शेगाव की ‘शिव’गाव?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

गावा-गावांच्या वेशीवर स्थापन झालेले आणि त्या गावाचे रक्षणकर्ते म्हणून अष्टौप्रहर जागृत असणारे श्रीशंकर हे ग्रामदैवत म्हणूनच आपली ओळख प्रस्थापित करून जनमानसामध्ये स्थिर झाले आहे. अनेकदा एखाद्या दैवताविषयी पुराणकाळात घडलेली घटना त्या गावाला त्या दैवताच्या नावाची ओळख देते. असेच काहीसे सध्या ‘शेगाव’ या नावाने परिचित असलेल्या गावाविषयी घडलेले असावे. म्हणूनच ‘शेगाव’ हा पूर्वीच्या ‘शिवगाव’ किंवा ‘शिवग्राम’चा अपभ्रंश आहे हे सत्य प्राचीन काळापासून दृढ व चिरंतन आहे.

केवळ महाराष्ट्र प्रांतामध्येच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानात श्रीशंकर, श्रीगणपती, श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीमारुती व श्रीदेवीमातेची मंदिरे प्रामुख्याने आणि विपुलतेने आढळतात. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर श्रीशंकराचे आणि गावामध्ये श्रीहनुमंताचे मंदिर किमान असतेच. या दोन्ही देवतांची मंदिरे नाहीत असे एखादे गाव केवळ अपवादानेच आढळेल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्र प्रांतातील काही गावांची नावे देवदेवतांच्या नावांवरून पडलेली आहेत, तसेच काही गावांच्या नावांवरून त्या गावाचे दैवत ‘ग्रामदैवत’ म्हणून ओळखले जाते. असे अद्भुत वैचित्र्य जगात अन्यत्र कुठेही सापडणार नाही हेदेखील तितकेच खरे. त्यातदेखील बऱयाचशा स्थानांचे कर्तेपण श्रीशंभू महादेवांच्या बाबतीतच लागू होते हे आणखी एक वैशिष्टय़ नजरेआड करून चालणार नाही.

गावा-गावांच्या वेशीवर स्थापन झालेले आणि त्या गावाचे रक्षणकर्ते म्हणून अष्टौप्रहर जागृत असणारे श्रीशंकर हे ग्रामदैवत म्हणूनच आपली ओळख प्रस्थापित करून जनमानसामध्ये स्थिर झाले आहे. अनेकदा एखाद्या दैवताविषयी पुराणकाळात घडलेली घटना त्या गावाला त्या दैवताच्या नावाची ओळख देते. असेच काहीसे सध्या ‘शेगांव’ या नावाने परिचित असलेल्या गावाविषयी घडलेले असावे. म्हणूनच ‘शेगाव’ हा पूर्वीच्या ‘शिवगाव’ किंवा ‘शिवग्राम’चा अपभ्रंश आहे हे सत्य प्राचीन काळापासून दृढ व चिरंतन आहे.

शेगांव ही सद्यकाळात ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. 23 फेब्रुवारी 1878 या पुण्यदिवशी इथल्या भूमीवर परमेश्वराची पावले श्रीगजानन महाराजांच्या रूपाने अवतरली, नांदली आणि कायमस्वरूपी स्थिर झाली. तब्बल 32 वर्षांच्या अवतारकार्यामुळे श्रीगजानन महाराज यांचे शेगांव येथे वास्तव्य झाले. 8 सप्टेंबर 1910 रोजी श्रीमहाराज येथे समाधिस्थ झाले असले तरीही त्यांच्या चैतन्यमयी अस्तित्वाची ओढ लागलेले त्यांचे लाखो भक्तगण आजही शेगांवी त्यांची दर्शनभेट घेण्यासाठी धाव घेतात. त्यांच्या अवतारकार्याची, त्यांच्यातील देवत्वाची, साधुत्वाची प्रचीती आजवर अनेकांनी अनुभवलेली आहे आणि यापुढेही अनुभवतील म्हणूनच ‘ही दंतकथा न अवघी, या गजाननाची ग्वाही’ असे म्हणत संतकवी दासगणूंनी श्रींच्या शेगांवातील चिरंतन वास्तव्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

