
>> विवेक दिगंबर वैद्य
‘प्रखर योगाभ्यासी’ म्हणून सुपरिचित असलेल्या एका तेजस्वी नाथसंप्रदायी सत्पुरुषाची ओळख करून देणारा लेख.
नाशिक जिह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रूक या छोटय़ाशा खेडेगावात राहणाऱया ब्रह्मगिरी रत्नपारखी नामक सद्गृहस्थाच्या तीन मुलांपैकी असलेले रामचंद्र धार्मिक वृत्तीचे होते. लहानपणापासून अध्यात्माकडे ओढा असल्याने ते पुढे वेदशास्त्र पारंगत झाले आणि नाशिक जिह्यात वेदशास्त्रनिपुण पंडित म्हणून प्रसिद्धीस आले. रामचंद्र रत्नपारखी यांना मल्हारराव, नारायणराव व रावजी हे तीन मुलगे व दोन मुली असा परिवार होता. या पाच मुलांपैकी एक सुपुत्र मल्हारराव मामलेदार कचेरीत कारकून पदावर कार्यरत होते.
मल्हाररावांचे लग्नाचे वय झाले, या कारणाने त्यांच्याकरिता वधुसंशोधनाची लगबग सुरू झाली. नगर जिह्यातील कोपरगावचे मूळ रहिवासी भाऊ बक्षीगिरी यांची मुलगी मथुरा हिच्यासोबत मल्हाररावांचा विवाह निश्चित झाला. विवाहानंतरचा काळ दोघांसही उत्तम होता. एकदा मथुराबाईंनी श्रावणी सोमवारचे व्रत केले आणि या निमित्ताने त्या भल्या पहाटे श्रीमहाकालेश्वराच्या दर्शनास गेल्या. दर्शन आटोपून घरी परतल्यावर त्या नित्यनेमानुसार देवघरात गेल्या. मथुराबाई देवपूजेत नेहमी इतक्या रंगून जात असत की, त्यांना आजूबाजूस काय चालले आहे याचाही विसर पडत असे. त्या दिवशीदेखील मथुराबाई देवपूजेमध्ये मग्न असताना दरवाजात एक साधू आला आणि ‘भिक्षां देही’ असा पुकारा करू लागला. बराच वेळ झाला तरी घरातून कसलाही प्रतिसाद येईना. साधूने पुन्हा एकदा ‘भिक्षां देही’चा गजर केला तेव्हा घरातील आजोबा ओसरीवर आले आणि त्यांनी साधूचे स्वागत करून त्यास पडवीत आणून बसविले. इथे पडवीत बसलेल्या साधूस ‘देवपूजेत मग्न’ असलेल्या मथुराबाई दिसल्या तेव्हा त्यांच्या चेहऱयावरचे तेज पाहून साधू आश्चर्यचकित झाला.
देवपूजा आटोपून मथुराबाई बाहेर आल्या. त्यांनी साधुबुवांचे दर्शन घेतले. साधूने त्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या झोळीतून त्याने शिवपार्वतीची तांब्याची मूर्ती काढली आणि मथुराबाईंना ती मूर्ती प्रसादरूपाने देत म्हणाला, “तुला पाच मुलगे व एक कन्या होईल, दुसरे मूल अदृश्य होईल व तिसरे मूल लोकोद्धारक संत म्हणून प्रसिद्ध होईल. या मूर्तीची पूजा तू मनोभावे कर आणि सोबत दर सोमवारी व्रतही करीत राहा’’ असे सांगून तो साधू निघून गेला. साधूच्या सांगण्यानुसार मथुराबाई मूर्तिपूजा व व्रत करू लागल्या.
कोपरगावी असताना मथुराबाईना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना दुसऱयांदा दिवस गेले, मात्र काही दिवसांतच त्यांचा गर्भ अदृश्य झाला (नाश पावला) तेव्हा मथुराबाईंना साधूवचनाची प्रचीती आली आणि साधूवचनाप्रमाणे तिसरे मूल ‘संत’वृत्तीचे असणार या जाणिवेने त्या रोमांचित झाल्या. मथुराबाईंना पुन्हा दिवस गेले. नेमके याच दरम्यान मल्हाररावांनी तीर्थयात्रेस जाण्याचे ठरविले.
मल्हारराव व मथुराबाई उभयता यात्रेकरिता निघाले. काशी, प्रयाग, गया आदी महातीर्थे पूर्ण करून ते चित्रकूट करवी येथे आले. यादरम्यान मथुराबाईंना त्रास होऊ लागल्याने त्यांनी चित्रकूट करवी येथे राहणाऱया मल्हाररावांच्या चुलतबंधूंकडे, बाळकृष्णपंत यांच्याकडे मुक्काम करण्याचे ठरविले.
