
>> प्रशांत गौतम
साहित्य पत्रकारिता, बाल साहित्य, समीक्षा, संपादन या क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणारे शंकर सारडा गुरुवारी अखेरच्या प्रवासाला निघून गेले. अनेक वर्षांपासून पार्किन्सनच्या व्याधीने ते त्रस्त असले तरी ग्रंथवाचन हे चालूच होते. साहित्याप्रति अपार निष्ठा असलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व कितीतरी नव्या लेखकांचे प्रेरणास्थान होते. नवोदितांच्या लेखनाची, सकस, कसदार साहित्य निर्मितीची सदैव पाठराखण करणारा, पाठीवर हात ठेवून शाबासकी देणारा, प्रसंगी लेखकांच्या नव्या लेखनातील दोष परखडपणे सांगणारा, अनेकांचा हा मार्गदर्शक आता काळाच्या पडद्याआड गेला. सारडांच्या लेखन प्रवासाच्या प्रदीर्घ कालखंडात लेखक आणि कार्यकर्ता अशी दोन चाके होती. त्यांनी कधी एकमेकांवर कुरघोडी केली नाही, तर ते दोन्ही एकमेकांना पूरकच होते. 4 सप्टेंबर 1937 रोजी महाबळेश्वर येथे जन्म झालेल्या सारडांचे शिक्षण पुण्यात न्यू इंग्लिशमध्ये झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात म्हणजेच एस. पी. कॉलेजमधून मराठी विषयात बी. ए. झाले, तर एम. ए. मुंबई विद्यापीठातून उत्तम गुणांनी संपादन केली. पुढे गुणविशेषाच्या बळावर अमेरिकेतील हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. किशोर वयातच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली. बालमित्र, आनंद, साधना, मुलांचे मासिक यात प्रारंभीच्या काळात त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. सारडांचे वाचन अतिशय अद्ययावत असायचे. ग्रंथ लेखन, प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय असेच राहिले आहे. विश्व साहित्यातील फेरफटका, बेस्ट सेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशा अनेक स्तुत्य उपक्रमांतून त्यांनी वाचन संस्कृती जागवली. स्वतःची साठेक पुस्तके असताना ग्रंथविषयक उपक्रमाच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा जास्त ग्रंथांचे परीक्षण विविध दैनिकांच्या रविवार पुरवण्या, विविध वाङ्मयीन मासिकांत लिहिले. टॉलस्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱयांचा अनुवाद करून वाचकांची अभिरुची अधिक समृद्ध केली. झिपऱया आणि रत्नी, नंदनवनची फेरी, दूरदेशीचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्र्ााrवादी कादंबरी अशी त्यांची स्वतंत्र साहित्य संपदा सांगता येईल. 1968 च्या सुमारास ते ‘साधना’चे अतिथी संपादक होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ह. मो. मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षाखाली’ ही कादंबरी प्रकाशित केली. बाल साहित्य लेखन आणि चळवळीशी त्यांचा जुना स्नेह. भा. रा. भागवत यांचा ‘फास्टर फेणे’ मुलांत बराच लोकप्रिय आहे. त्याच्या निर्मितीमागेही सारडा यांची प्रेरणा होती. सारडा हे लेखक घडवणारे संपादक होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बालकुमार संमेलनात त्यांची उपस्थिती नक्की ठरलेली असायची. साहित्य संमेलनास उपस्थित राहून वृत्त संकलन करणारा हा संपादक विरळाच म्हणावा लागेल. सातारा येथे म्हणजे त्यांच्याच जिह्यात प्रख्यात साहित्यिक व नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजनात त्यांची भूमिका नांदीपासून सूप वाजवण्यापर्यंत वैविध्यपूर्ण होती. देखण्या स्मरणिकेचे संपादन असो नाही तर संमेलनातील कार्यक्रम पत्रिकेचे नियोजन असो, त्यात त्यांनी आपल्या कार्यकौशल्याची छाप सोडली. महाबळेश्वरचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन संमेलनांच्या इतिहासात गाजले. त्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आनंद यादव यांच्या सोबत दुसरे प्रमुख उमेदवार आणि महाबळेश्वरचे भूमिपुत्र शंकर सारडा होते. निवडणुकीत सारडा पराभूत झाले, पण यादवही त्यांच्याच एका कादंबरीमुळे अडचणीत सापडले. वादविवाद टोकाला गेल्याने त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण? हा प्रश्न ऐरणीवर होता. महाबळेश्वरचे भूमिपुत्र म्हणून अध्यक्षपदाचा सन्मान द्या अशी सारडा यांची भूमिका होती. तत्कालीन साहित्य महामंडळाने ती मान्य केली नाही. बिन अध्यक्षांचे संमेलन ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गाजवले. आपल्याच जन्मगावात झालेल्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभू शकला नाही व नंतरच्या काळातही तो लाभला नाही. शंकर सारडा यांच्या निधनाने साहित्य, समीक्षा, वाङ्मयीन चळवळी, बाल साहित्याची हानी झाली. इतरांना चांगले म्हणणे, कौतुक करणे हा दुर्मिळ गुण त्यांनी कायम जपला. तोच त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता.




























































