
>> दिलीप जोशी
साध्या साध्या विषयातसुद्धा केवढा तरी आशय भरलेला असतो. आता हे शीर्षक वाचल्यावर अनेकांच्या भुवया कदाचित उंचावल्या असतील. भुवई आणि अंगठा यावर कसला लेख? पण या प्रकारच्या संकेत ‘बोली’ला आपल्या म्हणजे माणसाच्या जैविक उक्रांतीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ‘उच्चभ्रू’ हा शब्द आपण श्रीमंत किंवा जरा आढ्यताखोर वगैरे लोकांसाठी वापरतो. इंग्लिशमधल्या ‘हाय ब्रो’वरून तो आला. अर्थात उच्चभ्रू असणारे सारेच गर्विष्ठ असावेत असं काही गणित नाही, पण हे समाजमनाचे ढोबळ ठोकताळे असतात. त्यातून असे शब्द, वाप्रचार तयार होतात. ते जाऊ द्या, कल्पना करा की, भुवयाच नसत्या तर आपण कसे दिसलो असतो? चेहर्याच्या जडणघडणीतल्या डोळ्यांच्या संरक्षणाचा एक भाग असलेल्या भुवया सौंदर्याचंही लक्षण ठरतात. क्वचित भुवया नसलेल्या व्यक्तीही आढळतात, पण तो अपवाद! आमच्या वर्गात तसा एक मुलगा होता. बाकीचे त्याला चिडवायचे. तो रडकुंडीला यायचा. शेवटी आमच्या बाईंनी आम्हाला समजावून सांगितलं की, आधीच त्याला या वैगुण्याचा त्रास होत असेल आणि तुम्ही त्याच्या मनात आणखी न्यूनगंड निर्माण करताय. हे चांगल्या विचाराचं, संवेदनशील मनाचं लक्षण नव्हे. तुमची एकेकाची भुवई दोन दिवस काढली तर कसं वाटेल याचा विचार करा. आम्ही त्याला पुन्हा कधीच चिडवलं नाही. त्यावेळीही खट्याळपणाची रीत तशीच होती, पण अधिकारवाणीने समजावणारी माणसंही होती.
तर मुद्दा भुवईचा. आपल्याकडच्याच नव्हे तर जगभरच्या नृत्य प्रकारात चेहर्यावरचे भाव व्यक्त करताना भुवयांचा वापर केला जातो. कारण एरवीही भुवया भाव व्यक्त करतातच. आश्चर्य वाटलं की भुवया उंचावणं, संशय आला की कपाळाला मध्ये सूक्ष्म आठी पाडून त्या किंचित जवळ आणणं, निरागस किंवा ब्लँक असताना भुवयांची हालचालच न होणं या सार्या गोष्टी आपल्या नकळत घडत असतात. काही जणांना तर एकेक भुवई उंच उडवण्याची कला अवगत असते. भुवई उंचावून ‘काय म्हणणे आहे?’ किंवा ‘कसं काय?’ हे प्रश्न शब्दाविना विचारता येतात. थोडक्यात, भावभावना व्यक्त करण्याची ताकद नजरेइतकीच भुवयांमध्येही असते.