‘शेगाव’ ही पुराणकाळात शृंगमुनींची तपस्याभूमी होती असे अभ्यासकांचे मत आहे. शृंग आणि गर्ग मुनींचे आश्रम, तसेच तपसाधनेची जागा येथेच होती. पुढे शृंगमुनींच्या आश्रमामध्ये साधकांचा वावर वाढला तेव्हा त्यांच्याकरिता वसलेले शृंगगाव नावाचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ झाले असे या गावाच्या नाममहात्म्याविषयी सांगितले जाते. त्यासोबत, शेगावच्या पूर्व नावाविषयी आणखी एक कथा सांगितली जाते, त्याविषयीच्या खुणा येथे अजूनही पाहावयास मिळत असल्याने त्या कथांविषयी ममत्व बाळगणे महत्त्वाचे ठरते. ही पूर्वकालीन खूण म्हणजे येथील श्रीशंकराचे प्राचीन देवालय. या देवालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे श्रीशंभूमहादेव एकटे वास्तव्यास नसून जगत्चालक विष्णू भगवंताला आपल्यासोबत घेत ते शेगावच्या पुण्यभूमीत पूर्वापार स्थानापन्न झाले आहेत.

शेगावमध्ये सध्या श्रीशिवमंदिर किंवा मोटय़ांचे महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पूर्वीपासून श्रीहरिहराचे मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचे कारण वर सांगितल्याप्रमाणे, येथे पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव यांचे एकत्रित वास्तव्य पाहवयास मिळते. श्रीशिवपिंडी आणि श्रीविष्णूमूर्ती येथे ‘हरिहराचे प्रतीक’ म्हणून ग्रामस्थांकडून पूजल्या जातात. हा शेगावचा पुरातन वारसा आहे. हरिहर मंदिराचा जीर्णोद्धार येथील मोटे नावाच्या सावकारांनी केला.

मोटे सावकार धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी, समाजोपयोगी कामे केली. इथे असलेले हॉस्पिटल (सध्या सईबाई मोटे रुग्णालय नावाने परिचित) मोटे सावकारांच्या दानशूरतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून सुपरिचित आहे. मोटे सावकारांनी या प्राचीन हरिहर मंदिराचा दुरुस्ती आणि डागडुजीसह जीर्णोद्धार केला. त्यांच्या या कार्य-प्रशंसनार्थ शेगावकर मंडळी हरिहर मंदिराचा उल्लेख ‘मोटय़ांचे महादेव मंदिर’ नावाने करू लागली.

कालांतराने हरिहर मंदिराचा जीर्णोद्धार श्रीगजानन महाराज संस्थान (शेगाव) यांच्या वतीने करण्यात आला. त्यांनी येथे संगमरवरी दगडातून भव्य मंदिर साकारले. श्रीगजानन महाराजांची शेगांवकरांसोबत झालेली पहिली ओळख या हरिहर मंदिराच्या साक्षीनेच घडली होती. गोविंदबुवा टाकळीकर या ज्येष्ठ कीर्तनकारांनी श्रीमहाराजांमधील देवत्व जाणले व शेगावकरांना त्यांचा परिचय घडवला.

अवतारकार्याच्या प्रारंभिक काळात श्रीगजानन महाराजांनी या शिवमंदिरामध्ये बराच काळ वास्तव्य केले होते. सुकलाल नावाच्या भक्ताची द्वाड गाय आणि कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांचा नाठाळ घोडा श्रीमहाराजांनी या शिवमंदिराच्या प्रांगणातच शांत केला. या शिवमंदिरासोबतच गावाच्या पलीकडे असलेल्या आणखी एका शिवमंदिरामध्ये श्रीगजानन महाराजांनी काही काळ वास्तव्य केले होते. हे शिवमंदिर कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात होते. येथे श्रीगजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ‘नैनं छिंदंती शस्त्राणि नैनं दहति पावकः’ अर्थात पवित्र आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाही आणि अग्नी जाळू शकत नाही हे शास्त्रवचन सप्रमाण सिद्ध करून दाखविले होते. याच शिवमंदिरात श्रीमहाराजांनी चुकीच्या पद्धतीने ‘वेद’पठण करणाऱया साधूंना योग्य रीतीने वेदमंत्र आणि ऋचा कशा म्हणाव्या याचा बोध केला होता. रेल्वेलाईनलगतच्या या शिवमंदिराचाही उत्तमप्रकारे जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे.

श्रीगजानन महाराजांच्या अवतार कार्यामधील अनेक प्रसंगात श्रीशंभूमहादेवाचे अस्तित्व दिसते. पिंपळगावचे शिवमंदिर, श्रीओंकारेश्वर आणि श्रीत्र्यंबकेश्वर येथील प्रसंग व तेथील स्थानमाहात्म्य ‘श्रीगजानन विजय’ ग्रंथामध्ये वर्णन केल्याचे दिसून येते.

[email protected]