
>> अजित कवटकर
श्रावणातील पूजा-अर्चनेनिमित्त वाजणारे टाळ-मृदंग, होणारा घंटानाद यांमुळे चराचरांत सुसंस्कार रुजतात. बहरलेल्या निसर्गातील नवपल्लवांतून दरवळणारा सुगंध, पशु-पक्ष्यांमधील ओसांडून वाहणारा उत्साह, आनंदाने भरून धावणारे जलस्रोत आणि त्यात स्वच्छंदपणे विहार करणारे जलचर, हिरवेगार डोंगर, हवेतील स्वच्छता, मृदेतील वाढलेली जीवनपोषकता आणि या सगळ्यांमुळे प्रसन्न होऊन जगण्याची उमेद व संसाधनं प्राप्त होणारे आपण. तेव्हा वर्षातून एकदा म्हणजे किमान या महिन्यापुरतं जरी सर्वांनी श्रावण संस्कार व संस्कृतीचे पालन केले तरी हे जग अधिक सात्त्विक, सहिष्णू होईल.
व्रतवैकल्यांचा महिना असा समज श्रावणाबद्दल विशेष अधोरेखित झाल्यामुळे, विचार-जीवनावर त्याचा पडणारा प्रत्ययकारी सकारात्मक प्रभाव अनवधानाने दुर्लक्षित होता कामा नये. श्रावणात श्रद्धाभावनेने संपन्न होणारी व्रतं, ठेवले जाणारे उपवास, जाणीवपूर्वक पाळले जाणारे आचरण, पार पाडले जाणारे धार्मिक विधी वगैरेंना आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक आधार आहे. मुळातच आपला धर्म, आपले अध्यात्म, आपली संस्कृती ही विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्यांनी घालून दिलेले संस्कार व आचरण पद्धती व रूढी-परंपरा यांमागे जीवन शुद्ध व शाश्वत ठेवण्याचे श्रेष्ठ उद्दिष्ट आहे. म्हणूनच, आपण अनुकरण करत असलेल्या धार्मिक आचरणांमागे असणारे उदात्त कारणच जर आपल्याला ज्ञात नसेल तर आपण मनोभावे पूर्ण करत असलेल्या या संकल्पनांचा लाभ मर्यादितच राहतो. आपले धर्म-संस्कार हे केवळ त्याच्या अनुयायांसाठीच वरदानरूपी न ठरता, त्यांच्या अवती भोवतीच्या जीवमात्रांसाठी, पर्यावरणासाठी देखील फलदायी ठरावेत, हा हेतू बाळगतात. त्याच दृष्टीने श्रावण मास याचे कल्याणकारी महात्म्य आपण समजून घेतले पाहिजे.
’शिव व शक्ती’ यांस समर्पित असलेला हा संपूर्ण मास, त्यांच्या आराधनेच्या वैविध्याने सजतो. श्रावणी सोमवार, मंगळा गौरी, वरलक्ष्मी व्रत, शनि उपासना तसेच कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, नाग पंचमीसारख्या सणांच्या आनंदोत्सवांमुळे हा संपूर्ण महिना सात्त्विकतेचा सुगंध दरवळतो. श्रावणातील आल्हाददायक हलक्या वर्षा सरींमुळे निसर्गाला लाभणारे सृष्टीसौंदर्य हे संपूर्ण वातावरण मंगलमय करून टाकतं. मग इथल्या भक्तीला शक्ती प्रसन्न होणे नैसर्गिकच होय.
शुद्ध, निर्मळ विचार व कृतींमधील शांतपणा टिकवणे हे उपवास व शुद्ध शाकाहारामुळे शक्य असते आणि म्हणूनच मांसाहार/ तामसिक भोजन वर्ज्य करणे हे श्रावणानिमित्ताने स्वाभाविक होते. पण याचे फायदे लक्षात घेणे आवश्यक आहे. पावसाळी वातावरणामुळे सूर्याच्या उष्णतेची प्रखरता ही तुलनेने फार कमी असते आणि दमटपणा वाढलेला असतो ज्यामुळे पचनशक्ती मंदावते. अशा वेळेस हलका आहार ठेवल्यास पावसाळ्यात सर्रास होणाऱ्या पोटाच्या अनेक विकारांपासून आपण सुरक्षित राहतो, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. श्रावणातील रूढी-परंपरांनी घालून दिलेल्या संस्कारांचे हे देखील उद्दिष्ट असावे.