दिनांक २३-०२-१९८५ गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. वर्षारंभाचे औचित्य असल्याने चित्रकूट करवी येथील श्रीविठ्ठलनाथ महाराजांच्या मठामध्येही उत्सवाचे आणि आनंदोत्साहाचे वातावरण पसरले होते. श्रीविठ्ठलनाथ महाराज येणाऱया-जाणाऱया प्रत्येकाला ‘आज तो आनंद आनेवाला है’ असे सांगत होते. श्रीविठ्ठलनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक महान सत्पुरुष होते. कमरेस लंगोटी, हातात जाडगेलासा सोटा, पाठीवर लोंबणारी एक लोटी असा त्यांचा वेष असे. त्यांचे वागणे, बोलणे व राहणे अयाचित वृत्तीचे असल्याने सर्वजण त्यांना अयाचितबुवा म्हणूनही ओळखत असत.
नववर्षाचा दिवस असल्याने सोसवत नसतानाही मथुराबाई मंदिरामध्ये आल्या. पूजाअर्चा झाल्यानंतर त्या जड पायानेच मंदिराला प्रदक्षिणा घालू लागल्या. दहावी प्रदक्षिणा पूर्ण करून त्या अकरावी प्रदक्षिणा घालत असतानाच एकाएकी त्यांना प्रसूतीवेदनेची कळ आली. मथुराबाईंनी कशीबशी अकरावी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि त्या कोसळल्या. आजूबाजूच्या मंडळींनी त्यांना सावरले. हा गोंधळ कानी येताच स्वतः विठ्ठलनाथ तेथे आले आणि त्यांनी मथुराबाईंना मठात नेले. मठात उपस्थित असलेल्या काही स्त्रियांनी पुढे सरसावत मथुराबाईंचे बाळंतपण केले. मथुराबाई प्रसूत झाल्या व नवजात बालकाने ‘टाहो’ फोडल्याचे ऐकून श्रीविठ्ठलनाथ महाराज आनंदले.
‘हे’ बालक येथेच जन्मास येणार असल्याचे विठ्ठलनाथांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी सर्व तयारीही करून ठेवली होती. बालक जन्मतः सिद्धपुरुषाची सर्व लक्षणे घेऊन आले होते. श्रीविठ्ठलनाथांनी बालकाचे नाव ‘माधव’ ठेवले आणि हा अवतारी सत्पुरुष आहे याची ग्वाही दिली. वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ‘माधवा’मध्ये अवतारी सत्पुरुषाची सर्व लक्षणे ठळकपणे दिसू लागली.
इथे माधव लौकिक आयुष्यातही त्याच्या बुद्धीची चमक दाखविता होता. शाळेमध्ये त्याचे चित्त रमत नसले तरीही गणितातील कठीण प्रमेये सहजगत्या सोडविणे, आपल्यापेक्षा वरच्या वर्गात जाऊन तेथील शिक्षकांच्या अनुपस्थितीत मुलांचा अभ्यास घेणे आदी प्रकारांमुळे त्याच्या बुद्धीची चमक सर्वांच्याच नजरेस येऊ लागली. आजोबांनी माधवाला शिक्षणासोबत संध्या, रुद्र, पूजा इत्यादी ब्रह्मकर्मदेखील शिकविण्यास प्रारंभ केला, यातून घडले असे की माधवातील भक्तिरस प्रबळ होत उचंबळून येता झाला. परमार्थ आचरणाशिवाय त्याला अन्य काही सुचेनासे झाले. दिवसरात्र तो साधना, आराधना यातच गुंतून राहिला. दरम्यान, माधवाच्या डोक्यावरील आजोबांचे व पाठोपाठ पित्याचेही छत्र हरपले. माधवाला बालवयातच लागलेली परमेश्वरभक्तीची ओढ मथुराबाईंची चिंता वाढवती झाली.
अशातच एके दिवशी नाशिकचे सुप्रसिद्ध संत श्रीयशवंतराव महाराज ऊर्फ श्रीदेव मामलेदार यांचे नाशिक येथे आगमन झाले असता माधवने त्यांच्या दर्शनासाठी जाण्याचा हट्ट धरला. मथुराबाई माधवासह दर्शनार्थ गेल्या असता स्वतः श्रीदेव मामलेदार उठून वाडय़ाबाहेर आले आणि त्यांनी लहानग्या माधवाला आपल्या छातीशी घट्ट धरले. श्रीदेव मामलेदारांकडील तीन-चार दिवसांच्या मुक्कामात माधवाचे फारच कोडकौतुक झाले. एके दिवशी श्रीदेव मामलेदार मथुराबाईंना म्हणाले, ‘हा भाग्यशाली सुपुत्र लवकरच श्रीगुरूगादीचा वारस होणार आहे, मात्र त्यासाठी तुम्हांला तीन महिन्यांनी चित्रकूट करवी येथे जावे लागेल.’





























































