स्मार्ट फेन्सिंग! सीमा सुरक्षेचा नवा अवतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवडय़ात देशातील पहिल्या ‘स्मार्ट फेन्सिंग’ प्रणालीचे उद्घाटन केले. पाच किलोमीटरच्या या पथदर्शी प्रकल्पाच्या सफलतेनंतर हिंदुस्थान-पाकदरम्यान असलेली सीमा या प्रणालीने सुरक्षित करण्यात येणार आहे. यामुळे सीमेवरून पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसखोरी करणे कठीण होईल. आगामी काळात हिंदुस्थानच्या सर्वच सीमा अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभेद्य करण्याची गरज आहे.

आपल्या देशाची बांगलादेश व पाकिस्तान सीमेचे रक्षण बीएसएफ करीत आहे. बांगलादेश सीमा पार करून आतापर्यंत पाच कोटी बांगलादेशींनी हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे. सीमेचे रक्षण करण्यास सीमा सुरक्षा दल कसे अकार्यक्षम ठरले आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

शेजारी राष्ट्रांशी संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळे हिंदुस्थानच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानांचा सीमा व्यवस्थापनाशी संबंध जोडला गेला आहे. पाकिस्तानशी असलेले शत्रुत्व व अन्य सीमाप्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता सीमा व्यवस्थापन अतिशय कार्यक्षम व प्रभावी असणे गरजेचे आहे. सशस्त्र दहशतवाद्यांची घुसखोरी व शस्त्रांची तस्करी, नार्को टेररिझम व शस्त्रांच्या तस्करांचे असलेले लागेबांधे, घुसखोर, फुटीरतावादी चळवळींना मदत पुरविणारे व पोसणारी बाह्यकेंद्री सत्तावर्तुळे, सीमेलगत मदरशांची वाढणारी संख्या यामुळे सीमा व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने आहेत. अमली पदार्थांचे तस्कर व भरपूर पैसा हाती असलेले दहशतवादी यांनी निम्नस्तरातील काही राजकीय नेते, पोलीस, स्थानिक लोकांशी सूत जुळविलेले आहे. त्यामुळे सीमा संरक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच सीमा रक्षणासाठीच्या उत्तम व्यवस्थापनाला आता व भविष्यात नेहमीच प्राधान्य मिळायला हवे.

पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या काळातही पाकिस्तानच्या हिंदुस्थानविषयक परंपरागत धोरणात बदल अपेक्षित नाही. इम्रान यांचे सरकार लष्कराची कठपुतळी आहे. पाकिस्तानमधून प्रशिक्षित दहशतवादी सातत्याने घुसखोरी करून सीमावर्ती भागात दहशत माजवत आहेत. पाकिस्तानात सरकार बदलल्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानला सीमेवर अधिक जागरूक राहणे आणि त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाक सीमेवर उभारण्यात येत असलेली अदृश्य भिंत दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आणि त्यांचा खातमा करण्यासाठी उपयुक्त ठरेल. खुल्या युद्धात हिंदुस्थानकडून चार वेळा पराभव पत्करावा लागलेला असूनही पाकिस्तानने कोणताही धडा घेतलेला नाही. शांततेची भाषा पाकिस्तानला समजत नाही.

त्यानुसार सीमा भागात विविध प्रकारची साधने लावण्यात येतील. यातील सोनार सिस्टिमच्या माध्यमातून दुसऱया बाजूने होणाऱया आवाजावरून शत्रू येतो आहे याची सूचना मिळेल. थर्मल इमेजिंगच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱया दुर्बिणींतून रात्रीच्या वेळी येणाऱया शत्रूवरती लक्ष ठेवता येईल. याखेरीज अनअटेंडेट ग्राऊंड सेन्सर म्हणजे जमिनीच्या आत काही साधने लपवलेली असल्याने लक्ष ठेवता येईल. याखेरीज अनअटेंडेट ग्राऊंड सेन्सर म्हणजे जमिनीच्या आत काही साधने लपवलेली असल्याने त्यावरून कोणी गेल्यास त्याची सूचना मिळेल. त्याशिवाय तारेच्या कुंपणावर कॅमेरे लावले जातील. त्यावरून समोरच्या भागाचे चित्रण सातत्याने होत राहील. विविध साधनांनी दिलेली सर्व माहिती एका नियंत्रण कक्षात येईल. तिथे ती एकत्रित करून कोणत्या भागात गडबड होते आहे हे कळेल.

