
>> विवेक दिगंबर वैद्य
अवधूत संप्रदायाची पुनर्मांडणी करणाऱ्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या पूर्वायुष्याचा परिचय करून देणारा लेख.
बेळगाव हा प्रांत कन्नड-मराठी भाषावादामुळे नित्यनेमाने चर्चेत असला तरीही अध्यात्म मार्गाचा विचार करता या बेळगावचे वेगळेपण लक्षात राहते ते ‘श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर’ या प्रख्यात सत्पुरुषामुळे. ‘प्रेमास्तव हा जन्म घेतल्याचे’ सांगत ‘अवधूत’ संप्रदायाला नवी वैचारिक दिशा दाखविणाऱया आणि अवतार सामर्थ्याच्या बळावर श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करणाऱया श्रीपंत महाराजांच्या अलौकिक कार्यामुळे तसेच त्यांच्या चिरंतन स्मृतीमुळे बेळगावनजीकचे ‘बाळेकुंद्री’ नावाचे आडवळणी खेडेगाव आज जगभरात प्रसिद्ध आहे.
श्रीदत्तात्रेयांची राजधानी ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’पासून जवळ निजामाच्या अखत्यारीतील ‘देऊळगाव’ येथे ‘वतनदार देशपांडे’ म्हणून कार्यरत असलेले गुराप्पा नावाचे ऋग्वेदी, भारद्वाज गोत्री देशस्थ ब्राह्मण, सत्शील आचरणाचे अध्यात्ममार्गी सद्गृहस्थ होते. आराध्य दैवत श्रीदत्तात्रेय आणि कुलदेवता अंबाबाईचरणी अनन्यभक्तीने सेवा करणाऱया गुराप्पांचे घराणे श्रीनृसिंहसरस्वतींच्या भक्तीत आणि श्रीगुरुचरित्राच्या नित्यपठण सेवेत मग्न असे. नरसिंह, मोरेश्वर आणि विरुपाक्ष या तीन मुलांसह ‘गुराप्पा’ पतीपत्नीचा संसार सुखाने चालला होता.
गुराप्पांचे ज्येष्ठ चिरंजीव नरसिंहपंतांना ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथांविषयी विलक्षण आत्मीयता होती. ते अपार श्रद्धाभावाने श्रीगुरुचरित्र सप्ताह करीत असत. एकदा त्यांनी केवळ एका पायावर उभे राहून ‘श्रीगुरुचरित्र’ सप्ताह केला होता. त्यांची ही आत्यंतिक भक्ती व श्रद्धाभाव पाहून श्रीदत्तात्रेय त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना स्वप्नदृष्टांताद्वारे ‘तुझ्या सातव्या पिढीत मी अवतार घेईन’ असे आश्वासन दिले.
काही दिवसांनी निजाम सरकारच्या अखत्यारीतील मुलुखांपैकी असलेल्या ‘बेळगाव’नजीकच्या 17 गावांच्या कुलकर्णीपदाचे काम गुराप्पांकडे आले. या कारणाने गुराप्पांची नरसिंह, मोरेश्वर आणि विरुपाक्ष ही तिन्ही मुले बेळगावातील ‘बाळेकुंद्री बुद्रुक’ येथे आली आणि 17 गावांच्या कुलकर्णीपदाचे काम पाहू लागली. बेळगाव-कलादगी मार्गावरील ‘बाळेकुंद्री बुद्रुक’ हे खेडेगाव बेळगावच्या उत्तरेस सुळेभावी स्टेशनपासून दोन मैलांवर आहे. या गावाचे ‘बाळेकुंद्री’ हे नाव येथील बाळादेवीच्या नावावरून पडल्याचे सांगण्यात येते तर काहींच्या मते येथे केळीची झाडे विपुल प्रमाणात असल्यामुळे (केळीला कन्नड भाषेत ‘बाळी’ म्हणतात) ‘बाळेकुंद्री’ हे नाव लाभल्याचे सांगण्यात येते.
बाळेकुंद्रीस आल्यावर कुलकर्णी बंधू श्रीरामेश्वराच्या देवळापाशी घर बांधून राहते झाले अन् पुढे या सर्वांचे वास्तव्य याच घरात झाले. नरसिंहपंतांना लक्ष्मप्पा, मल्हार आणि तिमन्ना असे तीन पुत्र होते. लक्ष्मप्पांना नरसाप्पा नावाचा एकच मुलगा होता. नरसाप्पांना अरळप्पा व गुराप्पा हे दोन मुलगे होते. अरळप्पा यांचा एकुलता एक सुपुत्र रामप्पा ऊर्फ रामजीपंत श्रीमंत पेशव्यांच्या लष्करामध्ये मोठय़ा पदावर होता. एका घनघोर युद्धामध्ये सेनापतीचे प्राण वाचविताना रामजीपंतांना वीरमरण आले त्या वेळी त्यांचा एकुलता एक पुत्र बाळकृष्ण केवळ सहा महिन्यांचा होता. बालपणी वडिलांचे छत्र हरपले असले तरी आई जानकीबाई मोठय़ा जिद्दीने बाळकृष्णाची जोपासना करती झाली.