वन्यजीव व विशेष करून जलचरांसाठी पावसाळा हा प्रजननासाठीचा सर्वात योग्य काळ. श्रावणात मांस, मासे न खाण्याची प्रथा ही बहुदा यांच्या प्रती असलेली आपली संवेदनशीलता दर्शवते. या महिन्यात अनेक जणं नित्यनेमाने गाईला चारा आणि माशांना खाद्य म्हणून पीठाचे गोळे घालतात. शरीराच्या योग्य पोषणासाठी आपण वर्षभर मासे खातो. आपले शरीर सुदृढ ठेवण्यात त्यांचे बलिदान फार मोठे असते. त्यातून त्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने होणारी अमर्याद व बेलगाम मासेमारी आज अक्षरशः त्यांच्या अस्तित्वाच्या मुळावर उठली आहे. इतकी की, माशांच्या अनेक प्रजाती आज नामशेष झाल्या आहेत आणि अनेक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या प्रजनन काळात तरी त्यांना त्यांच्या वाढीसाठीचे स्वातंत्र्य, अभय मिळावं या हेतूनेही बहुदा श्रावणात मांसाहार खाणे टाळले जात असावे. आपल्या देशातील बहुसंख्य जनांनी जरी ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे संयम बाळगला तर ते या जीवांसाठी, त्यांच्यावर जगणाऱ्या इतर प्राण्यांसाठी आणि त्यांच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या मनुष्यासाठी देखील हितकारक ठरेल. जैववैविध्य व पर्यावरण संतुलन शाबूत राहील.
जे आपल्याला जीवन देतात, जगण्यासाठीची ऊर्जा देतात त्या वनस्पतीसृष्टीच्या वाढीसाठी, संवर्धनासाठी अनेक संस्कृतींमध्ये श्रावणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो. श्रावणापासून प्रारंभ होणाऱ्या आपल्या अनेक सणांसाठी लागणाऱ्या फुला-फळांसाठीची ही तजवीज म्हणा किंवा ज्या झाडांमुळे इतका छान पाऊस पडून आपल्याला वर्षभरासाठी पाणी, अन्नधान्य लाभले त्या उपकारांप्रती आदर व्यक्त करण्याची एक रित म्हणून वृक्षारोपण केले जावे. आज पृथ्वीला जर कशाची नितांत आवश्यकता असेल तर ती अधिकाधिक वृक्षांची. कारण तेच प्रदूषण, तापमानवाढ, हवामान बदल, वाळवंटीकरणाच्या धोक्यांना थोपवून धरणार आहेत आणि श्रावण जर यासाठीचे निमित्त ठरणार असेल तर त्या संधीतून आपली धरणी अधिक सुजलाम् सुफलाम् करणे आपले कर्तव्य असणार आहे.
श्रावणातील पूजा-अर्चनेनिमित्त वाजणारे टाळ-मृदंग, होणारा घंटानाद यांमुळे चराचरांत सुसंस्कार रुजतात. बहरलेल्या निसर्गातील नवपल्लवांतून दरवळणारा सुगंध, पशु-पक्ष्यांमधील ओसांडून वाहणारा उत्साह, आनंदाने भरून धावणारे जलस्रोत आणि त्यात स्वच्छंदपणे विहार करणारे जलचर, हिरवेगार डोंगर, हवेतील स्वच्छता, मृदेतील वाढलेली जीवनपोषकता आणि या सगळ्यांमुळे प्रसन्न होऊन जगण्याची उमेद व संसाधनं प्राप्त होणारे आपण. हे असं सारं काही कायम राहावं व लाभावं यासाठी, त्याला अनुसरून आचरण करण्याची संधी देतो तो श्रावण मास. तेव्हा वर्षातून एकदा म्हणजे किमान या महिन्यापुरतं जरी सर्वांनी श्रावण संस्कार व संस्कृतीचे पालन केले तरी हे जग अधिक सात्त्विक, सहिष्णु, सत्कर्मी होईल.