शाहिरीचा झंझावात – शाहीर अमरशेख

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या बुलंद शाहिरीने लोकजागृती करणारे शाहीर अमरशेख यांची 20 ऑक्टोबर ही जयंती. शाहीर अमरशेख कवी होते, गीतकार होते, पोवाडाकार होते, लोकनाटय़कार होते आणि गात्या गळ्याचे बुलंद आवाजाचे शाहीर होते. त्यांचे काव्य हे सर्वसामान्यांच्या अस्मितेचा हुंकार होते. राष्ट्रप्रेमाचा उद्घोष करताना तसेच अन्यायाविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांचा अंगार व्हायचा. महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱया या थोर शाहिराला विनम्र अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अमरशेख यांनी लाल बावटा कला पथकाद्वारे वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान मांडले. साम्यवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव या तिन्ही शाहिरांवर होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील, गोवा मुक्ती संग्रामातील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे होते. शेतकरी आणि कामगार यांच्या वंचना, उपेक्षा आणि शोषण याविरुद्ध सातत्याने आवाज उठविण्याचे काम या शाहिरांनी केले. बार्शीचे महबूब हुसेन पटेल म्हणजेच शाहीर अमरशेख. अमरशेख म्हणजे क्रांतिकारक शाहिरीचे जणू धगधगते अग्निकुंड! शाहीर अमरशेख कवी होते, गीतकार होते, पोवाडाकार होते, लोकनाटय़कार होते आणि गात्या गळ्याचे बुलंद आवाजाचे शाहीर होते. त्यांचे काव्य हे सर्वसामान्यांच्या अस्मितेचा हुंकार होते. त्यांच्या काव्यातील, पोवाडय़ातील शब्दांची जातकुळी संत तुकारामाच्या अभंगांच्या जातकुळीशी अगदी मिळती जुळती होती. राष्ट्रप्रेमाचा उद्घोष करताना तसेच अन्यायाविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांचा अंगार व्हायचा. अमरशेखांनी गायलेल्या एका गीतातूनच त्याची कल्पना येते –

बर्फ पेटला हिमालयावर विझवायाला चला चला
फक्त रक्त द्या, वृद्ध तरुण या, द्या रे साद हाकेला।।
घडू नये ते आजला घडते
स्वातंत्र्याचे बाळ रांगते
स्वतंत्र विहराया धावते
बंधू चिनी सुरा घेऊनी काळ होऊनी आला –
रक्ताचे खत मिळता थोडे
सीमेवरची झुडपे झाडे
देशरक्षण्या बनतील वेडे
तृणपर्णांना मिळेल शक्ती –
तेच रोखतील हल्ला
रक्त हिमगिरीवर चढू द्या
जनसागर सीमेला भिडू द्या
शिरकमले अग्नीत पडू द्या
ध्वज राष्ट्राचा सीमेवरती भिडू द्या रे गगनाला।।
पक्ष पंथ धर्म भेद सारूनी।। गिळिली भूमी मुक्त करोनी
गान शांतीचे घुमवू गगनी
न्यायी भारत, नाही आक्रमक, दावू या जगताला।।

