मंथन – छोटे उद्योग आणि किरकोळ व्यापारी; बूस्टर डोस

347

>> विनायक कुलकर्णी

कोविड -19 च्या संकटामुळे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राची आगामी वाटचाल ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि डिजिटल माध्यमाचा उपयोग करून घेत करावी लागणार आहे. डिजिटल माध्यमात रुपांतरीत झालेल्या तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या बदलांची दखल घेतच व्यवसाय वृद्धी करणे भाग पडणार आहे. केंद्र सरकारनेही या उद्योगांना ‘बूस्टर डोस’ दिला आहे. त्याचाही लाभ या क्षेत्राला होणार आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष फंड ऑफ फंड्स उभारून भागभांडवलाची गरज भागविण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जाणार आहे.

कोविड-19 या विषाणूच्या संसर्गाने सर्वात अधिक फटका सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना बसला आहे. आज देशभरात सुमारे सहा कोटी छोटे उद्योग कार्यरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात 29 टक्के वाढ आहे. एवढेच नव्हे तर या क्षेत्राचा हिंदुस्थानच्या निर्यातीत सुमारे 48 टक्के हिस्सा आहे. याच छोटय़ा उद्योगातूनच अकरा कोटी लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. कोविड-19 च्या संसर्गामुळे एकीकडे या उद्योगक्षेत्राला नुकसान तर झालेच, पण दुसरीकडे अकरा कोटी लोकांच्या रोजगारावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी संजीवनी आवश्यकच होती.

एक जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयात सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राची गेल्या चौदा वर्षांपासून असलेली व्याख्या बदलली गेली. नवीन व्याख्येनुसार या उद्योगांच्या एकूण उलाढालीतून निर्यातीची उलाढाल आता वगळली गेली आहे. तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रांचे असलेले वेगळे वर्गीकरण आता एकत्र करण्यात आले आहे. मध्यम क्षेत्रातील उद्योगांसाठी आता पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 250 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल ठरवल्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीस मदत होणार आहे. नवीन व्याख्येनुसार सूक्ष्म उद्योगांसाठी आता एक कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पाच कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल निश्चित करण्यात आली आहे. लघु उद्योगांसाठी दहा कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि पन्नास कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल निश्चित केली आहे. अनुषंगिक सुरक्षा मुक्त खेळत्या भांडवलासाठी केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी बँकांना अधिकृतपणे हमी देत उपलब्ध केले असल्याचे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योगक्षेत्राचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या प्रस्तावना मंत्रिमंडळात मंजुरी देतानाच पंतप्रधानांनी चॅम्पियन (Creation and Harmonious Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength) हे नवीन कार्यपीठ जाहीर केले. या व्यासपीठाच्या माध्यमातून आधार देतानाच तक्रारींचे निरसन करतानाच; स्वतः जोखीम स्वीकारत उद्योग उभारणी करणाऱयांना शोधून नव्या व्यवसायांच्या संधी प्राप्त करून देणार. पीपीई किट्स आणि मुखपट्टय़ासारख्या वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱया उपकरणे आणि साधनांची निर्मिती करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय कोविड-19च्या प्रभावामुळे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील आर्थिकदृष्टय़ा तणावाखाली असलेल्या सुमारे दोन लाख उद्योगांसाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असुरक्षित धनकोंकडून घेतलेले कर्ज असो व अर्थसहाय्य, त्याचे रुपांतर समभागात करून हे छोटे उद्योग पुन्हा उभारण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष फंड ऑफ फंड्स उभारून भागभांडवलाची गरज भागविण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जाणार आहे.

रस्त्यावरील फेरीवाले, भाजी-फळ विक्रेते, केस कापणारे, वडापाव सारखे खाद्य पदार्थ विक्रेते, इस्त्राr तसेच धोब्याचे काम करणारे, पानपट्टीवाले, चहा विक्रेते, अंडी-पाव विक्रेते, चप्पल विक्रेते, मातीची भांडी विक्रेते, स्टेशनरी तसेच पुस्तक विक्रेते इत्यादी पन्नास लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्जाऊ देण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड वेळेत पूर्ण केली तर व्याज दरात सात टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा प्रसार आणि प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी मोबाईल ऍप तयार केले जात असून त्याच्या माध्यमातून या गरजू व्यावसायिकांना संपर्क करणे सुलभ ठरणार आहे. गरीब फेरीवाल्यांसारख्या व्यावसायिकांना सतत मदत करून सरकारवर अवलंबित ठेवण्यापेक्षा त्यानां नेमके आर्थिक भागभांडवल देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केल्यास त्यांचा व्यवसाय-धंदा लवकर उभा राहील आणि शहरी असो वा ग्रामीण स्थानिक अर्थव्यवस्थेत त्यांचा वाटा मोलाचा असेल.

आज हिंदुस्थानात जवळ जवळ 41 टक्के व्यवसाय डिजिटल माध्यमात रुपांतरित झालेला दिसत आहे. कोविड-19 च्या संकटामुळे हे प्रमाण आता अधिक गतीने वाढणार आहे. परिणामी सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राची आगामी वाटचाल ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि डिजिटल माध्यमाचा उपयोग करून घेतच करावी लागणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात केलेले मनुष्यबळ यापुढे मोलाचे ठरणार आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना या महत्त्वाच्या बदलाची दखल घेतच व्यवसाय वृद्धी करणे भाग पडणार आहे.

आज हिंदुस्थानात जवळ जवळ 41 टक्के व्यवसाय डिजिटल माध्यमात रुपांतरित झालेला दिसत आहे. कोविड-19 च्या संकटामुळे हे प्रमाण आता अधिक गतीने वाढणार आहे. परिणामी सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राची आगामी वाटचाल ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि डिजिटल माध्यमाचा उपयोग करून घेतच करावी लागणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात केलेले मनुष्यबळ यापुढे मोलाचे ठरणार आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना या महत्त्वाच्या बदलाची दखल घेतच व्यवसाय वृद्धी करणे भाग पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या