ही एक अदृश्य भिंतच असून ही प्रणाली जमिनीवर, पाण्यात आणि हवेतही कार्यरत राहू शकते. सीआयबीएमएस अंतर्गत जमिनीवर ऑप्टिकल फायबर प्रणाली, पाण्यात सेन्सरयुक्त सोनार सिस्टिम आणि हवेत हाय रिझोल्युशन कॅमेरे आणि एअरोस्टॅट कॅमेऱयांच्या माध्यमातून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची सुविधा आहे. हायटेक प्रणालीने युक्त सीआयबीएमएस प्रणालीच्या माध्यमातून सीमेवरील हालचालींची खबर तातडीने कंट्रोल रूमला देता येते. कोणत्याही आणीबाणीच्या क्षणी जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी पोहोचेल.

अशा प्रकारची एक किलोमीटर हायटेक भिंत उभी करण्यासाठी किमान दीड कोटी रुपयांचा खर्च येतो. संपूर्ण बांगलादेश व पाकिस्तान सीमेवर हे अभेद्य कवच उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्राधान्याने सीमेवरील 130 धोक्याच्या ठिकाणांवर ही अभेद्य, अदृश्य भिंत उभारण्यात येणार आहे. दर सहा किलोमीटरवर नियंत्रण कक्ष असणार आहे. हिंदुस्थान-पाक दरम्यानची सीमा अभेद्य करण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. इन्फ्रा रेड लेसर बेस्ड इन्टजन डिटेक्टर, सोनार सिस्टिम आणि एअरोस्टेट तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही प्रणाली सीमेवर घुसखोरांना शोधून काढण्याचे काम करेल. हिंदुस्थान आणि बांगलादेशदरम्यान असणाऱया चार हजार 351 किलोमीटर लांबीच्या सीमेवरही भविष्यात ही प्रणाली तैनात करण्यात येणार आहे.

आव्हानेही भरपूर
ही संकल्पना खूप चांगली आणि उपयोगी असली तरीही तिच्या अंमलबजावणीमध्ये येणारी आव्हानेही भरपूर आहेत. या सर्वच साधनांना विजेची आवश्यकता आहे, मात्र विजेची उपलब्धता नाही. त्याशिवाय नेटवर्कसाठी लागणारे फायबर केबलचे जाळे तिथे पसरलेले नाही. त्यामुळे सीमाभागात विशेष नेटवार्ंकग जाळे निर्माण करावे लागेल. या भागामध्ये अनेक ठिकाणी जंगले आहेत. खूप ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. ढग खाली येतात. या हवामान बदलांमध्ये अनअटेंडेट सेन्सर, रात्रीच्या दुर्बिणी या पुरेशा सक्षमपणे काम करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे तर आवाज ओळखणारे सोनार सिस्टिमदेखील काम करत नाही. तसेच पलीकडील बाजूने चित्ता किंवा लांडगा येत असेल तर त्यामुळे दिशाभूल होऊ शकते. वाऱयाची दिशा बदलली तर आवाज कमी होतो. त्यामुळे आवाजाने शत्रूला ओळखण्याच्या प्रयत्नात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतील. ढग खाली उतरल्यास थर्मल इमेजिंग हे चांगल्याप्रकारे काम करत नाही. सीसी टीव्ही कॅमेऱयांची वीज कापली गेली तर ते काम करू शकत नाहीत. या सर्वच गोष्टींची आपल्याला तयारी ठेवावी लागणार आहे.

