
>> अॅड. प्रतीक राजूरकर
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील लाखो निरपराध ज्यू नागरिकांच्या निर्घृण सामूहिक हत्याकांडास जबाबदार असलेला हिटलरचा सहकारी आणि जर्मनीचा लष्करी अधिकारी ऍडॉल्फ आयिकमन याला 1960च्या दरम्यान इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या गुप्तहेरांनी अत्यंत धाडसी आणि नाटय़मय कारवाई करून अर्जेंटिनातून अपहरण करून इस्रायलमध्ये आणले. जेरुसलेम न्यायालयाने आयिकमनला लाखो ज्यू नागरिकांच्या सामूहिक अमानवीय हत्येसाठी दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. 1 जून 1962 रोजी आयिकमनला फाशी देण्यात आली. वास्तविक इस्रायलमध्ये बेकायदेशीर कृत्ये हिंसक असली तरी इस्रायली कायद्यात मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नाही. मात्र त्याला एकमेव अपवाद ठरली ती आयिकमन याला दिलेली फाशी. इस्रायलने हजारो मैल दूर असलेल्या अमानवीय हत्याकांडातील गुन्हेगारास तीन पावले ‘टाकत’ कायदेशीरपणे यमसदनास धाडले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलची ओळख एक आक्रमक आणि जहाल राष्ट्र म्हणून प्रख्यात आहे. इस्लामिक दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेल्या इस्रायलबाबत इतिहासात अनेक घटना आणि प्रसंग न शोधता सापडतील. जगाच्या पाठीवर ज्यू धर्मीयांचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव राष्ट्र म्हणून इस्रायलने स्वतःची जगाला जाणीव करून देणारी एक घटना 1960 साली घडली. दुसऱया महायुद्धाच्या काळात नाझी अधिकाऱयांनी लाखो ज्यू धर्मीयांची केलेली अमानुष हत्या अंगाचा थरकाप उडवणारी आहे. ज्यू धर्मीयांचे प्रतिनिधित्व करणाऱया इस्रायलने स्वतः व जगाला त्या अमानुष हत्याकांडाचा विसर पडू दिला नाही. नाझी सैन्य पराभूत झाले होते. नाझींचा सर्वेसर्वा असलेल्या हिटलरने आत्महत्या केली होती, परंतु ज्यू धर्मीयांच्या अमानुष हत्येला कारणीभूत असलेला अडॉल्फ आयिकमन नावाचा अधिकारी अद्याप मोकाट होता.
जर्मनीच्या पराभवानंतर आयिकमनला अमेरिकन सैन्याने अटक केली होती. आयिकमन काही काळ अटकेत होता. एक दिवस तो तुरुंगातून पलायन करण्यात यशस्वी ठरला. तिकडे 1949 मध्ये इस्रायलची मोसाद गुप्तचर यंत्रणा अस्तित्वात आली होती. आयिकमन आपले नाव बदलून अनेक देशांत आश्रय घेत पळत होता. अखेर आयिकमन अर्जेंटिनाला रिकार्डो क्लेमंट नावाने स्थायिक झाला. आयिकमन आपल्या कुटुंबासमवेत अर्जेंटिना येथील सॅन फर्नांडो येथे असल्याची मोसादकडे पक्की बातमी होती. अर्जेंटिनाने अनेक आश्रित व्यक्तींच्या प्रत्यार्पणाच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती. अर्जेंटिना अनेकांना लपण्यासाठी आदर्श देश होता. अर्जेंटिनाचा प्रत्यार्पणाबाबतचा लौकिक बघता इस्रायलने आयिकमनचे अर्जेंटिनातून अपहरण करून त्याला इस्रायलला आणण्याची धाडसी गुप्त योजना आखली.
पीटर माल्किन व इतर सात गुप्तचरांची आयिकमनला अर्जेंटिनातून अपहृत करून आणण्यासाठी निवड करण्यात आली. स्पेनविरोधात क्रांतीचे 150 वे वर्ष साजरा करण्यात अर्जेंटिनाचे प्रशासन व्यस्त होते. अनेक राष्ट्रांना अर्जेंटिना या सोहळ्यात आमंत्रित करणार होता. मोसादसाठी ही सुवर्णसंधी होती. आंतरराष्ट्रीय कायदे-नियम धाब्यावर बसवून इस्रायलने दुसऱया देशाच्या सैन्य अधिकाऱयास तिसऱया देशातून पकडून आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आयिकमनला पकडण्यासाठी मोसादच्या आठ गुप्तचरांच्या समूहात आवश्यक सर्व विशेषज्ञ होते. डॉक्टर, नेमबाज, द्विभाषिक या विशेषज्ञांचा त्यात समावेश होता. वेगवेगळ्या नावाने, विविध देशांतून मोसादचे गुप्तहेर अर्जेंटिनाच्या सॅन फर्नान्डो येथे एकत्रित आले. 1960 साली मे महिन्याच्या पूर्वार्धात कामावरून परत येत असताना आयिकमनच्या राहत्या घराजवळ मोसादच्या गुप्तचरांनी अपहरण करून अर्जेंटिनाच्या एका गुप्त ठिकाणी आणले.