‘अमरशेखांची कविता’, ‘तांबडं फुटलं’, ‘अमरशेख व्यक्ती आणि वाङ्मय’, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील शाहिरांचे योगदान’, ‘अमरशेखांच्या कवितेतील तत्त्वचिंतन’, ‘मानवतेचा अमरदीप’ अशी पुस्तके शाहीर अमरशेखांवर आचार्य डॉ. माधवराव पोतदार यांनी लिहिली आहेत. ‘मानवतेचा अमरदीप’ या ग्रंथात आचार्य डॉ. पोतदार यांनी अमरशेखांच्या शाहिरीची समीक्षा करताना म्हटले आहे, ‘मानवता कलंकित करणाऱया करंटय़ांच्या’ विरोधात आग ओकणारा व खराखुरा ज्वालाग्रही बनणारा असा हा कवी होता. मराठीतल्या असंख्य कवींपेक्षा प्रकृतीने आणि कृतीने पूर्ण वेगळा असलेला. ‘आग ओकणे मजला प्यारे’ म्हणणारा. वाईट तेवढे जाळणारा, पण चांगले तेवढे मात्र ठेवणारा असा हा कविधुरंधर. रसरसलेल्या क्रांतीचा, परिवर्तनाच्या भुकेचा आणि भव्यदिव्य काही घडावे या अभिलाषेचा, मानवशत्रूंचा कर्दनकाळ वाटावा अशा प्रकृतीचा असूनही तो लोकजागृतीकार शाहीर होता. शाहीर अमरशेख यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील मंतरलेल्या दिवसांची आठवण सांगताना कॉम्रेड रोझा देशपांडे यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या शाहीर अमरशेख अध्यासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे- अमरशेखांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा पहाडी आवाज व त्या आवाजातील कणखरपणा व मार्दव यांचे मिश्रण असे की, त्यांच्या आवाजाशिवाय सभा सुरू होऊच शकत नव्हती. आतापावेतो कम्युनिस्ट पक्षाच्या सभेच्या सुरुवातीस गाणे म्हणणाऱया शाहीर अमरशेखांशिवाय आता समितीची सभा सुरू होऊ शकत नव्हती. शाहीर अमरशेख उभे राहिले की, ‘‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’’ ही घोषणा सभेतील जनता करीत असे. डॉ. सुधीर फडकेंचे –

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।
सभेच्या सुरुवातीचे हे काव्य म्हणजे घनघोर लढाईची गर्जना होती. अमरशेखांचे स्वतःचे गाणे –
हिंदी संघराज्याच्या आत्म्या घेई प्रणाम।
पराधीन जगताच्या नेत्या घेई प्रणाम।।
त्यांच्या बुलंद आवाजातली गाणी लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत, तर कधी –
रात्र आहे वैऱयाची, जागा रहा जागा रहा।

हे गाणे गिरणभागातील तरुणांना खरोखरच गस्त घालण्याची स्फूर्ती देई. गाण्यातूनदेखील हे शाहीर जनतेला मार्गदर्शन करीत होते.

कामगार, शेतकऱयांच्या एकजुटीचे अमरशेखांचे गाणे फारच लोकप्रिय झाले होते –

शेतकऱयांनो या रे, घ्या एकीची हाती मशाल।
कामगार या सारे, उधळा वरती रक्त गुलाल।।
अमरशेखांचे हे गाणे संयुक्त महाराष्ट्राबद्दल आहे –
जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना।
गाऊ उंचावुनी माना। घेऊ तानावर ताना।।
पुढे मराठी भाषा, महाराष्ट्राची भौगोलिक घडण, इतिहास सांगत. ते केवळ संयुक्त महाराष्ट्र मागत नाहीत, तर –
स्वातंत्र्य शांतता स्थापू। अवघे जग त्याने व्यापू।
फडकवू ध्वज समानतेचा । पर्वा न जिवाची करता।
संयुक्त नवा महाराष्ट्री दाखवू विभवाप्रत चढताना।।
हे उत्तुंग ध्येय संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमध्ये अंतर्भूत असल्याची ते ग्वाही देतात.

सुप्रसिद्ध प्रकाशक आणि अमरशेखांचे मित्र वामनराव भट त्यांना ‘बहुजनांचा बालगंधर्व’ म्हणत.

महाराष्ट्र राज्य यंदा आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. कोरोनाच्या महामारीचे महासंकट राज्यावर आहे. देशावर आणि राज्यावर आलेल्या संकटांचा सामना करताना शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर, आत्माराम पाटील, शाहीर साबळे, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर वसंत बापट, शाहीर ग. दि. माडगूळकर आदी शाहिरांनी जनजागृती केली होती. हाती डफ घेऊन आज सामाजिक विलगीकरणाच्या या काळात शाहीर अमरशेखांची आठवण मनाला चटका लावून जाते.

आपली प्रतिक्रिया द्या