
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
शेतकरी आणि कामगार यांच्या वंचना, उपेक्षा आणि शोषण याविरुद्ध सातत्याने आवाज उठविण्याचे काम शाहीर अमरशेख यांनी केले. संघर्ष हा मानवी जीवनाचा विशेषतः कष्टकरी समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, हे विचारसूत्र स्वीकारून, मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून शाहीर अमरशेख यांनी आपल्या साहित्यातून जगण्यातील संघर्षाचा आणि वर्गविग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा आलेख मांडला. अमरशेख महाराष्ट्राच्या कष्टकरांच्या अस्मितेचा हुंकार होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर आणि शाहीर अमरशेख यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे 1944 साली त्यांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या संग्रामातील, गोवा मुक्तिसंग्रामातील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे होते. शेतकरी आणि कामगार यांच्या वंचना, उपेक्षा आणि शोषण याविरुद्ध सातत्याने आवाज उठविण्याचे काम या शाहीरांनी केले.
बार्शीचे महबूब हुसेन पटेल म्हणजेच शाहीर अमरशेख. अमरशेख म्हणजे क्रांतिकारी शाहिरीचे जणू जनक ! शाहीर अमरशेख कवी होते, गीतकार होते, पोवाडेकार होते आणि गात्या गळ्याचे बुलंद आवाजाचे शाहीर होते. त्यांचे काव्य हे सर्वसामान्यांच्या अस्मितेचा हुंकार होते.
राष्ट्रप्रेमाचा उद्घोष करताना तसेच अन्यायाविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांचा अंगार व्हायचा. अमरशेखांनी गायलेल्या गीतातूनच त्याची कल्पना येते.
‘बर्फ पेटला हिमालयावर विझवायाला चला चला
फक्त रक्त द्या, वृद्ध तरुण या द्या रे साद हाकेला।।
घडू नये ते आजला घडते
स्वातंत्र्याचे बाळ रांगते
स्वतंत्र विहराया धावते
बंधू चिनी सुरा घेऊनी काळ होऊनी आला –
रक्ताचे खत मिळता थोडे
सीमेवरची झुडपे झाडे
देशरक्षण्या बनतील वेडे
तृणपर्णांना मिळेल शक्ती –
तेच रोखतील हल्ला
रक्त हिमगिरीवर चढू द्या
जनसागर सीमेला भिडू द्या
शिरकमले अग्नीत पडू द्या
ध्वज राष्ट्राचा सीमेवरती भिडू द्या रे गगनाला।।
पक्ष पंथ धर्म भेद सारूनी।। गिळिली भूमी मुक्त करोनी
गान शांतीचे घुमवू गगली
न्यायी भारत, नाही आक्रमक दावू या जगताला।।’
कामगार-शेतकरी एकजुटीचे अमरशेखांचे गाणे फारच लोकप्रिय झाले होते –
शेतकऱयांनो या रे, घ्या एकीची हाती मशाल।
कामगार या सारे उधळा वरती रक्त गुलाल।।
अमरशेखांचे हे गाणे संयुक्त महाराष्ट्राबद्दल आहे.
अमरशेखांच्या काव्यात एका बाजूला जसा कणखरपणा होता तसेच मृदुताही होती. त्यांनी केलेले बार्शीच्या पुष्पावती नदीचे आणि पुष्पावतीच्या काठाचे वर्णन पुढीलप्रमाणे –
‘पुष्पावतीस पाणी नाही। बालेघाटी काळी आई
यांच्या उदरी बाल्य उमलले। निर्जल म्हणुनी असे खुरटले
महाराष्ट्राच्या दरी कपारीत। राघू मैना कोकिळ कूजन
बालेघाटी मात्र माझिया। व्हला पारवा करतो गायन’
‘धरतीमाता’, ‘कलश ’, ‘अमरशेखांचे पोवाडे’ ही त्यांची पुस्तके, तर ‘पहिला बळी’ हे नाटक अशी साहित्य संपदा अमरशेखांनी निर्माण केली. ‘समाजवादी शिवाजी’ हा त्यांचा पोवाडा त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक दृष्टीचे भान देणारा आहे. ज्येष्ठ कवयित्री मल्लिका अमरशेख आणि प्रेरणा बर्वे या अमरशेखांच्या कन्या. अनिल बर्वे आणि नामदेव ढसाळ हे त्यांचे जावई. मल्लिका अमरशेख यांनी मुलाखतीत आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या त्या अशा – ‘महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी भाईंचे खेडोपाडी कार्यक्रम व्हायचे. लोक त्यांचा कार्यक्रम पाहायला आवर्जून यायचे. जर माईक बंद पडला तर शेवटच्या माणसापर्यंत विदाऊट माईक त्यांचा आवाज पोहोचायचा इतका पहाडी आवाज असायचा. कार्यक्रम सुरू असताना मध्यंतर झाल्यानंतर ते डफ फिरवायचे. त्या डफात लोक 5 रु., 10 रु., 50 रु. जे काही असेल ते टाकायचे. तो डफ पूर्ण भरून जायचा आणि तो भरलेला डफ आयोजकांच्या समोर नेऊन द्यायचे आणि म्हणायचे की, ‘तुमच्या शाळेला हा निधी, याच लोकांकडून आलेला तेवढा तो घ्या आणि माझा डफ मला परत द्या.’ ते रियाजासाठी दऱयाखोऱयात जाऊन मोठमोठय़ाने उंच स्वरात गाणी म्हणायचे. त्यामुळे त्यांचा आवाज खूप तयार होत गेला.
कऱहाडकरांनी त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीची संथा दिली. कोल्हापूरच्या मंडळींनी माझ्या वडिलांना अमरशेख हे नाव दिलं आणि ते कायम झालं. त्यांना असं वाटायचं की हा तळागाळातला लाखोंचा समाज आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत याच्यासाठी मी कम्युनिस्ट पार्टीत काम करीत आहे आणि या तळागाळातल्या लोकांसाठी मला गाणं म्हणायच आहे. त्यांचं प्रबोधन करायचं आहे. त्यांच्यासाठी मी आहे आणि हे फिल्ममध्ये राहून साध्य होणार नाही तर याच्यासाठी मला त्यांच्यापर्यंतच गेलं पाहिजे. त्यांनी समाधान आणि लोकांच्या प्रेमाशिवाय काही मिळवलं नाही, पण त्यांनी जे मिळवलं ते पिढय़ानपिढय़ा पुरेल असं आहे. आणि मला नेहमीच अभिमान वाटतो की मी इतक्या मोठय़ा आणि समर्थ माणसाची मुलगी आहे.’
कला ही जीवनापासून वेगळी करता येत नाही आणि जगणं सतत कलात्मक असेलच असे नाही. संघर्ष हा मानवी जीवनाचा – त्यातल्या त्यात कष्टकरी समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, हे विचारसूत्र स्वीकारून तसेच मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून अण्णाभाऊ साठे, अमरशेख आणि गवाणकर यांनी आपल्या साहित्यातून जगण्यातील संघर्षाचा आणि वर्गविग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा आलेख मांडला. शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर ही त्रिमूर्ती म्हणजे महाराष्ट्राच्या कष्टकऱयांच्या अस्मितेचा हुंकार होती.





























































