
>> डॉ. रामनाथ खालकर
छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता, तेजस्विता, दक्षता, धैर्य, शौर्य व शुचितेचे दर्शन होते. महाराजांनी निश्चयपूर्वक केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यास इतिहासात तोड नाही. हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराजांनी राम व कृष्णाप्रमाणे जे धर्मसंस्थापनेचे राष्ट्रकार्य केले त्याचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त…
भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात भगवद्भक्ताची अनेक लक्षणे सांगितली आहेत. शुचिता आणि दक्षता (शुचिर्दशः) यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे शिवराय होत. गीतेतील दहाव्या अध्यायात भगवंताच्या अनेक विभूती सांगितल्या आहेत. त्यात मनुष्यांमध्ये राजा (नराणां च नराधिपम्।) ही एक विभूती सांगितली आहे. हे सांगत असताना श्रीकृष्णाच्या मनात शिवाजी महाराजांसारख्या धर्मसंस्थापक व युगप्रवर्तक राजाचे चित्र असावे असे जाणवते.
छत्रपती शिवरायांचा जन्म सतराव्या शतकात झाला. त्यावेळेस हिंदुस्थानात सर्वत्र दुप्रवृत्त राजांची सत्ता होती. महाराष्ट्रात नगरच्या निजामशहाची व विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती. हे सर्व राजे आपल्या चैनीत व विलासात दंग होते. त्यांना प्रजेच्या रक्षणाची व कल्याणाची चिंता नव्हती. इतकेच नव्हे तर ते प्रजेवर जुलूम करत. लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हते. सर्वत्र अनाचार व अत्याचार होत होते. लोक पूजापाठही करू शकत नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील वतनदारांचेही प्रजेच्या हिताकडे लक्ष नव्हते. प्रजेवर त्यांचे प्रेम नव्हते. त्यांना फक्त आपल्या वतनाच्या रक्षणाची चिंता होती. यासाठी ते आपापसात लढत. यात प्रजेचे अतोनात हाल होत असत. प्रजेस कोणीही वाली राहिला नव्हता. सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. प्रजापालन हे राजाचे आद्यकर्तव्य असते हेच विसरले होते. सरदार आणि बादशहांच्या अधर्माचरणामुळे धर्म निप्रभ तर अधर्म प्रभावी झाला होता. अधर्मास राजाश्रय मिळाला होता व धर्म अनाथ व परांगदा झाला होता.
अशा या अधःपतित परिस्थितीत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ही महाराष्ट्राची व संपूर्ण राष्ट्राची गरज होती. शिवाजी महाराजांनी ही परिस्थिती जवळून पाहिली. महाराष्ट्राच्या व राष्ट्राच्या अवनतीस जबाबदार असणार्या दुप्रवृत्त राजे, बादशहा व वतनदारांची सत्ता नष्ट करून त्या जागी धर्माधिष्ठत हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. येथूनच धर्मचक्रपरिवर्तनास सुरुवात झाली. महाराजांना दुष्पप्रवृत्त राजसत्तेच्या आश्रयाने प्रभावी झालेल्या अधर्मास व अनीतीस निप्रभ करावयाचे होते व धर्माधिष्ठत स्वराज्याची स्थापना करून धर्म व नीतीची स्थापना करावयाची होती.
श्रीमद्भगद्गीतेतील चौथ्या अध्यायातील परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।। या आठव्या श्लोकामध्ये साधूंचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन व धर्मसंस्थापना अशी ईश्वरी अवताराची तीन प्रयोजने सांगितली आहेत. धर्मसंस्थापनेसाठी दुष्ट व दुर्जनांचा नाश करणे अपरिहार्य आहे याचे कारण दुर्जनांच्या आश्रयाने अधर्म प्रभावी होते. अफजलखान महाराजांच्या बंदोबस्ताचा विडा उचलून विजापूरहून निघाला. त्याने रस्त्यात रयतेचा छळ केला. तुळजापूर व पंढरपूर येथील देवस्थानांना उपद्रव केला. अशा दुप्रवृत्त अफजलखानास महाराजांनी मोठय़ा धैर्याने व दक्षतेने धुळीस मिळविले. दक्षिणेत स्थिरस्थावर झाल्यावर महाराजांनी दिल्लीतील मोगल सत्तेस आव्हान दिले. त्यावेळेस दिल्लीत औरंगजेब या मोगल बादशहाची सत्ता होती. त्याच्या मुलखावर महाराजांनी स्वार्या केल्या.
शिवाजी महाराजांना श्रीकृष्णाप्रमाणेच दुप्रवृत्त स्वकीयांशीही लढावे लागले. महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेस विरोध केला. ते परकीय सत्तेस जाऊन मिळाले. त्यांनी शिवरायांच्या विरुद्ध कारस्थाने केली, परंतु महाराजांनी जितक्या निष्ठgरतेने परकीयांचा बंदोबस्त केला. तितक्याच कठोरतेने स्वकीय शत्रूंचाही बंदोबस्त केला. दुष्पप्रवृत्तांचा बंदोबस्त करताना महाराजांनी स्वकीय-परकीय असा भेद केला नाही. आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेत मदारी मेहतरने महाराजांची सुटका होईपर्यंत महाराजांची सोबत केली. आपल्या जीवाची पर्वा न करता महाराजांचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांनी जीवाला जीव देणारी निष्ठावान माणसे घडविली. महाराजांसाठी व स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारी माणसे निर्माण केली. शिवरायांची माणसे सिंहाप्रमाणे शूर होती.
परकीय शत्रूंशी लढताना महाराजांनी ‘गनिमी कावा’ ही युद्धनीती वापरली. बलाढय़ पण दुप्रवृत्त शत्रूंशी लढताना हीच नीती वापरावी लागते. श्रीकृष्णाने दुप्रवृत्त कौरवांशी लढताना पांडवांना धर्माचरणास फाटा देऊन आपद्धर्माचरण म्हणजे संकटकालीन धर्माचे आचरण करण्यास सांगितले होते. ‘गनिमी कावा’ ही आपत्कालीन युद्धनीती होय.
श्री शिवछत्रपतींनी प्रथम माणसे घडविली व नंतर पुरुषार्थ करून महाराष्ट्र घडविला. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. महाराजांना स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्याचे रक्षण करताना अनेक संकटे आली. स्वामिनिष्ठ माणसे गमवावी लागली. महाराजांच्या अविरत व अविश्रांत प्रयत्नांना शेवटी यश मिळाले. स्वराज्य उभे राहिले. 1674 मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शिवराय छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा गौरव वाढविला. शिवरायांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. ते धर्म व नीतीवर अधिष्ठत होते. त्यांची न्यायव्यवस्था अतिशय कडक व निष्पक्ष होती. महाराजांच्या राज्यात प्रजा सुखी झाली. कलियुगात महाराजांनी ‘रामराज्य’ निर्माण केले. शिवशाही अस्तित्वात आली. जिजाऊ माँसाहेबांचे, शहाजीराजांचे व शिवरायांचेही स्वप्न साकार झाले!
शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सर्व जगाला धर्मसंस्थापनेची वाट दाखविली. असा राजा पुन्हा होणे नाही! परंतु अशाच धैर्यधुरंधर व कर्तव्यकठोर राजाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे.
(लेखक तत्त्वज्ञान विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)





























































