
>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामी समर्थ संप्रदायातील ‘झाकले माणिक’ अर्थात श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे यांच्या पूर्वायुष्याचा परिचय करून देणारा लेख.
उत्तम मार्क्स मिळवत मॅट्रिक्युलेशनपर्यंत शिक्षण घेणे, महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मुंबईच्या नामांकित विल्सन कॉलेजमध्ये दाखल होणे, सिव्हिल इंजिनीअरिंगचे ज्ञान संपादन करून पीडब्ल्यूडी खात्यात नोकरी करणे आणि पुढे ‘वंदनभक्ती’चा साक्षात्कार घडल्यावर सद्गुरूंच्या सान्निध्यात येताच प्रपंचासह जगाशी फारकत घेत अखंड आत्मानुसंधानात रंगण्यासाठी फकिरी वृत्तीला कवटाळणे म्हणजेच ‘रावसाहेब’ अर्थात श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे.
पूर्वसंचित दांडगे असल्याने उच्च आंग्लविद्याविभूषित असूनही नास्तिकतेचे अनाठायी स्तोम न वाजविता श्रीसद्गुरू बीडकर महाराजांच्या अनुग्रहामुळे पूर्णावस्था प्राप्त होऊन मुक्कामाला पोहोचल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावसाहेब, ज्यांनी मस्तकावर हात ठेवून थेट उपदेश दिला त्या श्री बीडकर महाराजांचे ‘एकमेव’ शिष्य म्हणजे रावसाहेब, ‘सदा स्वरूपानुसंधान हेचि साधूचे लक्षण’ ही श्रीसमर्थ रामदासांच्या दासबोधातील ओवी ज्यांच्या जीवनकार्यात वारंवार अनुभवता आली ते साधूपुरुष म्हणजे रावसाहेब, संप्रदायामध्ये ज्यांचे वर्णन ‘रावसाहेब माझा मोतीदाणा’ असे केले जाते ते अलौकिक सिद्धसत्पुरुष म्हणजे रावसाहेब, अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थांच्या प्रभावळीमध्ये श्री बीडकर महाराजांच्या बरोबरीने देखणे ‘संतरत्न’ म्हणून गौरवप्राप्त असे दिव्य देहधारी ‘राज’पुरुष म्हणजे रावसाहेब.
‘आत्मतेजाचे ध्यान करणे आणि देहप्रारब्ध भोगणे’ ही सर्वसामान्यांच्या विश्वात अत्यंत कठीणप्रद मानली जाणारी सद्गुरुंची शिकवण शिरसावंद्य मानून रावसाहेबांनी तंतोतंत पूर्णत्वाने आचरणात आणली अन् श्रीदत्त परंपरेतील देहधारी अवधूत श्रीस्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे शिष्य श्रीरामानंद बीडकर महाराज यांचे कार्य ‘समर्थ’पणे पुढे चालविले. पुढे प्रपंच-परमार्थ-संन्यास या त्रिसूत्रीला योग्य तो आकार देत रावसाहेबांनी अखेरीस 1954 साली ‘श्रीवासुदेवानंत सरस्वती’ हे नाव धारण करून लौकिक जगाचा त्याग केला.
रावसाहेब सहस्रबुद्धे मूळचे रत्नागिरी जिह्यातील कोतवडे या गावचे. शांडिल्यगोत्री चित्पावन ब्राह्मण असलेले सहस्रबुद्धे घराणे पूर्वी तीन पिढय़ांमध्ये ‘गणपुले’ म्हणून परिचित होते. पूर्वी चिपळूण येथे वास्तव्यास असलेल्या गणपुले घराण्याचे मूळ पुरुष महादेव बिन केसो विश्वनाथ अन् श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर अंदाजे चार शतकांपूर्वी कोतवडय़ाच्या धामेळवाडा येथे आले तेव्हा हा प्रांत विजापूर बादशहाच्या ताब्यात होता. बादशहाचे कारभारी विध्वंसक वृत्तीचे असल्याने त्यांच्या उपद्रवामुळे प्रजा कंटाळली होती. कोतवडय़ास बस्तान बसविण्याच्या दृष्टीने आलेल्या महादेव गणपुले यांनी युक्त्या प्रयुक्त्या करून कारभाऱयांची पुंडाई नाहीशी केली व गावातील वसुली व्यवस्था चोख ठेवून आर्थिक स्थैर्यही आणले. महादेवरावांच्या कार्याची प्रशंसा झाली, शिवाय बुद्धीच्या बळावर स्थैर्य व सत्ता प्राप्त करणार्या गणपुले मंडळींचा उल्लेख ‘सहस्रबुद्धे’ या गौरवपर संबोधनाने होऊ लागला. पुढे कालौघात हेच नामाभिधान त्यांचे आडनाव म्हणून रूढ झाले.