अपहरणानंतर नऊ दिवस मोसादचे गुप्तहेर अर्जेटिनामध्येच वास्तव्यास होते. आयिकमनच्या अपहरणानंतर काय परिस्थिती उद्भवेल यावर पुढील निर्णय घेण्याचे अगोदरच ठरले होते. आयिकमन हा अर्जेटिना येथे खोटय़ा नावाने वास्तव्यास होता. या कारणास्तव आयिकमनच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार न करता त्याची रुग्णालय व इतर ठिकाणी चौकशी सुरू केली. पोलीस तक्रार केल्यास आयिकमनची खरी ओळख बाहेर येईल अशी त्याच्या कुटुंबीयांना भीती असावी. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा धाडसी नियोजन करणाऱया मोसादने पोलीस तक्रार न झाल्याच्या अनुकूल संधीचा फायदा घेतला नसता तर नवल. सर्व परिस्थितीची शहानिशा करून मोसाद गुप्तचरांनी आयिकमनला इस्रायलला नेण्यासाठी दुसरे पाऊल टाकले.
अर्जेंटिनाचे प्रशासन आपल्या देशाच्या क्रांती पर्वाचे 150 वे वर्ष साजरे करण्याच्या नियोजनात व्यस्त होते. मोसादने आयिकमनला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. इस्रायल हवाई सेवेतील एक कर्मचाऱयास अपघात होऊन त्याचा मेंदूला जबर मार बसल्याचे कारण अर्जेंटिनाच्या हवाई प्रशासनाला देण्यात आले. तशी कायदेशीर परवानगी घेऊन मोसादच्या गुप्तहेरांनी बेकायदेशीरपणे आयिकमनला अर्जेंटिना येथून इस्रायला आणले. इस्रायलला आल्यावर तीन दिवसांनी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान डेविड गुरिओन यांनी युद्ध गुन्हेगार अडॉल्फ आयिकमनला अर्जेंटिना येथून आणल्याचे जाहीर केले. हे कळताच अर्जेंटिनाने आयिकमनला परत ताब्यात देण्याची केलेली मागणी इस्रायलने धुडकावून लावली. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटलेच. अनेकांनी आयिकमनने जर्मनीत गुन्हा केल्याने त्याविरोधात जर्मनीत खटला चालवण्याची मागणी केली, तर काहींनी तटस्थ ठिकाणी आयिकमनविरोधात खटला चालवावा अशी मागणी केली. या सर्व मागण्या इस्रायलने धुडकावून लावत आयिकमन ज्यू नागरिकांच्या सामूहिक हत्येला जबाबदार असल्याने त्याच्या विरोधात जेरुसलेम न्यायालयात खटला चालेल असे जाहीर केले. इस्रायलने अगोदरच 1950 साली जगात ज्यू नागरिकांवर झालेल्या अत्याचारांविरोधात इस्रायल न्यायालयांना अधिकार देणारा कायदा अमलात आणला होता. आयिकमनला कायदेशीर शिक्षा देण्याच्या दिशेने इस्रायलने तिसरे पाऊल टाकले.
एप्रिल 1961 साली जेरुसलेम न्यायालयात ज्यू नागरिकांचे सामूहिक हत्याकांड, अमानवीय कृत्य, युद्धातील गुन्हे असे एकूण 15 आरोप ठेवण्यात आले. खटल्याचे थेट वार्तांकन करण्यासाठी 60 देशांचे वृत्त प्रतिनिधी न्यायालयात हजर होते. संपूर्ण नियमांचे पालन करत खटल्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. आयिकमनचे कृत्य हे नाझी प्रशासनाचा अधिकारी या नात्याने केल्याने त्याबाबत पश्चात्ताप नसल्याचे आयिकमनने न्यायालयास सांगितले. जेरुसलेम न्यायालयाने आयिकमनला लाखो ज्यू नागरिकांच्या सामूहिक अमानवीय हत्येसाठी दोषी ठरवून 15 डिसेंबर 1961 रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. 1 जून 1962 रोजी आयिकमनला फाशी देण्यात आली. बेकायदेशीर कृत्ये जरी हिंसक असली तरी इस्रायली कायद्यात मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नाही. हिटलरचा साथीदार आणि लाखो निरपराध ज्यूंच्या सामूहिक हत्याकांडास जबाबदार असलेला जर्मन अधिकारी आयिकमन याला झालेली मृत्युदंडाच्या शिक्षा मात्र या प्रथेला अपवाद ठरली. इस्रायल, जर्मनी, अर्जेटिना या तीन देशांचा या प्रकरणात मुख्यत्वे संबंध होता. इस्रायलने हजारो मैल दूर असलेल्या अमानवीय हत्याकांडातील गुन्हेगारास तीन पावले ‘टाकत’ कायदेशीरपणे यमसदनास धाडले.





























































