
>> अरुण जोशी
ज्या काळात सभोवती अनेक दिग्गज अढळ स्थान प्राप्त करून तेजाने चमकत असतात अशा कोणत्याही क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणं कठीण असतं. मात्र स्वतःचं असं काही वैशिष्टय़ असेल तर कठीण वाटली तरी ही गोष्ट अशक्य नसते. अविरत ज्ञानसाधना आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यातून स्वतःचंही अढळपद निर्माण करता येतं. हिंदी किंवा मराठी गानक्षेत्रातल्या अनेक सुरेल आवाजांबद्दल सांगता येईल. लता-आशा, रफी-किशोर-मुकेश असे विलक्षण स्वर सर्वत्र भरून राहिलेले असतानाही मराठीत अनेक गायिका आणि गायक आपल्या गानवैशिष्टय़ाने गानविश्व समृद्ध करत रसिकमान्य झाले.
गेल्या महिन्यात (14 जुलै) दिवंगत झालेले गायक भूपिंदर सिंग यांनी असंच आपलं स्वतःचं स्वरविश्व निर्माण केलं होतं. 6 फेब्रुवारी 1940 ते 2022 असा त्यांचा जीवनप्रवास. त्यांची कितीतरी हिंदी गाणी सहज गुणगुणली जातात. उत्तम गायक असलेले भूपिंदर सिंग तितकेच निपुण गिटारवादक होते हे कदाचित अनेकांना ठाऊक नसेल. त्यांचं ‘दिल ढुंढता है फिर वही, फुरसत के रात दिन’ गाणं अनेकांना लगेच आठवेल. चित्रपट मौसम, संगीत मदनमोहन आणि गीत गुलजार यांचं. परंतु आशा भोसले यांनी मादक स्वरात गायलेल्या ‘हरे कृष्ण हरे राम’ या देव आनंदच्या सिनेमातलं ‘दम मारो दम’ गाणं आठवा. त्याचं संगीत आर.डी.बर्मन (पंचमदा) यांचं होतं. त्या गाण्यात जी प्रभावी गिटार वाजते ती भूपिंदर सिंग यांची!
बालपणापासूनच भूपिंदर यांना गाण्याची आणि गिटारवादनाची आवड होती. मुलाची सांगितिक ओढ जाणून ती जपण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांना वडिलांचाच आशीर्वाद लाभला होता. कारण भूपिंदर यांचे वडील नाथा सिंग स्वतः संगीतकार होते. त्यांच्याकडेच भूपिंदर यांचं सुरुवातीचं संगीत-शिक्षण झालं. नाथा सिंग अगदी कठोर शिक्षक असल्याने त्यांनी शिष्याला योग्य संगीत शिक्षण दिलं. परिणामी दिल्ली आकाशवाणीवर भूपिंदर कुशल गिटारवादक म्हणून नावारुपाला आले. पण एकदा एक चांगला योग आला. संगीतकार मदनमोहन यांनी भूपिंदर सिंग यांच्या गिटार वादनाबरोबरच झालेलं त्यांचं गाणं ऐकलं. या तरुणाचा आवाजही ‘प्ले-ब्लॅकला’ चांगला आहे. हे त्या रत्नपारखी संगीतकाराच्या लक्षात आलं आणि सतीश भाटिया यांच्या घरच्या मैफलीत गाणारा हा तरुण एकदम पडद्यावरच्या अभिनेत्यांना आवाज देऊ लागला.
मदनमोहन यांनी भूपिंदर यांना मुंबईला बोलावलं. कारण देशभरातील गुणीजनांची उत्कर्षभूमी आपली मुंबईच! देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या हळव्या भावनांचं एक गाणं हकीकत चित्रपटात आहे. चेतन आनंद यांच्या या चित्रपटाचं संगीत मदनमोहन यांचंच. त्या गाण्यात रफी, तलत आणि मन्ना डे या त्यावेळच्या प्रसिद्ध गायकांबरोबरीने चौथा स्वर आहे तो भूपिंदर सिंग यांचा. ते हृदयस्पर्शी गाणं आजही आठवलं तर डोळे पाणावतील. ‘होके मजबूर मुझे, उसने भुलाया होगा’ हे ते गाणं. त्यानंतरच्या काळात रफीसाहेबांबरोबर द्वंद्वगीत गाण्याची संधीही भूपिंदर यांना मिळाली. त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं. किशोरकुमारसोबतही ‘आखरी खतं’मध्ये त्यांचं डय़ुएट आहे.
भूपिंदर सिंग यांची ‘दो दिवाने शहर में’ (घरौदा) या गाण्यात अमोल पालेकर नायक आहे. ‘एक अकेला इस शहर में, ‘मीठे बोल बोले (लतासह) अशी त्यांची कितीतरी लोकप्रिय गाणी. लतादीदींसह त्यांनी ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है’ हे अमर गीत गायलं.
भूपिंदर सिंग यांनी मोजक्या मराठी गाण्यांना स्वर दिला. आपल्याकडे त्यांचा उल्लेख भूपेंद्र असा होतो. त्यांच्या मराठी गाण्यांची ही ओळख, ‘आलीस सांजवेळी घेऊन स्वप्न माझे, तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे’ हे गाणं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत अशोक पत्कींचं. ‘जीवनाच्या खिन्न वाटा दूर जाती, प्राणवाती थकून आता मंद होती’ हे आर्त शब्द नांदगावकरांचेच आणि संगीतही पत्की यांचं. ‘जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे, गंधवेडय़ा वेदनेला रेशमाचा बंध आहे’ ही गझल सूर्यकांत खांडेकर यांची आणि संगीत आहे कमलाकर भागवतांचं. ‘मी इथे तू तिथे ढाळितो आसवे, का तुझ्या लोचना, प्रीत ना आढवे’ हे विरहगीत नांदगावकरांचं आणि संगीत अशोक पत्की यांचं. ‘पैजेचा विडा’ या चित्रपटात हे द्वंद्वगीत असून भूपेंद्र यांच्या सहगायिका आहेत अनुराधा पौडवाल. ‘हसलीस एकदा भिजल्या शारद राती, बहरली फुलांनी निशिगंधाची नाती’ हे भावगीतही नांदगावकर-पत्की यांचं.
अशी काही निवडक गाणी वगळता भूपिंदर सिंग यांनी मराठीत खूप गाणी गायलेली नाहीत. तरी त्यांचा थोडा का होईना मराठीतला स्वर कानी येतो. भूपिंदर सिंग यांच्या पत्नी मिताली या सुद्धा गायिका. त्या दोघांचे एकत्र कार्यक्रम होत असत. त्यांच्या ‘स्पॅनिश – गिटार’ वादनाची त्या काळात ध्वनिमुद्रिकाही निघाली होती. इतर अनेक नावाजलेल्या गायकांप्रमाणे त्यांचं नाव कदाचित खूप गाजलं नसेल. पण ते गिटार या वाद्यातून सुरेल वाजलं आणि ‘मेरी आवाज ही पहेचान है’ हे गाण्यातून सांगून गेलं.