सहस्रबुद्धे यांचे कर्तृत्ववान वंशज आणि रावसाहेबांचे खापरपणजोबा कै. बाळाजी विष्णू हे संस्थानिक परशुरामभाऊ पटवर्धन यांचे खासगी कारभारी होते. श्रीमंत पटवर्धन यांच्या निधनानंतर बाळाजी विष्णू यांनी कोतवडे सोडले व ते इचलकरंजी संस्थानात राहण्यास आले. त्यांची पुढील पिढीही तिथेच स्थायिक झाली. पुढे रावसाहेबांचे वडील कै. नारायण तथा आप्पाजी हे मात्र कुरुंदवाड येथे स्थायिक झाले. इंजिनीअरिंग खात्यात सबओव्हरसियर असलेल्या आप्पाजींची हुबळी येथे बदली झाली तेव्हा 14 नोव्हेंबर 1883 रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी रावसाहेबांचा जन्म झाला. रावसाहेबांच्या मातोश्री बोरगावच्या मोडक घराण्यातील होत्या. त्यांचे माहेरचे नाव यमुनाबाई आणि सासरचे नाव लक्ष्मीबाई होते. त्या दिसावयास गोर्यापान आणि स्वभावाने प्रेमळ व शांत होत्या.
रावसाहेब वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हुबळी येथेच होते. त्यामुळे पहिली पाच वर्षे त्यांचे शिक्षण कानडीमध्ये झाले. पुढे मराठी व इंग्रजी शिक्षण पुणे-कोल्हापूर आणि कुरुंदवाड येथे झाले. 1898 साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 1899 साली ते मुंबई येथील विल्सन कॉलेजमध्ये दाखल झाले. रावसाहेबांचे मोठे बंधू कृष्णाजीपंत मुंबई सेकेटरिएटमध्ये सुपरवायझर होते तर धाकटे बंधू हरिभाऊ हे जुन्नर येथे वकील होते. रावसाहेबांना तीन मोठ्या बहिणी असून त्यांपैकी एक अकस्मात निवर्तली. दुसरी ‘बहिणाबाई’ ही वासुदेव बापूजी कानिटकर, पुणे यांच्या मुलास दिली. तिसरी वेणूबाई हिचा विवाह जुन्नरच्या नारायण धोंडदेव जोशी ऊर्फ फौजदार यांच्याशी झाला.
मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रावसाहेब यांचा स्नेह श्रीसद्गुरू रामानंद बीडकर महाराज यांचे शिष्य वामन रामचंद्र भागवत यांच्या सोबत झाला आणि त्यांच्यामुळेच रावसाहेबांच्या आयुष्यात ‘श्री बीडकर महाराज’ सद्गुरूरूपाने दाखल झाले. रावसाहेबांना शिष्यत्व देणारे श्री बीडकर महाराज हे वस्तुतः श्रीस्वामी समर्थांचे परमशिष्य आणि श्रीस्वामी समर्थ संप्रदायातील महत्त्वाचे सत्पुरुष होते.
शिक्षण घेत असताना रावसाहेबांवर अनेक कौटुंबिक आघात झाले. त्यांच्या शिक्षणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती ते त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव अचानक हृदयविकाराने मरण पावले. पुढील शिक्षणासाठी रावसाहेब पुण्यात आले अन् आईवडिलांसोबत सदाशिव पेठेत चिमण्या गणपतीजवळ भडभडे यांच्या वाडय़ात राहू लागले. दुर्दैवाने दोन वर्षांनी सन 1902 मध्ये त्यांचे वडीलही निवर्तले. पुढे रावसाहेब एलसीईच्या शेवटच्या परीक्षेसाठी मुंबईस गेले असताना सन 1904 मध्ये त्यांच्या मातोश्रीदेखील परलोकवासी झाल्या.
रावसाहेब एलसीई परीक्षा उत्तीर्ण झाले खरे. मात्र यादरम्यान घडलेल्या दुःखद घटनांमुळे, आप्तेष्टांच्या निधनामुळे ते विरक्त झाले. यातूनच त्यांचा ओढा सद्गुरू श्री बीडकर महाराजांकडे ओढला गेला. सन 1908 मध्ये ते अहमदाबादेस इंजिनीअरिंग खात्यात नोकरीस लागले, परंतु ही नोकरी अल्पजीवी ठरल्यामुळे रावसाहेबांनी पुण्याच्या पीडब्ल्यूडी खात्यातील सरकारी नोकरीवर भर दिला. दरम्यान (सन 1909), एकदा सद्गुरूंच्या दर्शनास आले असता श्री बीडकर महाराज त्यांना म्हणाले, ‘‘मी तुला ‘पर्मनंट’ केला.’’ सद्गुरुकृपेने रावसाहेब नोकरीत खरोखरीच ‘कायम’ झाले. पुण्यातच नोकरी असल्याने सदगुरूंचा सहवासदेखील सातत्याने वाढता झाला.
अखेर श्री बीडकर महाराजांनी रावसाहेबांना पारखून घेत 1911 साली त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांस अनुग्रह दिला. श्री बीडकर महाराज नुसत्या दृष्टिक्षेपानेच अनुग्रह करीत असत. मात्र, डोक्यावर हात ठेवून अनुग्रह केल्याचे हे एकमेव उदाहरण आहे.


























