राग, आश्चर्य, प्रेम व्यक्त करणार्या भृकुटी किंवा ‘भुवई’ला काव्यामध्ये अनेक ठिकाणी स्थान मिळालेलं दिसेल. ‘उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही’ या ओळीत भुवया उंचावल्याचं आश्चर्य दडलेलं आहे. संस्कृत काव्यातही अशी अनेक उदाहरणं आढळतील. सौंदर्यलक्षणांत समावेश झालेल्या भुवया ‘कोरणे’ किंवा ‘रंगवणे’ या गोष्टी आल्याच. उक्रांतीचा वैज्ञानिक विचार करणारे अशा काव्यमय गोष्टींत गुंतत नाहीत. त्यांच्या असं लक्षात आलं की, आदिम माणसं जेव्हा परस्परांशी संवाद साधायला लागली त्यावेळी आतासारखी भाषा नव्हतीच. वैचारिक, भावनिक संपर्क-संवादाची पहिली पायरी होती खाणाखुणांची. अजूनही भाषेविना आपण कधीतरी तसं बोलतोच. ‘‘केव्हा आलात?’’ असं विचारताना हाताची बोटं मागेपुढे करून हात हलवणं किंवा आश्चर्य वटल्यावर डोळे मोठे होणं अथवा ‘खांदे उडवून’, ‘नाक मुरडून’, ‘दातओठ चावून’ नाहीतर ‘जीभ बाहेर काढून’ माणसं व्यक्त होतातच. काही जण तर फोनवर बोलत असतानाही हातवारे करतात. ही आपली माणूस म्हणून आदिम सवय. माणसाकडे असं व्यक्त होण्याची जी कला आहे तीच पुढे मूकबधिरांसाठीच्या सांकेतिक भाषेसाठी उपयुक्त ठरली. अर्थात त्यासाठी अभ्यासपूर्ण संशोधन आहेच. माणसांप्रमाणे प्राणीही संकेत भाषेत व्यक्त होतात. त्यांची स्वरभाषा असते तशीच अंगविक्षेपाचीही असते. मधमाश्या मध गोळा करायला जातात तेव्हा त्यांचं पोळं आणि मध असलेली फुलं यात बरंच अंतर असू शकतं. ते अंतर पार करून आल्यावर इतर माश्यांना त्या जागेचा पत्ता देणारा इंग्रजी ‘आठ’च्या आकाराचा ‘नाच’ करतात. या संकेतातून इतर माश्यांना कोणत्या दिशेला जायचं ते समजतं.
भावभावना व्यक्त करताना आपण नकळत अनेक संकेत देत असतो. समोरच्याच्या बोलण्याचा कंटाळा आला किंवा बोअर झालो तर कपाळावर सूक्ष्म आठी उमटते. आनंदाने डोळे विस्फारले जातात. अपमान झाला तर चेहरा पडतो. शब्दाविना आविष्काराची ही आपली आदिम सवय आहे. काळ बदलला, नित्यनवी गॅझेटस् हाती आली तरीसुद्धा देहबोलीतून व्यक्त होण्याची प्राचीन कला तशीच आहे. काही जणांची देहबोली फारच बोलकी असते. क्षणाक्षणाला त्यांचा चेहरा बदलतो. त्या लकबींची गंमतही वाटते.
सांकेतिक भाषेचा ध्वनीच्या रूपात जगभर वापर सुरू झाला तो ‘कड कट्ट’ करीत संदेशवहन अवतरल्यावर. आता व्हिडीओ फोन हाती आल्यावर आणि जगभरच्या कोणत्याही व्यक्तीशी क्षणात संपर्क साधण्याची क्रांती झाल्यावर ‘तार’ (टेलिग्राम) ही सोय संपुष्टात आली. ‘तारे’ची भाषा जाणणारे आमचे एक नातेवाईक सांगत की, घरी मित्र आला आणि अमुक ठिकाणी जायची वेळ झाली की, ते खुर्चीवर ‘कड कट्ट’ पद्धतीने आवाज करून एकमेकांना संदेश देत आणि निघत. त्यांची ही भाषा तिथे असलेल्या इतरांना समजत नसे. आता ध्वनी संकेतांची जागा माणसांच्या जगात ‘इमोजी’ घेतायत. चित्रमय पद्धतीने आपल्या भावना परस्परांकडे पोहोचवतायत. मूळ विषय होता मुंबईचा. आपल्याही काही लकबी असतात. त्या आपल्यापेक्षा इतरांना अधिक कळतात. कारण इतरांना कळावं अशीच प्रतिक्रिया चेहरा देत असतो. मात्र त्यावर कधी विचार करण्याची वेळ येत नाही, परंतु हा जैविक क्रांतीमधला महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यावरही संशोधन होत असतं. ‘आहा’ आणि ‘ओह’चेसुद्धा 40 अर्थ होतात म्हणे!
































































