































