स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता
असुरक्षित सीमांमुळे केवळ सीमावर्ती भागांमध्येच तणाव निर्माण होतात असे नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही त्यामुळे धोका उत्पन्न होतो. स्मार्ट फेन्सिंग योजना सेन्सर, ग्राऊंड रडार, थर्मल इमेजर, लेसर अशा तंत्रज्ञानांच्या मदतीने सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत. जवानांना कमी जोखीम पत्करावी लागेल आणि लपूनछपून घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांना लक्ष्य करणे जवानांना सोपे जाईल. सर्व बाबींचा विचार करता, ही अदृश्य भिंत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावेल, यात शंकाच नाही. स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता नक्कीच आहे, मात्र त्याशिवाय हुशार आणि जागरूक सैनिकांची गरज आहे. तंत्रज्ञान आणि सैनिक यांचे मिलन होईल त्या वेळी आपल्या सीमा या अधिक सुरक्षित होतील. संपूर्ण सीमेवर अशा प्रकारची अदृश्य भिंत उभारण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागेल. तथापि, घुसखोरीच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱया क्षेत्रांमध्ये हे काम तातडीने पूर्णत्वास नेले जावे.

सध्याची परिस्थिती
बीएसएफला घुसखोरी, तस्करी, अवैध व्यापार आणि अमली पदार्थांचा व्यापार रोखण्यात वारंवार अपयश येत आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय सीमेवर एक तारेचे कुंपण तयार करण्यात आले आहे. ठराविक अंतरावर सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या तैनात आहेत. चौक्यांचे मधले अंतर पेट्रोलिंग करून त्यावर लक्ष ठेवले जाते. मात्र ते सक्षम नाही. सीमा भागात अनेक ठिकाणी नदी आणि नाले वाहतात. वाहत्या पाण्यात तारेचे कुंपण उभे करणे खूप अवघड असते. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेचेच उदाहरण घेतल्यास या सीमेवरील 15 ते 20 टक्के भाग नदीमय असल्याने तिथेही तारेचे कुंपण लावणे अशक्य आहे. सद्यपरिस्थितीत या जागी हेलिकॉप्टरने पेट्रोलिंग केले जाते. मात्र कायमस्वरूपी लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसल्याने हा भाग कमकुवत समजला जातो. म्हणून आपण स्मार्ट फेन्सिंग तयार केले तर तिथे होणारी घुसखोरी तसेच अवैध व्यापार/तस्करी रोखण्यात यश मिळेल. नदीनाल्यांनी वेढलेल्या या भागाच्या सुरक्षिततेसाठी ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम’ अस्तित्वात आली आहे. त्यादृष्टीने हिंदुस्थान-पाक सीमेवर ‘स्मार्ट फेन्सिंग’ ही सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. स्मार्ट फेन्सिंगच्या योजनेवर हिंदुस्थान सरकार प्रदीर्घ कालावधीपासून काम करीत आहे. आता प्रायोगिक तत्त्वावर पाच किलोमीटरच्या सीमेवर कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्टिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेन्ट सिस्टिम (सीआयबीएमएस) उभारण्यात आली आहे.

स्मार्ट कुंपण बसवलेले देश
इस्रायल, अमेरिका, सौदी अरेबिया, बुल्गारिया आणि हंगेरी यांसारख्या देशांनी अवैध घुसखोरीला लगाम घालण्यासाठी हा पर्याय निवडला आहे.
– इस्रायलने जॉर्डनच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट फेन्सिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
– अमेरिकेने मेक्सिकोलगतच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता 2017 मध्ये इस्रायलमधील एलबिट सिस्टीम या कंपनीशी स्मार्ट फेन्सिंगबाबत करार केला. या हायटेक कुंपणामध्ये टेहळणी टॉवरव्यतिरिक्त अत्याधुनिक सेन्सर, रडार, सेन्सर टॉवर, मॉनिटर युनिट आणि हायटेक संवादप्रणाली असणार आहे.
– सौदी अरेबियाने इराकशी जोडलेल्या सीमेवर 2014 मध्ये स्मार्ट कुंपण घातले होते. पाचस्तरीय फेन्सिंगमध्ये नाईट व्हिजन कॅमेरा, टेहळणी टॉवर, रडार युनिट आणि फायबर ऑप्टिक नेटवर्क होते.
– बुल्गारिया आणि हंगेरी या देशांनीही बेकायदेशीर घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर 2015 मध्ये इस्रायलमधील मेग्ना बीएसपी या कंपनीशी स्मार्ट फेन्सिंगबाबत करार केला.
– मोरक्कोने अल्जेरियामधून होणाऱया घुसखोरीला चाप लावण्यासाठीच याच मार्गाचा अवलंब केला आहे.