शिरीषायन- आपली लता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

लताच्या तोंडाला मास्क अडकवलेला होता. तिची अन्य ट्रिटमेंटही चालू होती. माझा फोन वाजला. तिने घेतला.
मास्कआडून ती कशीबशी बोलली, ‘आज किनाई… मी बोलू शकणार नाही.’

‘हरकत नाही.. नंतर बोलू.’ मी घाईघाईने म्हणालो.
‘तसं नाही.’ लता म्हणाली, ‘मी बोलू शकणार नाही. तुम्ही बोला. मी ऐकते.’
माझी दांडीच गुल झाली. मी बोलणार आणि लता ऐकणार? लतानं ऐकावं अशा लायकीचं मी काय बोलणार होतो?
एकदा मी तिच्याशी फोनवर बोलत असताना दुसऱ्या फोनची घंटी वाजली. मी वाजू दिली. शेवटी लताच म्हणाली, ‘घ्या ना तो फोन.’

‘अहो दीदी…’ मी मेटाकुटीला येत म्हणालो, ‘भाजीवाल्याचा फोन घेण्यासाठी मी तुमचा फोन ठेवला हे बाहेर कळलं तर लोक मला दगडांनी चेचून मारतील. बरं, ‘पत्थर से न मारो मेरे दिवाने जिगर को’ असं म्हणणारंही कोणी नाही.’
ती मास्कआडून हसली व नंतर सरळ मास्क काढून ठेवून गप्पा मारायला लागली. डॉक्टर गेले तेल लावत. तिला गाण्यांखालोखाल गप्पा प्रिय होत्या. मला गप्पांखालोखाल गाणं प्रिय होतं, पण खुद्द लता मंगेशकर मला प्राणप्रिय होती त्याचं काय?

मला आमची पहिली भेट स्वच्छ आठवत्येय. आठवणारच, ती काय विसरण्यासारखी गोष्ट होती? ती कुठल्याशा ‘प्रेस कॉन्फरन्स’च्या निमित्तानं ताज महाल हॉटेलात आली होती. ‘प्रेस कॉन्फरन्स’ संपल्यावर मी हिंमत करून तिला एकटीला बाजूला गाठलं, पण बोलायचं काय? मी कोणी लल्लूपंजू नसून तिच्या गाण्याचा दर्दी अभ्यासक आहे हे सर्वप्रथम तिच्या मनावर बिंबवणे हे माझं उद्दिष्ट होतं, पण म्हणजे नक्की काय करायचं? परवचा म्हणावा तद्वत तिच्या जुन्या, दुर्मिळ, श्रवणीय गाण्यांचे मुखडे सांगावेत का? काहीतरीच. ती मध्येच उठून गेली असती. मी घाईघाईने शक्य तेवढा विचार केला व सज्जादविषयी बोलायला सुरुवात केली. मला सज्जाद माहित्येय म्हणजे बरंच काही माहित्येय असं तिला वाटलं असतं. ती सज्जादविषयी काहीबाही बोलली व माझा पुढला (ज्ञान दाखविणारा) प्रश्न यायच्या आत उठून निघून गेली. सज्जाद आणि मी एकटेच राहिलो. लेकीन बच्चो और बुढों, मैंने सुरों की मलिका लता मंगेशकर से बात की थी.

मी तिला त्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये (व्हॅनिला) आइक्रिम खाताना पाहिले होते. (त्यामुळेच आइक्रिमच्या अन्य ‘व्हरायटीज’ असतानाही मी व्हॅनिला खाल्ला. मित्रांना सांगायला की मी आणि लता व्हॅनिला खातो.) पुढे लताशी घसट वाढल्यावर मी तिला विचारलं, ‘गळ्यासाठी तुम्हाला खातापिताना काळजी घ्यायला लागते का?’

‘नाही बाई.’ लता फटदिशी म्हणाली. ‘माझे असले चोचले नाहीत. मी काहीही खाते. तुम्ही मला मागे व्हॅनिला आइक्रिम खाताना बघितले होते ना?’
मी अक्षरशः मनोमन खजिल झालो. काय मेमरी आहे की काय आहे? म्हणजे मी दोन व्हॅनिला आइक्रिम खाल्ली होती हेही तिनं पाहिलं असेल व लक्षातही असेल. बापरे! संभल के रहेना, बच्चू!

त्यानंतर पुढेमागे मी लतासमोर संपूर्ण निःशस्त्र होऊन खुशाल उभा राहीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण लतामधली आई मला दिसली तशी व तितकी आणखी कोणाला दिसली की नाही मला माहीत नाही.
एकदा मी तिच्याशी फोनवर बोलत असताना मागे पार्श्वभूमीवर कोणी तरी मोठमोठय़ानं ओरडत होतं.
‘कोण ओरडतंय – आय मीन, बोलतंय?’ मी दचकून विचारलं.

‘उषा मंगेशकर’ लता शांतपणे म्हणाली. ‘त्या एकदा बोलायला लागल्या की आम्ही सगळे गप्प बसतो.’
‘दीदी, तुम्ही मटण खूप छान करता म्हणे.’
आमच्या घरच्यांनी हे उठवलंय माझ्यावरील प्रेमापोटी. आमची आशा खरंच सुगरण आहे. ती काहीही छान करते. मटण तर बोलूच नका.’

‘खरं आहे.’ मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. ‘मी तिच्याकडे मटणाचं जेवण जेवलोय.’
सगळ्या बहिणींच्या जिभांना भरी चव आहे. लता माझ्याकडे कोळंबीची खिचडी व खिमा पॅटिस खाऊन गेली. प्रकृती बरी नसताना व पोट बिघडलेलं असताना तिनं खिमा पॅटिस मागून खाल्ले. आपल्या सुगरणपणाचं एवढं चीज होईल असं माझ्या बायकोला कधीच वाटलं नव्हतं. येऊन-जाऊन जेवणार कोण, तर माझे टोळभैरव मित्र अन् एक दिवशी थेट लताच आली. तत्पूर्वी सुनील गावसकर, शशिकला व ओ. पी. नय्यर जेवायला आले होते. मी ओ.पी.ला समग्र लता ‘वाढली’ होती. एकापाठोपाठ एक तिची गाणी ऐकता ऐकता ओ.पी. भान हरपून उठून उभा राहिला व कानाच्या पाळ्या पकडत उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘साली ऐसी आवाज सौ साल में नहीं होगी.’
मज पामराच्या प्रयत्नांनी ओ.पी.-लता युती होऊ शकली असती का? हू नोज!

 [email protected]