
>> स्वाती विप्रदास
गुरुर्बह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रह्म, तस्मेश्री गुरुदेव नमः
भटकलेल्या मनाला स्थिर करणारे सद्गुरू. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय सर्वकाही आयुष्य निष्फळ असते.अंधारात सापडलेल्या भक्तांना योग्य दिशेने नेणारी बॅटरी दाखवणारे सद्गुरू असतात. सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा 75 चा समाधी सोहळा 1 मेपासून सुरू होत आहे. ज्याची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. आठ दिवस सद्गुरूंच्या नामस्मरणात तल्लीन होणाऱ्या भक्तांना अनोखी अनुभूती यातून मिळते.
महाअष्टमीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात भक्तांची ब्रह्मानंदी टाळी लागते. महाअष्टमीच्या दिवशी पालखी, भजन, आरती, महाप्रसाद हे सगळे कार्यक्रम असतात. रात्री जागरण, गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी काला कीर्तन होते आणि सोहळा पूर्ण होतो. या आठ दिवसांत जणू मठात दीपावली साजरी होत असते. पहाटे चार वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होत असतात. सद्गुरू स्नान, पूजा आरती, नैवेद्य, प्रसाद, भजन, प्रवचन, कीर्तन, गायन, नामस्मरण, मन नामाने भारावून जाते. प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची वैश्विक ऊर्जा काम करत असते. हात काम करतात, मन नामाने आनंदून जाते. ही जादू फक्त संत दरबारात पाहायला मिळते. जो तो प्रयत्नात असतो आपणाला या सोहळ्यात लाभ मिळावा म्हणून. सद्गुरू कृपेने आमंत्रण ज्यांना मिळते तो तेथे येतोच.
सद्गुरूंच्या सहवासासाठी लेकरू येते तसेच प्रत्येक भक्ताचे मन सद्गुरूपाशी येतेच. तो सहवास व प्रसाद याचा लाभ मिळावा ही इच्छा मनात धरून सद्गुरूंच्याकडे धावत असते. संतांकडे भेदभाव नसतो. ते प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या भक्तीप्रमाणे लाभ मिळवून देतात. मनाच्या खोल अंधाऱ्या दरीत वाईट विचारांचा कचरा साठत असतो. तो सद्गुरूंच्या नामस्मरणाने दूर होतो. कृपेचा स्वच्छ उजेड मनात जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी भक्ताच्या मनाची बॅटरी चार्ज होते. आयुष्य जगायला ताकद देते. संकटे काय, अडचणी काय ज्याच्या त्याच्या वाटेत असतातच, त्यातून चालण्याचे सामर्थ्य लाभते हीच तर खरी गुरुकिल्ली भक्तांना लाभत असते. कितीही लिहिले तरी पूर्ण होणारच नाही, एवढे ब्रह्मांड भरून गेले आहे.































































