परीक्षण – स्त्रीच्या घुसमटीचे विदारक वास्तव

>> श्रीकांत आंब्रे

कन्या झाली हो…’ ही ज्येष्ठ साहित्यिक अविनाश कोल्हे यांची नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी स्त्री-मुक्तीच्या संकल्पनेशी नाते सांगणारी असली तरी त्यापेक्षा आजच्या काळातील स्त्रीच्या घुसमटीचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. समाजात होणारे स्त्रीचे शोषण आणि तरीही अनेक अडचणींना तोंड देत कर्तृत्वाच्या जोरावर यशाची शिखरे पादांत करण्यासाठी तिची चाललेली धडपड या दोन्ही गोष्टींचे दर्शन या कादंबरीत घडते. ही एका विवाहित स्त्रीच्या संसारात तिच्या होणाऱया घुसमटीची कथा असली तरी तिला समाजाच्या चित्रविचित्र मानसिकतेचे अनेक पदर आहेत. स्त्री शोषणाच्या परंपरा, पद्धती आणि प्रथा यांचे समाजाला लागलेले ग्रहण आजही पूर्णपणे सुटलेले नाही.  पूर्वी सती प्रथा, विधवा केशवपन, कौटुंबिक गळचेपी, स्त्राr शिक्षणाला विरोध अशा अनेक तऱहांनी तिचा छळ सुरू होता. आज हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या, शारीरिक-मानसिक अत्याचार घटस्फोटाचा तगादा इत्यादी मार्गांनी तिची पिळवणूक होत असते. ग्रामीण भागातच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरांतही अनेक कुटुंबांत स्त्रीची होणारी घुसमट, नोकरी आणि घर सांभाळण्याच्या कसरतीत तिची होणारी ओढाताण, त्यातून बेदम मारहाण करत असलेला नवरा मिळाला तर तिच्या दुर्दैवाचे दशावतार कधीच संपणारे नसतात.

‘कन्या झाली हो…’ या कादंबरीत अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील बुद्धीमान, पदवीधर, महापालिका प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या सुनीता परब या तरुण विवाहित स्त्रीच्या संसाराची चित्तरकथा पाहायला मिळते. 1975 ते 85 हे स्त्राr-मुक्तीचे दशक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले होते. त्याचे पडसाद जगभर उमटले. त्यानंतरच्या काळातील ही कहाणी.

सुनीता परब तिची शाळकरी छोटी मुलगी पिंकी आणि फिटर म्हणून कंपनीत कामाला असलेला पती संतोष अशा त्रिकोणी कुटुंबातील. सुनीताला वाचनाची आवड आहे. ती शाळेत सकाळच्या वर्गांना शिकवते. फावल्या वेळेत पीडित स्त्रियांच्या मदतीसाठी असलेल्या महिलांच्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करते. मात्र या ना त्या कारणावरून तिला छोटय़ा मुलीसमोर लाथाबुक्क्यांनी मारणारा, तुडवणारा, कमरेच्या पट्टय़ांनी झोडपणारा, अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहत तिच्यावर बदफैली असल्याचे घाणेरडे आरोप करणारा पती संतोषचे हिंस्त्र रूप तिला वारंवार अनुभवायला मिळते. तिच्या सैरभैर झालेल्या जीवनात शाळा आणि पीडित महिलांना मदत करणारी ‘नारी विमोचन संस्था’ हाच एकमेव दिलासा असतो. संस्थेत स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणारी आणि घरात नवऱयाचा मार खाणारी अशा द्विधा मन:स्थितीत ती जगत असते.

घरात तिला नवऱयाकडून होणारी बेदम मारहाण थांबते का, तिला तिच्या मनाप्रमाणे जगता येते का, तिच्या शाळकरी मुलीत आणि तिच्यात कधीकधी होणारा दुरावा संपतो का, तिच्या उत्कर्षामुळे होणारा नवऱयाचा, सहकाऱयांचा, शेजाऱयांचा जळफळाट थांबतो का, की तिच्या आयुष्याला काही वेगळय़ाच वाटा फुटतात, याचे उत्तर ही कादंबरी संपूर्ण वाचल्यावरच मिळते.

कादंबरीचे बीज छोटे असले तरी तिचा आवाका खूप मोठा आहे. पुढे तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था यांच्यातील भल्याबुऱया अनुभवांचा सामना करत ती कशी वाटचाल करते यात एक थ्रिल आहे. कादंबरीच्या प्रारंभापासून एकामागून एक घटना, प्रसंग निवेदनात्मक साध्या पद्धतीने सरळसोटपणे साकार होत जातात. त्यात ओढून ताणून आणलेली नाटय़मयता किंवा कृत्रिमतेचे अवडंबर नाही. आपल्या डोळय़ासमोर प्रसंग घडत आहेत, असे वाटत राहते. त्यातील स्वाभाविकता हाच या कादंबरीच्या शैलीचा मोठा गुण आहे.

घर सांभाळून नोकरी करणाऱया स्त्रीच्या समस्या, आजच्या काळातील पाळणाघरांची निकड हा या कादंबरीतील दुसरा महत्त्वाचा भाग आहे. कादंबरीतील सुनीता स्वत:ला सावरून पुन्हा संसाराच्या गाडय़ाला जुंपून घेते, की तिच्या आयुष्याला तिची आता कॉलेजात जाणारी मुलगी आणि पती संतोषमुळे काही वेगळी कलाटणी मिळते, हा या कादंबरीचा उत्सुकता ताणणारा भाग आहे. लेखकाने स्त्री-मुक्ती लढय़ाचा सर्वांगीण विचार केल्याचे जाणवते. स्त्राr-मुक्ती चळवळीशी नाते जोडताना लेखकाच्या कल्पनाशक्तीचा काही भाग अपरिहार्य असला तरी त्यातील स्त्रीच्या मूळ वेदनेचे वास्तव अस्सल आणि प्रत्ययकारी आहे. नायिकेच्या उत्कर्षाची आणि तिच्या वैयक्तिक दु:खाच्या समांतर वाटचालीची ही कहाणी वाचकांना नक्कीच आकृष्ट करील. सतीश खानविलकर यांचे मुखपृष्ठ आकर्षक आहे.

कन्या झाली हो…  

लेखक : अविनाश कोल्हे

प्रकाशक : संधिकाल प्रकाशन, भाईंदर

पृष्ठे : 288, मूल्य : 325 रु.