शालेय शिक्षण तसेच अनुभवाच्या ‘लौकिक’ शिक्षणात पारंगत असलेल्या बाळकृष्णाने वडिलांच्या निधनामुळे झालेली पोकळी भरून काढली आणि कर्तबगारीच्या जोरावर तो संसाराचा गाडा हाकू लागला. अत्यंत करारी, कर्तृत्ववान आणि व्यवहारदक्ष अशा बाळकृष्णाने सांपत्तिक स्थितीदेखील सुदृढ केली. बाळकृष्णांना रामचंद्रपंत, देवजीपंत, जिवाजीपंत व चिंतोपंत असे चार मुलगे होते. नित्य व्यवहारात रामप्पा, देवप्पा, जीवप्पा आणि चिंतप्पा या नावाने परिचित अशा या चारही पुत्रांवर संसाराची धुरा सोपवून बाळकृष्णपंत नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेते झाले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र रामचंद्रपंत ‘रामप्पा’ कर्तबगार व सात्त्विक मनोवृत्तीचे होते. सतत ईश्वरचिंतनात मग्न राहणाऱया रामचंद्रपंतांना विवाहोपरांत दत्तात्रेय, गोविंद, गोपाळ, वामन, नरसिंह, शंकर हे सहा पुत्र तसेच अंबा, गंगा, यमुना, तुंगा, तुळसा व अहिल्या या सहा कन्या अशी बारा अपत्ये झाली. यातील ज्येष्ठ पुत्र दत्तात्रेय ऊर्फ दत्तोपंत हेच पुढे ‘श्रीपंत महाराज’ म्हणून प्रसिद्धीस आले.
‘श्रीपंत महाराज’ यांचा जन्म ‘दड्डी’ येथे मातुलगृही श्रावण वद्य 8, सोमवार शके 1777 (3 सप्टेंबर 1855) मध्ये झाला. बेळगाव जिह्याच्या हुक्केरी तालुक्यातील ‘दड्डी’चे अंबाजी रामचंद्र कुलकर्णी हे ऋग्वेदी, वसिष्ठ गोत्री देशस्थ ब्राह्मण निस्सिम दत्त उपासक होते. हे अध्यात्ममार्गी सद्गृहस्थ दड्डी व पंचक्रोशीतील अन्य काही गावांचे वतनदार कुलकर्णीही होते. त्यांच्या घराण्यात पिढय़ान्पिढय़ा दत्तभक्ती नांदत होती. अंबाजीपंत एका पायावर उभे राहून ‘श्रीगुरुचरित्रा’चा सप्ताह करीत असत. चारित्र्यसंपन्नतेमुळे त्यांचा उल्लेख सर्वत्र ‘राजर्षी’ या गौरवपूर्ण संबोधनाने होत असे. अंबाजीपंतांना अनंत, नरसिंह व रामचंद्र हे तीन पुत्र होते. यांच्यामधील नरसिंहपंतांना चार मुले होती. सुंदराक्का, गोदाक्का, बहिणाक्का या तीन मुली आणि श्रीपाद या मुलाच्या रूपाने नरसिंहपंतांना भाग्यवान संतती लाभली.
नरसिंहपंतांची कन्या गोदाक्का अर्थात सीताबाई हिचा विवाह बाळेकुंद्रीच्या रामचंद्रपंत कुलकर्णींसोबत झाला. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या सीताबाई आणि रामचंद्रपंतांच्या पहिल्यावहिल्या अपत्याचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवण्यात आले. मात्र बाळाची आजी, रुक्मिणीबाईंच्या आग्रहास्तव तसेच दोन्हीही घरातील पूर्वापार चालत आलेल्या दत्तोपासनेचे महत्त्व लक्षात घेत बालकाचे नाव ‘दत्तात्रय’ ठेवण्यात आले.
जन्मलग्न धनु राशी, लग्नस्वामी पराक्रमातील शुक्र, वृषभात उच्चीचा चंद्र आल्याने होणारा परमहंसयोग ही जातकासाठीची उत्तम लक्षणे लाभलेल्या ‘दत्तात्रया’विषयी जाणकारांनी शुभसंकेत वर्तविले. त्यातच पूर्वज नरसिंहपंत यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार सातव्या पिढीत जन्म घेतलेला बालक ‘श्रीदत्तात्रयांचे रूप’ असणार हे विधिलिखितही पूर्वीच निश्चित झाले होते. या कारणाने सीताबाई आणि रामचंद्रपंत यांच्या संसारवेलीवर उमललेले हे पहिले ‘फूल’ येणाऱया काळासाठी त्याच्या अवतारकार्याचा सुगंध दरवळत ठेवण्याकरिता सज्ज झाले.
दत्तात्रयाची पहिली आठ वर्षे बाळेकुंद्री येथे गेली. बालवयातच जिवावर बेतलेल्या दोन प्रसंगांतून दत्तात्रय केवळ ईश्वरी कृपेमुळे वाचला. वयाच्या आठव्या वर्षी त्याचे मौजीबंधन थाटामाटात यथासांग पार पडले. बाळेकुंद्री हे आडवळणी खेडेगाव असल्याने तिथे शिक्षणाची सोय नव्हती. या कारणाने दत्तूला त्याच्या मातुलगृही मामा श्रीपादपंत दड्डीकरांकडे पाठविण्यात आले. श्रीपादपंतांनी दत्तूकडून कन्नड व मराठी भाषेचा अभ्यास, पौराणिक ग्रंथांचे वाचन, सुंदर हस्ताक्षरासाठीचा लेखनपाठ करवून घेतला तसेच सर्व विषयांच्या शिक्षणासोबत लेखनाचा नियमित सराव आणि टिपणे काढण्याची सवयही लावली. दत्तात्रयाच्या उत्तरायुष्यातील अवतारकार्याची जणू ही पायाभरणी होती. (पूर्वार्ध)


























































