
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱया आचार्य अत्रे पुरस्काराने गौरविण्यात आले. वैद्य यांचे जन्मगाव जव्हार (जि. पालघर). वडिलांचे छत्र अगदी लहानपणीच हरपले. त्यामुळे त्यांच्यासह सर्व भावंडांचा सांभाळ आईनेच केला. ‘काकी’ या नावाने परिसरात परिचित त्यांच्या आई सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. महिला साक्षरता, व्यसनमुक्ती, आदिवासी महिला मंडळ असे कार्य त्यांनी केले. आईच्या या कार्याचा प्रभाव विजय वैद्य यांच्यावरही पडला आणि पुढे पत्रकारिता करताना ही बांधिलकी त्यांनी सातत्याने जपली. 1966 च्या दरम्यान ‘नवाकाळ’चा ‘बातमीदार’ या रूपात विजय वैद्य यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. पुढे दै. ‘नवशक्ति’, ‘देशदूत’, ‘मुंबई सकाळ’, साप्ताहिक ‘मार्मिक’ अशी दैनिके आणि साप्ताहिकांमधून त्यांनी सातत्याने लिखाण केले. ‘धैर्य’ आणि ‘वैभव विजय’ ही दोन स्वतःची साप्ताहिकेही चालवली. ‘मुंबई सकाळ’मध्ये वार्ताहर ते उपमुख्य वार्ताहर असा उल्लेखनीय प्रवास त्यांचा राहिला. त्यापूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी लिपीक म्हणून नोकरी केली. मात्र नंतर पूर्णवेळ पत्रकारिता करण्याच्या उद्देशाने ती सोडली. पत्रकारिता करीत असताना त्यांचा भर नेहमीच सामाजिक प्रश्नांवर राहिला. बेपत्ता व्यक्तींचा प्रश्न त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून धसास लावला आणि हे त्यांचे वाखाणण्याजोगे कार्य म्हणता येईल. मुंबई मराठी पत्रकार संघातही ते विविध पदांवर सक्रिय होते. अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. 1987 मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर’ पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्याशिवाय वरुणराज भिडे पुरस्कार, कृ. पां. सामक जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळाले. आता त्यांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत तब्बल पाच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेल्या विजय वैद्य यांचा हा गौरव इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.






























































